साधारण पंचविशीच्यानंतर आपल्या ओठांची नीट काळजी घेतली गेली पाहिजे. चेहऱ्यावर वेगवेगळे उपचार आपण करून पाहतो आणि त्वचा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण या नादात ओठांकडे मात्र फारच दुर्लक्ष होऊन जाते. चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाणे तसेच लिपस्टिक, लीपग्लॉस, लीप बाम, लीप लायनर यांचे ब्रॅण्ड वारंवार बदलत राहणे, यामुळेही ओठांचे नैसर्गिक सौंदर्य कमी होत जाते आणि ते काळे पडू लागतात. ओठांची काळजी घेण्यासाठी कोणतेही महागडे कॉस्मेटिक्स खरेदी करण्याची गरज नाही. प्रत्येक घराच्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या साध्या साध्या गोष्टी वापरून आपण ओठांचे सौंदर्य राखू शकतो.
हे उपाय करून पहा...
१. लिंबू आणि साखर
लिंबू आणि साखर हे दोन्ही पदार्थ शरीरावरच्या मृत पेशींना दूर करण्याचे काम करतात. म्हणून तर चेहऱ्यासाठी जे अनेक फेसपॅक असतात, त्यामध्ये बऱ्याचदा लिंबाचा रस वापरला जातो. लिंबू रस आणि पिठी साखर यांची पेस्ट बनवा आणि ती ओठांवर हलक्या हाताने चोळून लावा. दोन ते तीन मिनिटांनंतर ओठ थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे ओठ मऊ पडतील.
२. लिंबू आणि बदाम तेल
ओठ कोरडे पडले असतील आणि त्यांची सालं निघत असतील तर हा उपाय करून पहा. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी ओठांसाठी पोषक असते तर बदाम तेल ओठांचा काळेपणा घालवते. म्हणून भेगाळलेल्या ओठांसाठी हा उपाय विशेष उपयुक्त ठरतो.
३. साजूक तुप
साजूक तुप हा एक अतिशय चांगला आणि सोपा उपाय आहे. साजूक तुपाने केलेली मालिश नेहमीच सौंदर्य वाढविणारी असते. रोज रात्री एक चुटकीभर साजूक तूप घ्या आणि ओठांवर त्याने मालिश करा. तुप ओठांमध्ये जिरले जाईल, याची काळजी घ्या. हा उपाय नियमित केला तर आठवडाभरातच फरक जाणवू लागेल.
४. डाळींबाचे दाणे
डाळींबाचे दाणे फाटलेल्या आणि रखरखीत ओठांसाठी अतिशय प्रभावी ठरते. डाळींबाचा रस थेट ओठांवर लावला तरी चालतो. किंवा डाळींबाचे दाणे आणि दूध मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवा आणि ती ओठांवर लावा.
५. हळद आणि मध
हळद हा अनेक दुखण्यांवर एक सोपा इलाज आहे. ओठांच्या मदतीलाही हळद धावून येऊ शकते. हळद आणि मध यांची पेस्ट ओठांवर हलक्या हाताने चोळून लावा. यानंतर दोन ते तीन मिनिटांनी ओठ गार पाण्याने धुवून टाका. हळदीमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडण्ट्स ओठांवरच्या भेगा दूर करतात आणि मधामुळे ओळांचा काळेपणा कमी होतो.