सौंदर्य वाढविण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातील काही पदार्थही उपयोगात येऊ शकतात, असा आपण कधी विचारच करत नाही. स्वयंपाक घरात खरोखरच सौंदर्य वाढविणाऱ्या गोष्टींचा खजिना आहे. ब्लॅकहेड्सची समस्या कमी करण्यासाठी असाच एक छोटासा परंतु अत्यंत प्रभावी असणारा एक घटक आपण वापरणार आहाेत. हा पदार्थ आहे जायफळ. आजवर अनेक जणींनी केवळ पुरण किंवा तत्सम पदार्थांत घालण्यासाठी जायफळाचा वापर केला असेल. किंवा मग सर्दीसाठी किंवा आरोग्याच्या दृष्टीकोनातून जायफळ उपयोगात आणले असेल. पण आता हे जायफळ सौंदर्य वाढविण्यासाठीही वापरून पहा. जायफळामुळे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सची समस्या तर दुर होतेच, पण चेहऱ्याचे सौंदर्यही खुलते. जायफळामध्ये असणारे अॅन्टीबॅक्टेरियल घटक त्वचेवरील घाण दूर करतात आणि त्वचेला एक नवी चमक देतात.
ब्लॅकहेड्स का येतात?
डेड स्किन सेल्स आणि अतिरिक्त तेल यामुळे त्वचेवर असणारी छिद्रे उघडी होतात. या छिद्रांमध्ये असलेले तेल हवेच्या संपर्कात आल्यामुळे काळे पडते आणि त्यालाच आपण ब्लॅकहेड्स आले आहेत, असे म्हणतो.
कसा करायचा जायफळाचा फेसपॅक?
१. जायफळ आणि दूध
जायफळाची पावडर दोन टेबलस्पून घ्या. त्यामध्ये तेवढेच दूध मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करून घ्या.
सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट नाकावर किंवा हनुवटीवर जिथे ब्लॅकहेड्स असतील अशा ठिकाणी लावा आणि गोलाकार दिशेने फिरवत मसाज करा. यामुळे त्वचेच्या उघड्या छिद्रांमधील घाण बाहेर येण्यास मदत होईल आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी होईल.
२. जायफळ, मध आणि दालचिनी
दोन टेबलस्पून जायफळ पावडर घ्या. त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात मध आणि दालचिनी पावडर टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. चेहरा स्वच्छ धुवा आणि त्यानंतर २० ते २५ मिनिटांसाठी हा लेप चेहऱ्यावर लावा. ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सची समस्या दूर होऊन त्वचा नितळ होईल.
३. जायफळ आणि साय
दोन चमचे जायफळाची पावडर घ्या. यामध्ये एक चमचा साय आणि एक चमचा दूध टाका. मिश्रण एकत्रित करून चांगली पेस्ट तयार करून घ्यावी. संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाका. या उपायामुळे चेहरा तजेलदार होतो.