सौंदर्याची काळजी घेताना जर नखे तशीच ओबडधोबड राहीली तर ते अजिबात चांगले दिसत नाही. म्हणून अनेक जणी नखे वाढविण्याचा प्रयत्न करतात. पण काही जणींच्या बाबतीत हा बेत पुरता फसतो. नखे छान वाढली आणि त्यांना मस्त नेलपेंट लावून आकर्षक करण्याची वेळ आली की नखे तुटून जातात आणि सगळाच हिरमोड होतो. नखे तुटू नयेत आणि छान निमुळती लांबसडक वाढावीत म्हणून याकाही टिप्स फॉलो करून बघा.
अशी घ्या नखांची काळजी
१. पाव कप नारळाचं तेल घ्या. त्यात पाव कप मध आणि चार थेंब रोझमेरी तेल टाका. हे मिश्रण थोडं कोमट करून घ्या आणि त्यामध्ये १५ मिनिटांसाठी नखे बुडवून ठेवा. यामुळे नखे लवकर वाढतात.
२. लसणाची पेस्ट करा आणि ती नखांवर चोळा. तसेच लसणाची एक पाकळी घेऊन नखांच्या टोकांवरही घासावी. या उपायामुळे नखे बळकट होतात.
३. अंड्याचा पांढरा बलक काढा आणि त्यामध्ये चार टेबलस्पून दूध टाका. हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. या मिश्रणाने नखांवर मालिश करा. नखांची चांगली वाढ होते.
४. संत्र्यांच्या रसामध्ये १० ते १५ मिनिटे नखे बुडवून ठेवल्यानेही चांगला फायदा होतो. संत्र्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी नखांना बळकटी देते. तसाच फायदा लिंबू नखांवर चोळल्यामुळेही होतो.
५. एक चमचा लिंबू, ३ चमचे ऑलिव्ह ऑईल एकत्र करा. हे मिश्रण थोडे कोमट करा आणि त्याने नखांना मालिश करा.
६. रोज रात्री बदाम तेलाने ५ ते १० मिनिटांसाठी नखांची मालिश करा.
७. चार टेबलस्पून टोमॅटोचा रस आणि २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल एका कपात मिक्स करा. या मिश्रणामध्ये १० ते १५ मिनिटे नखे बुडवून ठेवा.
८. टुथपेस्ट नखांवर चोळल्याने नखे चमकदार होतात.
ही काळजी देखील घ्या
१. कोणतीही टोकदार वस्तू नखांवर घासू नका.
२. नेलपेंट आणि नेल रिमुव्हर दोन्हीही चांगल्या क्वालिटीचे वापरा. जर हलक्या दर्जाचे वापरले तर नखे पिवळी पडतात.
३. नखांना कायम नेलपेंट लावून ठेवू नका.
४. धुणे, भांडी, किंवा अशी कोणतीही कामे करताना ग्लोव्ह्ज वापरा.
५. नखे वेळोवेळी साफ करा.
अशी करा नखांची स्वच्छता
सगळ्यात आधी पेपर फायलरने नखांमधली घाण स्वच्छ करा. त्यानंतर काही मिनिटांसाठी नखे गरम पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर नखांवर साबण लावा आणि टुथब्रश किंवा नेलब्रशने चोळा. हात स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर कोरडे करून नखांवर माॅईश्चरायझर चोळा.
नखे मजबूत होण्यासाठी....
नखे चांगली वाढावीत आणि वारंवार तुटू नयेत म्हणून द्राक्ष, बीट, स्ट्रॉबेरी अंडी, पालक, सफरचंद, गाजर, संत्र, लिंबू , दूध, तूप, पालक टॉमेटो, मोहरी, सुकामेवा, शेंगदाणे, डाळी, कडधान्ये यांचा समावेश आहारात वाढवावा.