आपण जेव्हा लिपस्टिकच्या जाहिराती पाहतो, तेव्हा आपल्याला त्यातले काही शेड खूपच आवडून जातात. जाहिरातींमधल्या मॉडेल्सच्या चेहऱ्यावर ते फारच उठून दिसत असतात. त्यामुळे साहजिकच आपल्याला वाटते, की आपणही हाच शेड घेऊ. पण जेव्हा तो शेड आपण आपल्या ओठांवर लावून पाहतो, तेव्हा जाहिरातीतल्या त्या मॉडेल्सची लिपस्टिक आणि आपली लिपस्टिक यामध्ये खूपच फरक दिसून येतो. इतका की हाच शेड आपण निवडला होता का, असा प्रश्नही आपल्याला पडतो. त्यामुळे मग सेम टू सेम लिपस्टिक असूनही आपले ओठ त्या जाहिरातीतल्या मॉडेल्ससारखे सुंदर का दिसत नाहीत, असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो.
लिपस्टिकच्या जाहिराती एकतर आपण टीव्हीवर पाहतो किंवा मग मासिकांमध्ये बघतो. या दोन्ही माध्यमांमध्ये खूप जास्त एडिटींग इफेक्ट दिलेले असतात. त्यामुळे मॉडेल अधिक सुंदर दिसणे साहजिकच आहे. पण फक्त याच कारणामुळे लिपस्टिकचा त्यांनी लावलेला शेड आणि आपला शेड यात फरक दिसतो, असे मुळीच नसते. एकच शेड लावूनही मॉडेलचे ओठ आणि आपले ओठ वेगवेगळे दिसतात, याचे मुख्य कारण आहे लिपस्टिक लावण्याची आपली चुकलेली पद्धत. आपल्या ओठांवरही लिपस्टिक अधिक सुंदर दिसावी असे वाटत असेल, तर हे काही नवे ट्रेण्ड फॉलो करा.
लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत
- जर तुमचे ओठ स्पष्टपणे उठून दिसणारे नसतील, तर सगळ्यात आधी लीप पेन्सिलने ओठांना व्यवस्थित आकार देऊन घ्या. त्यानंतर लिपब्रशने लिपस्टिक लावा.
- काही जणींचे ओठ आकाराने खूपच बारीक असतात. जर तुम्हाला तुमचे बारीक ओठ भरीव दिसावेत, असे वाटत असेल तर ओठांची जी आऊटलाईन आहे, त्याच्या किंचित बाहेरून लिप लायनर लावा. यानंतर लिपब्रशच्या साहाय्याने आतल्या भागात लिपस्टिक लावा.
- लिप लायनरने आऊटलाईन काढल्यावर खालच्या आणि वरच्या ओठाच्या मध्यभागी लिपस्टिकच्या शेडने एक उभी रेघ मारा. आता ओठांच्या दोन्ही टोकांपासून ते मधल्या लाईनपर्यंत हळूवार हाताने लिपस्टिक लावत या.
- लिपस्टिक लावण्याच्या आधी अनेक जणी ओठांवर लिपबाम लावतात. जर लिपबाम कमी किंवा जास्त झाला तरीही लिपस्टिकची शेड बदलू शकते. त्यामुळे लिपस्टिक लावण्याच्या आधी ओठांवर लिपबाम जरूर लावा, पण तो खूप जास्त नको. लिपबाम लावल्यानंतर दोन्ही ओठांच्यामध्ये तुमच्या हाताचे पहिले बोट आडवे घाला आणि बोटावर ओठ टेकवून लिपबाम थोडा कमी करून घ्या. त्यानंतर पाच मिनिटे जाऊ द्या आणि मग लिपस्टिक लावा.
- ओठांना अधिक बोल्ड लूक द्यायचा असेल, तर ओठांवर आधी फाउंडेशन लावा. ४ ते ५ मिनिटांमध्ये फाउंडेशन ओठांवर चांगल्या पद्धतीने सेट होते. त्यानंतर त्यावर लिपस्टिक लावा. यामुळे ओठांवरची लिपस्टिक अधिक खुलते आणि जास्तकाळ टिकते.