आपलं वय जसं आपल्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं ना, तसंच ते आपण कोणते आणि कशाप्रकारचे कपडे घालतो, यावरूनही ठरत असतं. काही कपडे घातल्यावर जेव्हा आपण स्वत:ला आरशात पाहतो, तेव्हा आपणच आपल्यावर खुश होतो. बाहेर गेल्यावर आपल्याला छान- छान प्रतिक्रियाही ऐकायला मिळतात. पण याउलट बऱ्याचदा असंही होतं, की आपण घातलेले कपडे आपल्याला मुळीच आवडत नाही. कपडे हा आपले व्यक्तिमत्त्व ठरवणारा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे यंग ॲण्ड डिसेंट लूक मिळविण्यासाठी आपले कपडे कसे असावेत, हे सांगणाऱ्या काही ब्यूटी टिप्स.
१. ढगळे कपडे करा हद्दपार
एखादा फंकी टीशर्ट असेल, तर तो ढगळा, सैलसर असला तर एखाद्यावेळी चालू शकताे. पण नेहमीच असे ढगळे आणि सैल कपडे घालत असाल, तर ही सवय लगेच सोडून द्या. तुमचे कपडे जर परफेक्ट फिटिंगचे असतीत, तर तुम्ही एकदम यंग ॲण्ड स्टाईलिश दिसाल. सैलसर कपड्यांमुळे तुम्ही ५ ते ६ वर्षांनी प्रौढ दिसता.
२. कायम लांब बाह्या नकोत
थ्री- फोर्थ स्लिव्ह खूप कंम्फर्टेबल असतात, यात वादच नाही. पण नेहमीच असे लांब बाह्यांचे कपडे घालू नका. यासाठी तुम्ही एक प्रयोग घरीच करून पाहू शकता. एखादा लांब बाह्यांचा कुर्ता घाला आणि आरशात स्वत:ला पहा. यानंतर लगेच एखादा व्यवस्थित फिटिंग असलेला स्लिव्हलेस किंवा मेगास्लिव्ह्ज ड्रेस घाला आणि आता आरशात पहा. तुमच्या दोन कपड्यांमधला फरक तुम्हाला लगेचच जाणवेल.
३. डार्क रंग नको
ऑफिसला जाताना तुम्हाला फॉर्मल कपडे आणि सोबर रंगच घालावे लागतात. पण तरीही सोबर रंग म्हणजे अगदीच डार्क किंवा मळकट रंगाचे कपडे घालायचे असे नाही. त्यातल्या त्यात थोडे फ्लुरोसंट, फ्रेश कलरचे कपडे घाला. ब्राईट डोळ्यांना खुपणारे भडक रंग आणि फ्लुरोसंट रंग यात खूप फरक आहे. आपल्याला भडक रंगाचे कपडे घालणं नक्कीच टाळायचं आहे.
४. अगदीच मॅचिंग मॅचिंग नको
कपडे, सॅण्डल, क्लिप्स किंवा बो, इअरिंग्स, नेलपेंट, लिपस्टिक असं सगळंच मॅचिंग मॅचिंग करण्याची फॅशन आता आऊट झाली आहे. त्यामुळे असं परफेक्ट मॅचिंग करू नका. मॅचिंग करायचंच असेल तर कॉन्ट्रास्ट मॅचिंग करा. तुमच्या ड्रेसमधला जो रंग कमी दिसत असेल, त्या रंगाशी मिळत्याजुळत्या ॲक्सेसरीज घाला.
५. ॲन्कल लेन्थ असेल तर सॉक्स नको
काही जणींना सॉक्स घालण्याची खूप सवय असते. पण बऱ्याचदा सगळ्याच ड्रेसवर सॉक्स सुट हाेत नाहीत. सध्या ॲन्कल लेन्थ लेगिन्स आणि जीन्सची खूप फॅशन आहे. जर तुम्ही ॲन्कल लेन्थ जीन्स किंवा लेगिन्स घातल्यावरही सॉक्स घालणार असाल, तर सॉक्स अजिबात घालू नका. यामुळे तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वावरच परिणाम होतो.
६. सैल जीन्स नको
जीन्स घातली की आपोआपच आपण आहे त्यापेक्षा कमी वयाच्या दिसतो आहोत, असं फिलिंग आपल्याला येऊ लागतं. पण यासाठी तुमची जीन्सची चॉईस परफेक्ट हवी. जीन्स घेताना एकदम फिक्या निळ्या रंगाची घेऊ नका. ही जीन्स पुर्वी अनेक महाविद्यालयांचा युनिफॉर्म असायची. त्यामुळे हा रंग टाळा. जीन्स निवडताना ती स्ट्रेचेबल आणि व्यवस्थित फिटींगची निवडा. सैलसर जीन्स नको. जीन्सची लेन्थही तुमच्या घोट्याच्या किंचित खालपर्यंत हवी. अगदी टाचेपर्यंत जाणारी आणि नंतर फोल्ड करून घालावी लागणारी जीन्स केव्हाच हद्दपार झाली आहे.