Join us  

कुरळ्या केसांचा झाप कसा आवरायचा? कुरळे केस मेंटेन कसे कराल? त्यासाठीच हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 7:10 PM

मस्त फुगीर दिसणाऱ्या कुरळ्या केसांचा डौल काही वेगळाच असतो. दिसायला आकर्षक दिसणारे हे केस मेंटेन करणं म्हणजे महाकठीण काम. म्हणूनच तर कुरळ्या केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी हे काही उपाय करून पहा.

ठळक मुद्देकेसांचा गुंता सोडविताना तो खालून वर या पद्धतीने सोडवावा. आधी केसांच्या खालच्या टोकांचा गुंता सोडवावा आणि त्यानंतर हळूहळू वर वर जावे.

कुरळ्या केसांचा लूक इतका आकर्षक दिसतो की तुम्ही इतर कोणती हेअरस्टाईल केली नाही तरी चालते. मोकळे सोडलेले कुरळे केससुद्धा खूपच छान दिसतात. मोकळ्या सोडलेल्या कुरळ्या केसांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वेस्टर्न वेशभुषा करा किंवा अगदी साडी नेसा. कुरळे केस हमखास सर्वच प्रकारच्या ड्रेसिंगवर भाव खाऊन जातात. कुरळ्या केसांच्या प्रेमात पडून आपल्या सरळ केसांना कर्ल करून घेणाऱ्या तरूणीही खूप आहेत. पण ज्यांचे केस नैसर्गिक कुरळे आहेत, त्यांच्यासाठी हा केशसंभार सांभाळणे म्हणजे एखाद्या दिव्याप्रमाणेच आहे.

 

अशी घ्या कुरळ्या केसांची काळजी१. कुरळे केस धुतल्यानंतर त्यावर खूप अधिक वेळ टॉवेल गुंडाळून ठेवू नये. तसेच कुरळे केस जाेर लावून पुसूही नये. 

२. कुरळे केस धुतल्यानंतर कंडीशनर आवर्जून लावा. कंडीशनर लावल्यामुळे केस जास्त गुंतणार नाहीत आणि गरजेपेक्षा अधिक फुगणारही नाहीत. 

३. ओले असणारे कुरळे केस सुकविण्यासाठी ड्रायरचा उपयोग करू नका. यामुळे केसांचे रूक्षता तर वाढतेच पण गुंताही खूप होतो. 

 

४. केसांचा गुंता सोडविताना तो खालून वर या पद्धतीने सोडवावा. आधी केसांच्या खालच्या टोकांचा गुंता सोडवावा आणि त्यानंतर हळूहळू वर वर जावे.

५. खोबरेल तेलामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केस धुण्याआधी त्यांना खोबरेल तेल आवर्जून लावा. यामुळे केस चमकदार होतात आणि केसांच गुंताही होत नाही.

६. कुरळ्या केसांची हेअरस्टाईल करायची असेल, तर हीट प्रोटेक्शन स्प्रेचा वापर अवश्य करा. खूप धुळीत आणि उन्हात जायचे असेल तरीही कुरळ्या केसांवर हीट प्रोटेक्शन स्प्रे मारावा. तसेच हेअर स्टाईल करण्याकरता अँटी फ्रीझ सिरम वापरावे.

 

७. कुरळ्या केसांचा गुंता काढण्यासाठी कंगवा वापरणे टाळा. कंगव्याऐवजी मऊ ब्रिसल्स असणारा हेअर ब्रश वापरावा. यामुळे गुंता काढताना केस ओढले जाणार नाहीत.  

८. कुरळ्या केसांना कंडीशनर लावताना ते केसांच्या टोकांशी लावावे आणि एक ते दोन मिनिटांसाठी राहू द्यावे. कुरळे केस असणाऱ्या व्यक्तींनी लिव्ह-ईन कंडीशनर वापरावे. ह्या प्रकारचे कंडीशनर केसांमध्ये लाऊन तसेच राहू द्यायचे असते. त्यामुळे केस मुलायम राहतात.

९. कुरळे केस धुण्यासाठी थंड पाणी वापरावे. यामुळे केसांमधील आर्द्रता टिकून राहते.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी