सौंदर्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे, त्वचा, डोळे, केस यांचे सौंदर्य...त्वचा नितळ असावी तसेच केसही मुलायम आणि घनदाट असावेत यासाठी आपण नेहमी काही ना काही उपाय करत असतो. यामध्ये घरगुती उपायांबरोबरच पार्लरमधील उपायांचाही समावेश असतो (Beauty Tips). पण डोळ्यांचे सौंदर्य चांगले राहावे यासाठी नेमके काय करावे याबाबत आपल्याला माहित नसते. अनेकदा डोळ्याच्या बाजूला होणारे काळे डाग, डोळ्यांखालच्या सुरकुत्या, डोळे निस्तेज दिसणे यांमुळे आपल्या सौंदर्यावर परिणाम होतो. हल्ली वाढता ताण, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे डोळ्यांखाली सुरकुत्या येण्याच्या तक्रारी आपल्यातील अनेक जण करताना दिसतात. डोळ्यांखाली सुरकुत्या (Wrinkels under eyes) आल्यामुळे आपण अकाली म्हातारे दिसायला लागतो. या सुरकुत्या घालवण्यासाठी नेमके काय करायचे हेही आपल्याला माहित नसते. पाहूयात डोळ्याखालच्या सुरकुत्या घालवण्याचे सोपे उपाय...
१. पपई आणि काकडीचा वापर
पपई ही आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चांगली असते त्याचप्रमाणे सौंदर्यासाठीही पपईचा वापर केला जातो. आपण वापरत असलेल्या अनेक फेसपॅकमध्ये किंवा क्रिममध्ये पपईचा वापर केलेला असतो. पपईचा गर काढून तो मिक्सरमधून बारीक करुन घ्या. हा गर डोळ्यांच्या खाली १० ते १५ मिनीटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट किंवा थंड पाण्याने धुवा. हा प्रयोग सतत केल्यास त्याचा तुम्हाला सुरकुत्या कमी होण्यास चांगला फायदा होईल. पपईतील अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्मांमुळे डोळ्यांखालची त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. याशिवाय काकडी फ्रिजरमध्ये ठेवून त्याचे काम डोळ्याखाली ठेवल्यासही सुरकुत्या कमी होऊ शकतात.
२. संतुलित आहार
डोळ्यांखाली सुरकुत्या येऊ नयेत यासाठी आपला आहार उत्तम असणे आवश्यक आहे. आहारात भाज्या, फळे, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ आणि सर्व प्रकारच्या डाळी, धान्ये, क़डधान्ये यांचा समावेश असायला हवा. तुमचा आहार संतुलित असेल तर तुमच्या डोळ्यांखाली सुरकुत्या येणार नाहीत. त्यामुळे आपण संतुलित आहार घेत आहोत का याबाबत खात्री करा आणि आहारात ज्या घटकांची कमतरता असेल त्या घटकांचा समावेश करा.
३. झोपताना तेल लावणे
डोळ्याखाली झोपताना तेल लावणे हा सुरकुत्या येऊ नये म्हणून किंवा आल्या असतील तर कमी व्हाव्यात म्हणून एक उत्तम उपाय आहे. रोजहिप ऑईल हे अँटी एजिंग म्हणून काम करते, त्यामुळे डोळ्याखाली झोपताना रोज हे तेल लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. याशिवाय एरंडेल तेल किंवा खोबरेल तेलाचाही आपण डोळ्यांखाली लावण्यासाठी वापर करु शकतो. तेलामुळे त्वचेला मॉईश्चरायजर मिळण्यास मदत होते आणि सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते.
४. ताणविरहित जीवन
ताण हे आपल्या आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या अडचणींचे एक महत्त्वाचे कारण असते. ताण घेतल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि सौंदर्यावर होतो. ताणात असलेल्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे त्याचा चेहऱ्यावर परिणाम होतो. झोप झाली नसेल तर चेहरा काळवंडणे, डोळ्यांखाली काळे होणे, सुरकुत्या येणे अशा समस्या निर्माण होतात. सध्या मोबाईल आणि सोशल मीडिया यांच्या वापराचे प्रमाणही सर्वच वयोगटात वाढले आहे, त्याचाही झोपेवर परिणाम होत असून या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.