पावसाळ्यात जशा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात, तसेच केसांचे आरोग्य सांभाळणेही या दिवसांमध्ये खूप कठीण होऊन जाते. केसांना थोडा जरी पाऊस लागला तरी लगेचच केसांचे सेटींग बिघडून तर जातेच पण केस लगेचच ऑईलीही होऊन जातात. केसांना एक वेगळाच चिकटपणा येतो आणि मग त्यातून दुर्गंधही येऊ लागतो.
केवळ पावसाळाच नाही, तर शाम्पू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी केस पुन्हा ऑईली होण्याची समस्या अनेकींना बारा महिने सतावत असते. शाम्पू केल्यानंतर अनेक जणींचे केस पुन्हा तेल लावेपर्यंत मस्त सिल्की राहतात. पण काही जणींचे केस मात्र अगदी छान शाम्पू केला तरी दुसऱ्या दिवशी जणू काही केसांना तेल चोपडले आहे, असे दिसू लागतात. या समस्येचे मुळ तुमच्या डोक्याच्या त्वचेत आहे. जर केस असे सारखे सारखे ऑईली, चिपचिपीत होत असतील, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या डोक्याच्या तैलग्रंथीतून गरजेपेक्षा जास्त सिबम झिरपत आहे.
केसांचा तेलकटपणा जाण्यासाठी हे उपाय करा
१. टोमॅटोचा वापर
दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन त्याचा रस काढावा. यामध्ये एक टेबलस्पून मुलतानी माती टाकावी आणि ही पेस्ट हळूवार हाताने केसांच्या मुळाशी लावावी. २० ते ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
२. चहा पावडर
एका ग्लासभर पाण्यात १ टेबलस्पून चहा पावडर टाका आणि हे पाणी १० ते १५ मिनिटे उकळू द्या. पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासाने केस धुवून घ्या.
३. ॲपल सायडर व्हिनेगर
एक कप पाण्यात ३ ते ४ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घाला आणि ते डोक्याच्या त्वचेवर लावा आणि नंतर थोड्या वेळाने केस धुवा. यामुळे केसातले अतिरिक्त तेल निघून जाईल.
४ कढीपत्ता आणि दही
२ वाटी भरून कढिपत्ता पाने आणि त्याच्या अर्धे म्हणजे एक वाटी दही घ्यावे. हे दोन्ही पदार्थ मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाकावे. यामुळे केसांचे अतिरिक्त तेल निघून जाईल आणि केस चमकदार होतील.
५. पेरूची पाने
पेरूची पाने हा देखील केसांचे अतिरिक्त तेल काढून टाकणे आणि केस गळती थांबविणे, यावरचा प्रभावी उपाय आहे. पेरूची ८ ते १० पाने पाण्यात टाकून उकळावी. पाणी चांगले १० ते १२ मिनिटे उकळायला हवे. यानंतर हे पाणी कोमट झाले की, ते डोक्याच्या त्वचेवर लावावे आणि अर्ध्या पाऊण तासाने केस धुवून टाकावे.