त्वचेचा प्रकार कोणताही असो आणि कितीही वय असो, कोणालाही मुरुम पुटकुळ्या, ब्लॅकहेडस आणि डाग या समस्यांचा सामना करावा लागतो. पण तेलकट त्वचा असेल तर या समस्यांची तीव्रता जास्त असते हे खरं. त्वचेचा कोणताही प्रकार असो या समस्या ताण न घेता, बाहेर पैसे खर्च न करता घरच्या घरी उपाय करुन बर्या करता येतात. यासाठी प्रसिध्द सौंदर्य तज्ज्ञ शहनाझ हुसेन यांनी दिलेल्या फेसपॅकच्या टिप्स खूपच उपयुक्त आहेत.
मुरुम पुटकुळ्यांसाठी लेप
शहनाझ हुसेन यांनी ज्यांच्या चेहेर्यावर अतिप्रमाणात मुरुम पुटकुळ्या आहेत त्यांच्यासाठी एक खास लेप सूचवला आहे. हा लेप तयार करण्यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर, कडुलिंबाच्या पानांची पावडर आणि गुलाबपाणी घ्यावं.
हे सर्व साहित्य एका खोलगट वाटीत एकत्र करावं. मग हा लेप चेहेर्यास लावावा. लेप सुकेपर्यंत राहू द्यावा. लेप सुकला की चेहेरा थंड पाण्यानं धुवावा. हा फेसपॅक आठवडयातून तीन ते चार वेळेस लावल्यास मुरुम पुटकुळ्या लवकर बर्या होतात.
छायाचित्र- गुगल
मुरुमांचे डाग जाण्यासाठी
चेहेर्यावरच्या मुरुम पुटकुळ्या बर्या झाल्या की त्याचे डाग पडतात. हे डाग काही केल्या जात नाहीत. पण शहनाझ हुसेन यांनी यावर सुचवलेला उपाय हा जरी घरगुती असला तरी परिणामकारक असल्याचं त्या सांगतात. हे डाग घालवण्यासाठी लेप तयार करताना मुलतानी माती, एक चमचा लिंबाचा रस आणि गुलाबपाणी या सामग्रीचा उपयोग करावा.
एका खोलगट वाटीत हे सर्व साहित्य नीट एकत्र करुन लेप तयार करावा आणि तो चेहेर्यास लावावा. जर त्वचा संवेदनशील असेल आणि लिंबाचा रस चेहेर्यास चालत नसेल तर लिंबाच्या रसाऐवजी यात कोरफड जेल घालून लेप तयार करावा. हा लेप चेहेर्यास लावून तो सुकल्यानंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.
त्वचा तेलकट असेल तर
तेलकट त्वचा मुरुम पुटकुळ्या,ब्लॅकहेडस, व्हाइटहेडस यांना आग्रहाचं निमंत्रण देते. जर त्वचा तेलकट असूनही चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या किंवा ब्लॅकहेडस नसतील तर चांगली बाब आहे. पण म्हणून तेलकट त्वचा असलेल्यांनी त्वचेची काहीच काळजी न घेणं हे नुकसानकारक ठरु शकतं . म्हणूनच शहनाझ हुसेन तेलकट त्वचा असलेल्यांना त्वचेची काळजी घेण्यास सांगतात. त्वचेची काळजी घेतल्यास भविष्यात य समस्या उद्भवण्याचा धोका टळतो आणि त्वचा देखील तरुण दिसते. तेलकट त्वचा असलेल्यांनी केवळ मुलतानी माती आणि गुलाबपाणी यांचा उपयोग करुन लेप तयार करावा आणि तो चेहेर्यास लावावा. लेप वाळला की चेहेरा गार पाण्यानं धुवावा. आठवड्यातून तीन चार वेळेस हा उपाय केल्यास त्वचा तेलकट असली तरी जाचक अशा मुरुम पुटकुळ्यांचा धोका टळतो.
छायाचित्र- गुगल
त्वचा सामान्यअसेल तर
त्वचा कोरडी किंवा तेलकट असेल तरच मुरुम पुटकुळ्यांसारखय सौंदर्य समस्या उद्ब्भवतात असं नाही. त्वचा सामान्य असली तरी चेहेर्यावर पुटकुळ्या येऊच शकतात. सामान्य त्वचेवरील या समस्येसाठी शहनाझ हुसेन यांच्याकडे लेपाचा उपाय आहे. हा लेप तयार करण्यासाठी 1 चमचा केओलिन क्ले, 2 चमचे कोरफड जेल आणि ट्री ट्री तेलाचे दोन थेंब घ्यावेत.
या तिन्ही गोष्टी एकत्र करुन लेप तयार करावा आणि तो वाळेपर्यंत चेहेर्यावर ठेवावा. केओलिन क्ले ही विशिष्ट प्रकारची माती असते जी सामान्य किंवा थोडया कोरडया त्वचेच्या समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरते. चेहेर्यावर लावलेला केओलिन मातीचा लेप सुकला की चेहेरा पाण्यानं धुवावा. शहनाझ हुसेन म्हणतात की जर त्वचा सामान्य असेल म्हणजे ती कोरडी किंवा तेलकट नसेल आणि त्यावर मुरुम पुटकुळ्या नसतील तर या लेपात ट्री ट्री ऑइलचे थेंब घालू नये. हा लेप आठवड्यातून तीन ते चार वेळेस लावला तर त्वचा मुरुम पुटकुळ्यांपासून सुरक्षित राहाते .