केसांची काळजी ही आता सर्व वयोगटाच्या स्त्री- पुरूषांमध्ये एक कॉमन चर्चेची बाब झाली आहे. केस गळती, केसांची वाढ न होणे, डोक्यात खूप आणि सारखा- सारखा कोंडा होणे, केस पांढरे होणे अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत. आहार आणि बदललेली जीवनशैली हे तर या समस्यांचे एक प्रमुख कारण आहेच. पण त्यासोबतच आपल्या हातून होणाऱ्या काही चुकाही केस गळतीसाठी कारणीभूत ठरत आहेत. या चुका टाळल्या तर नक्कीच केसांची चांगली वाढ होऊ शकेल.
या चुका टाळा१. ओले केसांची काळजी घ्याकेस जेव्हा ओले असतात, तेव्हा ते अतिशय नाजूक असतात. त्यामुळे अशा अतिसंवेदनशील अवस्थेत असलेल्या केसांची खूप काळजी घेतली पाहिजे. ओले केस कोरडे करताना कधीही टॉवेल जोरजोरात डोक्याच्या त्वचेवर चाेळू नका. यामुळे केस मुळापासून निघून येतात. तसेच केस पुसताना सगळे केस एका बाजूला घेऊन टॉवेलने त्यावर जोरजाेरात फटकारे मारून पुसण्याची सवयही अनेक जणींना असते. असे करणे टाळा. ओले केस कधीही कंगव्याने विंचरू नका.
२. ओल्या केसांवर टॉवेल तसाच राहू द्याकेस धुतल्यानंतर ते झटपट टॉवेलने कोरडे करायचे आणि मोकळे सोडायचे, अशी अनेकींची सवय असते. पण असे करू नका. केस धुतल्यानंतर ओल्या केसांभोवती टॉवेल गुंडाळावा आणि १५ ते २० मिनिटांसाठी टॉवेल अशाच अवस्थेत राहू द्यावा. केस गरम पाण्याने धुतल्यामुळे त्यांचे तापमान वाढलेले असते. अशा अवस्थेत केसांभोवती टॉवेल गुंडाळून ठेवल्यास केसांना चांगली वाफ मिळते. शरीरासाठी जशी स्टीम बाथ चांगली असते, तशीच केसांसाठीही अशी स्टीम बाथ पोषक ठरते.
३. केस ओले असताना झोपू नकाकेस धुतल्यानंतर कधीही झोपू नये. कारण आधी सांगितल्याप्रमाणे ओले केस अत्यंत नाजूक असतात. आपण जेव्हा झोपतो तेव्हा उशी आणि केस यांचे घर्षण होते आणि केस तुटतात. तसेच ओले केस असताना झोपल्यामुळे ते एकमेकांमध्ये अधिक गुंततात. अशा गुंतलेल्या केसांचा गुंता सोडविणे मग कठीण होऊन बसते. तसेच केसातला गुंता काढताना केस तुटतात आणि जास्तच गळू लागतात.
४. स्टाईलिंग टूल्सचे तापमान योग्य ठेवाब्लो- ड्रायर, हेअर स्ट्रेटनिंग किंवा हेअर टाँग करताना तापमान १८५ डिग्रीपेक्षा अधिक ठेवू नये. कारण जर तापमान यापेक्षा जास्त वाढले तर केसांचे नुकसान होते. खूप जास्त तापमानावर केसांमधले कॅरेटीन नष्ट होते आणि केस अशक्त होऊ लागतात. केसांची चमक नष्ट होऊन ते रूक्ष होतात.
५. तेल लावताना काळजी घ्यातेल लावणे म्हणजे ते जोरजोरात केसांवर रगडणे, असा अनेकींचा समज असतो. म्हणूनच तेल लावताना अनेक जणींकडून चुका होतात. तेल लावताना थंड तेल कधीच केसांवर लावू नका. तेल कोमट करा आणि मगच केसांवर लावा. तेल लावताना रगडून, चोळून लावू नका. तेल डोक्याच्या त्वचेवर लावा आणि हळूवार हाताने गोलाकार दिशेने फिरवत केसांची मालिश करा.