बटाटा (Potato) हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ, कधी भाजी कमी पडली की ती वाढवण्यासाठी किंवा कधी चिप्स खाण्याची इच्छा झाली की बटाट्याचे चिप्स आपल्याला आवर्जून आठवतात. बटाटा आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे अपवादानेच होईल. सँडविच, चाट, वडा, समोसा, पराठा, चिप्स अशा सगळ्या गोष्टींमध्ये वापरला जाणारा हा बटाटा आपण आवडीने खातो. आरोग्याच्या दृष्टीनेही बटाट्यामध्ये अनेक उपयुक्त घटक असतात. त्याचप्रमाणे बटाटा हा सौंदर्याच्यादृष्टीनेही अतिशय उपयुक्त आहे (Beauty Tips) . बटाट्याचा रस किंवा बटाट्याच्या फोडींचा फेस मास्क म्हणून उपयोग होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. विशेष म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीही अशाप्रकारचे घरगुती उपाय करुन आपले सौंदर्य वाढवतात. प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिचे सौंदर्य आपल्याला माहित आहेच. नितळ त्वचेमुळे जिच्या सौंदर्यात भर पडते अशी मलायका आपले सौंदर्य कायम राखण्यासाठी कोणतेही महागडे उपाय करत नसून बटाट्याचा वापर करते. याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता. आता बटाट्याचा त्वचेच्या कोणत्या समस्यांसाठी नेमका कसा वापर करायचा ते पाहूया...
१. चेहऱ्यावरचे डाग आणि टॅनिंग कमी करण्यासाठी
आपल्या चेहऱ्यावर अनेकदा डाग आणि टॅनिंग असते. या समस्येसाठी काय करावे ते आपल्याला कळत नाही. मग कधी आपण एखादा घरगुती उपाय करतो नाहीतर पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटस घेतो. पण त्याचाही म्हणावा तसा उपयोग होत नाही. मात्र मलायका अरोरा सांगते बटाट्याचा वापर केल्यास चेहऱ्यावरचे डाग आणि टॅनिंग जाण्यास मदत होते. बटाट्याचा किस करुन त्याचा रस काढा. हा रस कापसाने चेहऱ्यावर लावा. काही वेळ तो तसाच ठेऊन वाळू द्या, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आपल्याला थोडा मॉईश्चरायझिंग इफेक्ट हवा असेल तर बटाट्याच्या रसात एक चमचा मध घाला.
२. पिंपल्स आणि फोड जाण्यास उपयुक्त
पिंपल्स आणि पुटकुळ्या ही तर अनेकांसाठी अगदी सामान्य समस्या आहे. पिंपल्स आले की ते चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवतात. मग चेहऱ्याचा मेकपण करणेही अवघड होऊन बसते. हे पिंपल्स फुटले की त्याठिकाणी काळे डाग पडतात आणि आपला चेहरा आणखीनच कुरुप दिसायला लागतो. पण बटाट्यापासून स्क्रब तयार केले तर त्याचा चेहऱ्यावरील पुरळ आणि पुटकुळ्या घालवण्यासाठी चांगला फायदा होतो. यासाठी बटाट्याच्या रसात टोमॅटोचा रस एकत्र करायचा त्यामध्ये मध आणि टी-ट्री ऑईल घालायचे आणि त्यात ओटसची थोडी पावडर करुन ती एकत्र करायची. हे स्क्रब नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरचे फोड जाण्यास मदत होते.
३. डार्क सर्कल आणि सुरकुत्या जाण्यास मदत
कमी वयात डोळ्याखाली डार्क सर्कल यायला लागले किंवा सुरकुत्या यायला लागल्या की आपल्याला विनाकारण म्हातारे झाल्यासारखे वाटते. वय झालेले नसूनही आपण म्हातारे दिसायला लागतो. हे दोन्ही घालवण्यासाठी नेमके काय करावे हेही आपल्याला अनेकदा कळत नाही. अशावेळी बटाट्याचा रस आणि ग्लिसरीन एकत्र करुन ते सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावावे. तसेच बटाट्याचा रस आणि काकडीचा रस एकत्र करुन तो लावल्यास डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होण्यासही मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.