यंदा कोरोनाच्या सावटानंतर २ वर्षांनी गौरी-गणपतीचा उत्सव आपण मोकळेपणाने साजरा करत आहोत. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी एकमेकांच्या घरी जाणे, गौरीच्या हळदी-कुंकवासाठी एकमेकांकडे जाणे असे सगळे करताना आपण फ्रेश आणि छान दिसावं असं प्रत्येकीला वाटतं. मात्र कामाचा थकवा, अपुरी झोप किंवा आणखी काही ना काही कारणामुळे चेहरा काळवंडलेला दिसतो. कधी चेहऱ्यावर खूप पुरळ असतात तर कधी चेहरा रुक्ष दिसतो. अशावेळी काय करावे अनेकदा आपल्याला कळत नाही. मग कधी आपण पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेतो तर कधी मेकअपची विविध उत्पादने वापरुन आपण हे सगळे झाकायचा प्रयत्न करतो. मात्र तरी त्याचा म्हणावा तसा परीणाम होत नाही (Beauty Tips Skin Care Tips for Looking Fresh in Festive Season).
आपल्या आरोग्याचा आणि डाएटचाही आपल्या त्वचेवर परीणाम होत असतो. पोट साफ नसेल, अॅसिडीटी किंवा इतर काही समस्या असतील तर त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे अशा समस्या उद्भवतात. तर तेलकट, मसालेदार खाण्यामुळेही त्वचा खराब होऊ शकते. पाहूया घरच्या घरी असा कोणता सोपा उपाय आहे जो केल्यास आपण सुंदर तर दिसतोच पण आपल्याला फ्रेश वाटण्यासही मदत होते. तर घरात सहज उपलब्ध असणारी कोथिंबीर आणि लिंबू यांपासून तयार होणारे पेय प्यायल्यास ऐन सणावारांना तुम्ही फ्रेश दिसू शकाल.
काय होतो फायदा ?
१. कोथिंबीर आणि लिंबू या दोन्हीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात. या ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंटस तसेच अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्मही असतात.
२. या दोन्ही पदार्थांमध्ये सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असल्याने त्वचेतील फ्री रॅडीकल्सशी लढण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. फ्री रॅडीकल्समुळे त्वचा लवकर सुरकुतलेली आणि डल दिसते.
३. शरीर डीटॉक्स करण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होतो. दिवसभर आपण काही जंक फूड खाल्ले असेल किंवा आपल्याला कामाचा, अन्य गोष्टींचा ताण असेल तर हा ताण निघून जाण्यास याची चांगली मदत होते.
४. शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडली की त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. या पेयामुळे टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि आपले पोट आणि एकूण शरीर फ्रेश होण्यास मदत होते.
५. वजन कमी करण्यासाठीही या पेयाचा चांगला उपयोग होतो. सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरात केव्हाही हे पेय प्यायल्यास ते फायदेशीर ठरते.
ज्यूस कसा करायचा?
१. १ वाटी स्वच्छ धुतलेली, चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चाट मसाला एकत्र करुन मिक्सरमधून फिरवून घ्या. २. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सर आणखी फिरवा.३. आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी घालून हा रस शक्यतो ताजा असतानाच पिवून घ्या.