चेहऱ्यावर पिंपल्स का येतात, याची अनेक कारणे आहे. त्यापैकीच एक कारण म्हणजे शरीरातली वाढलेली उष्णता. उष्णता वाढली की हमखास काही जणींच्या चेहऱ्यावर एखादा मोठा, टपोरा पिंपल दिसू लागतो. आता उन्हाळ्यात तर तापमान जास्त असल्याने, डिहायड्रेशन (dehydration) वाढल्याने उष्णता (heat) वाढल्याचा त्रास अनेकजणींना होतोच. त्यामुळे मग एरवीपेक्षा जरा जास्तीचेच पिंपल्स चेहऱ्यावर दिसू लागले आहेत, असा अनेकींचा अनुभव. म्हणूनच तर शरीरातील उष्णता कमी करून पिंपल्स कमी करण्यासाठी (best solution for pimples problem) करून बघा हे काही खास उपाय.
१. चंदनाचा लेप
आपल्याला माहितीच आहे, की चंदन हे अतिशय थंड असतं. त्यामुळे उन्हाळ्यात चंदनाच्या लेपाचा आवर्जून वापर केला पाहिजे. घरात चंदनाचे खोड असेल तर अधिक उत्तम. खोड सहानीवर उगाळून त्याचा लेप करा आणि तो चेहऱ्यावर लावा. चंदनाचे खोड नसल्यास बाजारात मिळणारी चंदन पावडर वापरली तरी चालेल. लेप चेहऱ्यावर लावून सुकू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
२. काकडी
काकडीदेखील थंड असते. त्यामुळे तिचा वापरही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करता येतो. यासाठी काकडी किसून घ्या आणि रस काढा. हा रस कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. ५ ते १० मिनिटे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
३. सब्जाचे पाणी
शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा सब्जा टाका. अर्धा तास हे पाणी तसेच राहू द्या. त्यानंतर सब्जा चांगला फुलून येईल. हे पाणी दररोज प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि पिंपल्सचा त्रासही थांबतो.
४. गुलकंद पाणी
नुसते गुलकंद खात असाल तरी ते फायद्याचेच ठरते. पण दररोज रात्री झोपण्यापुर्वी गुलकंद पाणी पिण्याचा उपाय केल्यास अधिक चांगले. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा गुलकंद टाकावे. त्यानंतर ५ ते १० मिनिटांनी गुलकंद मऊ पडते आणि पाण्यात चांगले मिसळले जाते. हे पाणी एकदा चांगले हलवून घ्यावे आणि रात्री झोपण्यापुर्वी प्यावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते तसेच शांत झोप लागते. हे दोन्ही फायदे पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
५. दही
थंड वाटावे म्हणून उन्हाळ्यात आपण हमखास दही खातो, ताक पितो. आता हाच उपाय आपल्या त्वचेसाठी करा. एक चमचा दही आणि त्यात चिमुटभर पिठी साखर असा लेप करा आणि तो चेहऱ्यावर लावा. ५ ते १० मिनिटांनी चेहरा धुवा. चेहरा थोडा तेलकट झाला असेल. हा तेलकटपणा काढून टाकण्यासाठी बेसन हातावर घेऊन चेहऱ्यावर चोळा. चेहरा स्वच्छ होईल.