उन्हाळा आला की त्वचेची जरा विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाच्या झळांमुळे त्वचा टॅन (tanning) होणं, काळवंडणे, सनबर्नचा (sun burn) असे कित्येक त्रास या दिवसांत उद्भवतात. उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास होतो, त्याचा परिणामदेखील लगेचच त्वचेवर दिसून येतो आणि त्वचा निस्तेज, डल दिसू लागते. या सगळ्या त्रासांमध्ये तर ऑईली किंवा तेलकट त्वचा असणाऱ्यांचा त्रास तर आणखीनच वेगळा...
आधीच त्वचा तेलकट आणि त्यात उन्हाळ्यात खूप जास्त येणारा घाम यामुळे ऑईली त्वचा असणाऱ्या मैत्रिणी पुरत्या वैतागून जातात. काहीही केलं तरी उन्हाळ्यात त्यांचा चेहरा फ्रेश, चमकदार, तजेलदार दिसतच नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणूनच तर ऑईली त्वचा असणाऱ्यांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी नेमकी कशी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या करायच्या याविषयीची ही सविस्तर माहिती...
तेलकट त्वचा असेल तर करू नका या गोष्टी..
१. उन्हातून बाहेरून जेव्हा आपण घरात येतो. तेव्हा चेहरा स्वच्छ धुवावा, असं आपण ऐकलंय. पण तेलकट त्वचा असणाऱ्यांनी बाहेरून आल्याबरोबर लगेच चेहरा धुवू नये. चेहरा धुण्याआधी तो टिश्यू पेपरने किंवा टॉवेलने पुसून घ्या. चेहऱ्यावरचा घाम, धूळ टिपून घ्या. यानंतर ५ ते १० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.
२. चेहरा खूप तेलकट होतो म्हणून तो धुण्यासाठी फेसवॉश लावण्याची सवय अनेक जणांना असते. अर्थात त्यात काही गैर नाही. पण चेहरा तेलकट आहे, म्हूणन तो किती वेळा फेसवॉश लावून धुवायचा, याचं प्रमाण मात्र ठरलेलं आहे. दिवसातून प्रत्येकवेळी चेहरा धुताना फेसवॉशचा वापर टाळा. त्याऐवजी साध्या पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्यावर थेट साबण लावू नका. रात्रीच्यावेळी मुलतानी माती आणि गुलाबजल हा फेसपॅकही तुम्ही वापरू शकता.
३. खराब हात चेहऱ्यावर लावणे टाळा. अर्थात आपण हे काही मुद्दाम करत नाही. पण हातांवरची घाण आणि चेहऱ्यावरचे तेल यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गरज नसताना चेहऱ्याला हात लावणे टाळा. घरातून निघताना जेल बेस सनस्क्रीनचा वापर करा.
४. सततचा मेकअप करणं टाळा. सतत मेकअप आणि वेगवेगळ्या प्रोडक्ट्स वापर केला तर त्वचा हमखास खराब होऊ शकते, त्वचेवर फोडं येऊ शकतात. त्यामुळे कमीतकमी मेकअप हे नेहमी लक्षात ठेवा. तसंच कॉस्मेटिक्स घेताना ते ऑईली स्किनला चालतील की नाही, हे व्यवस्थित तपासून घ्या.