मेकअप करण्याच्या स्टाईल प्रत्येकवर्षी बदलत असतात. मागच्यावर्षी इन असणारी स्टाईल यावर्षीही तशीच असेल, असं नाही. त्यामुळे ब्यूटी वर्ल्डमधले नवे ट्रेण्ड समजून घेतले पाहिजेत आणि त्यानुसार मेकअप केला पाहिजे. मुळातच आपण मेकअप का करत असतो, तर आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर, अधिक तरूण दिसावं म्हणून. पण जर नेमकी यामध्येच काही गल्लत झाली तर सगळा खटाटोप व्यर्थ ठरतो. म्हणूनच तर मेकअप करताना तुमच्याकडून या काही चूका होत असतील, तर आधी त्या सुधारा आणि यंग, ब्यूटीफुल ॲण्ड चार्मिंग लूक देणारा मेकअप करा.
१. जास्त कोरीव भुवया नकोत
पुर्वी आखिव, रेखीव अगदी कोरून काढलेल्या आहेत, अशा भुवयांचा शेप इन होता. पण आता मात्र यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. आता तुमच्या भुवया अगदी पातळ नको आहेत. भुवया जाड आणि ब्रॉड ठेवण्याचा ट्रेण्ड सध्या इन आहे. कोरीव भुवयांमुळे तुमचा चेहरा अधिक प्राैढ दिसू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी आता भुवयांचा आकार बदलण्यावर लक्ष केंद्रित करा.
२. लिपस्टिकचा कलर परफेक्ट हवा
जर तुम्ही नेहमीच ब्राऊन शेडच्या डार्क, मॅट लिपस्टिक वापरत असाल, तर तुम्ही नक्कीच आहे, त्यापेक्षा मोठ्या दिसू शकता. त्यामुळे लिपस्टिकच्या कलरमध्ये थोडा बदल करून पहा. ब्राऊनऐवजी पिंक, चेरी, पीच, कॉपर असे कलर वापरून पहा. मॅट लिपस्टिक खूप जास्त डार्क लावत असाल तरी तुमचा चेहरा आहे त्यापेक्षा पोक्त् दिसू शकतो.
३. हेअरस्टाईल बदला
वर्षानुवर्षे एकाच प्रकारची हेअरस्टाईल आपला सगळा लूक बिघडवून टाकते. त्यामुळे प्रत्येकवर्षी तुम्ही काहीतरी नवी हेअरस्टाईल ट्राय करून पाहिली पाहिजे. मध्ये भांग पाडून केस मोकळे सोडत असाल किंवा एखादी हेअरस्टाईल करत असाल, तर तुमचे वय जास्त दिसू शकते. सध्या पफ करण्याची स्टाईल खूप ट्रेण्डमध्ये आहे. त्यामुळे मोकळे केस सोडायचे असतील, तरी मध्ये भांग पाडून मोकळे सोडू नका. पुढे पफ करा आणि मागचे केस मोकळे सोडा. किंवा सरळ डाव्या किंवा उजव्या बाजूला भांग पाडा आणि दुसऱ्या दिशेने केस फिरवून घ्या.
४. गॉगल असावा ट्रेण्डी
कपड्यांची आणि मेकअपची जशी फॅशन येत असते, तशीच स्टाईल गॅगलची पण येत असते. आकाराने खूप मोठा आणि डार्क शेडचा गॉगल बऱ्याचदा काकुबाईसारखा लूक देतो. सध्या आकाराने छोट्या आणि फेंट शेडच्या गॉगलची स्टाईल इन आहे. त्यामुळे असा एखादा गॉगल तुमच्या कलेक्शनमध्ये असू द्या.
५. अशी लावा टिकली
टिकली लावण्याची सवय असेल तर थोडी काळजी घ्या. काही जणी दोन भुवयांच्या अगदी मधोमध टिकली लावतात. तर काही जणींची टिकली जरा जास्तच कपाळावर सरकलेली असते. तुम्हाला टिकलीमुळे यंग लूक मिळावा, असं वाटत असेल तर टिकली भुवयांच्या मधोमध लावू नका. थोडीशी वर लावा. यामुळे तुम्ही अधिक छान दिसाल. तसेच प्रत्येक ड्रेसवर एकसारखी टिकली नको. टिकलीचा आकार आणि रंग ड्रेसिंगनुसार बदलणारा हवा.
६. आय मेकअप डार्क नको
डोळ्यांना काजळ, आय लायनर असा खूप जास्त मेकअप करू नका. सध्या डोळ्यात काजळ न घालता केवळ आयलायनर आणि मस्कारा लावण्याचा ट्रेण्ड आहे. असा डोळ्यांचा मेकअप एकदा करून पहा. तुम्ही अधिक सुंदर दिसाल.