Join us  

पार्लरपेक्षाही जास्त चमकेल घरगुती स्क्रबनं चेहरा; वापरा स्वयंपाकघरातल्या ४ गोष्टी, दही-साखर-कणीक-मध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 2:55 PM

Beauty Tips: चेहरा सुंदर आणि निरोगी करण्याचा सामान्य नियम म्हणजे त्वचा स्वच्छ ठेवणे. आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यात स्क्रबची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हे स्क्रब पार्लरमधे जाऊन करण्याची गरज नाही. उलट स्वयंपाकघरातल्या गोष्टींचा वापर करुन आठवड्यातून एकदा असं महिन्यातून चार वेळा स्क्रब करु शकतो.

ठळक मुद्देसौंदर्यतज्ज्ञ म्हणतात की, दर आठवड्याला स्क्रब करुन त्वचा स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं. यासाठी केमिकल प्रोडक्टपेक्षाही घरगुती गोष्टी जास्त असरदार ठरतात.घरच्याघरी नैसर्गिकरित्या स्क्रब करण्यासाठी मध, साखर, दूध, कणिक, तांदूळ या गोष्टींचीच गरज असते.दह्यात त्वचा स्वच्छ करणारे क्लिन्जिग गुणधर्म असतात.

स्वयंपाकघर, स्वयंपाकासाठी लागणारं जिन्नस हे फक्त स्वयंपाक करण्यासाठीच असतं असं नाही. सौंदर्यासाठी नैसर्गिक घटकांना प्राधान्य देणारे आणि त्याचा उपयोग करुन त्वचा सुंदर करणारे सौंदर्यतज्ज्ञ मात्र स्वयंपाकघराला घरातील ब्यूटी पार्लरच म्हणतात आणि स्वयंपाकासाठीच्या घटकांना ब्यूटी प्रोडक्टस असं म्हणतात. कारण सौंदर्य तज्ज्ञांच्या मते स्वयंपाक करताना वापरले जाणारे घटक हे फक्त चवीपुरतीच र्मयादित नसतात, त्यांचा संबंध थेट आरोग्याशी असतो. म्हणूनचे स्वयंपाकघरातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उपयोग आपण त्वचेच्या, केसांच्या समस्या सोडवण्यासाठी करु शकतो. अशा प्रकारे केलेल्या उपायांचा परिणाम हा ब्यूटी पार्लरसारखा तात्पुरता नसतो. तो दीर्घकाळ टिकतो. त्वचेच्या अनेक समस्यांवर तर स्वयंपाकघरातील काही विशिष्ट घटकांशिवाय इतर कोणंतही महागाचं प्रोडक्ट उपयोगी ठरत नाही. म्हणूनच आपण आपल्या स्वयंपाकघराकडे सौंदर्याच्या दृष्टिकोनातून बघितल्यास आपल्याला उपायांचे भरपूर पर्याय सापडतील.

Image: Google

आपल्या चेहर्‍यावर चमक असायला हवी म्हणून पार्लरमधे जाऊन आपण अनेक महागड्या ब्यूटी ट्रीटमेण्टस घेतो. पण तरी त्वचा चमकते ती काही दिवसच. पण यासाठीचा उपाय आपण घरच्या घरी करु शकतो. चेहर्‍यावर चमक दिसण्यासाठी त्वचा स्वच्छ असायला हवी. स्वच्छ त्वचेसाठी स्क्रब करणं आवश्यक असतं. कारण या स्क्रबमुळेच त्वचा एक्सफोलिएट होत असते. म्हणजे त्वचेवरील मृत पेशी, मृत त्वचा जाते, त्वचेवर जमा झालेली धूळ, माती निघून जाते. त्वचा स्वच्छ होते. त्वचेवरची रंध्र मोकळी होवून त्वचा श्वास घेऊ शकते. चेहरा सुंदर आणि निरोगी करण्याचा सामान्य नियम म्हणजे त्वचा स्वच्छ ठेवणे. आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यात स्क्रबची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हे स्क्रब पार्लरमधे जाऊन करण्याची गरज नाही. उलट स्वयंपाकघरातल्या गोष्टींचा वापर करुन आठवड्यातून एकदा असं महिन्यातून चार वेळा स्क्रब करु शकतो. सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात की, दर आठवड्याला स्क्रब करुन त्वचा स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं.घरच्याघरी नैसर्गिकरित्या स्क्रब करण्यासाठी मध, साखर, दूध, कणिक, तांदूळ या गोष्टींचीच गरज असते. त्याचा वापर करुन आपण उत्तम प्रतीचं स्क्रबर तयार करु शकतो. या चार गोष्टी चार प्रकारे वापरल्यास त्याचा त्वचेसाठी वेगवेगळा फायदा होतो. म्हणजे आपण महिन्यातून चार, तेही वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब घरच्याघरी करु शकतो.

Image: Google

मध आणि दही

हे स्क्रब तयार करताना 2 चमचे दह्यात 1 चमचा मध घालावं. ते चांगलं मिसळून घ्यावं. त्यात 1 चमचा ऑलिव्ह तेल आणि 1 चमचा साखर घालावी. परत हे मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं. हे मिश्रण चेहर्‍यावर हळुवार गोल मसाज करत लावावं. हा मसाज किमान 5-7 मिनिटं करावा. मसाज झाल्यानंतर चेहरा 10-15 मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवावा.दही हे त्वचेसाठी फायदेशीर असतं. दह्यात त्वचा स्वच्छ करणारे क्लिन्जिग गुणधर्म असतात. म्हणूनच चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दही आणि मधाचा स्क्रब वापरावा. यामुळे चेहर्‍यावर नैसर्गिक चमक येते.

Image: Google

साखर आणि मध

 सर्वात आधी एका वाटीत साखर आणि मध चांगलं मिसळून घ्यावं. नंतर हे मिश्रण चेहर्‍याला लावून चेहर्‍याचा मसाज करावा. मसाज झाल्यावर लेपाप्रमाणे ते काही वेळ ठेवून चेहर्‍यावा ते कोरडं होवू द्यावं. नंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. हे स्क्रब आठवड्यातून दोनदा केल्यास त्याचे परिणाम लवकर दिसतात.या स्क्रबमधील साखरेमुळे चेहर्‍यावरील डाग, मुरुम जाऊन त्वचा स्वच्छ होते. चेहर्‍यावरची चमक सुरक्षित ठेवण्याचं काम हे स्क्रब करतं.

Image: Google

दूध-कणिक-मध

हे स्क्रब तयार करण्यासाठी गव्हाच्या कणकेत दूध आणि मध घालून ते मिसळून घ्यावं. या मिश्रणानं चेहर्‍यावर बोटं गोलाकार फिरवत मसाज करावा. 10-15 मिनिटं मसाज केल्यानंतर ते चेहर्‍यावर सुकू द्यावं. सुकल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.या स्क्रबमुळे त्वचेवर चमक येते. हे स्क्रब आठवड्यातून एकदा करावं.

Image: Google

तांदूळ आणि मध

सर्वात आधी तांदूळ धुवून सुकवून घ्यावेत. सुकल्यानंतर तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. एक चमचाभर तांदळाचं पीठ घेऊन त्यात चमचाभर मध घालावं. ते चांगलं मिसळून घ्यावं. मग त्यात थोडा बेकिंग सोडा घालावा आणि तोही चांगला मिसळून घ्यावा. या मिश्रणानं चेहर्‍यावर किमान पाच मिनिटं मसाज करावा आणि मग चेहरा  पाण्यानं स्वच्छ धुवावा.या स्क्रबमुळे चेहरा चमकदार होतो तसेच चेहर्‍यावर पडलेले मुरुम पुटकुळ्यांचे डाग निघून जातात.

टॅग्स :ब्यूटी टिप्स