स्किन फास्टिंग या ब्युटी ट्रेण्डचा सध्या जगभरात बोलबाला सुरू आहे. त्वचेचे सौंदर्य वाढविण्याचा नैसर्गिक उपाय म्हणून स्किन फास्टिंगकडे पाहिले जाते. आपण उपवासाच्या दिवशी दुप्पट खातो, हा भाग वेगळा. पण उपवासाचा खरा अर्थ असतो की, अन्नपाण्याचा त्याग करायचा आणि पोटाला जरा आराम द्यायचा. असंच काहीसं आपल्याला आपल्या त्वचेसोबत करायचं आहे. ज्या दिवशी आपल्याला स्किन फास्टिंग करायचं आहे, त्यादिवशी त्वचेला टोनर, मॉईश्चरायझर किंवा अन्य कोणतीही सौंदर्य प्रसाधने अजिबात लावायची नाहीत.
आपल्या रोजच्या रूटिनमधून कधीतरी आपल्याला चेंज हवा असतो. असा थोडा चेंज मिळाला, की आपण पुन्हा नव्या जोमाने काम करण्यास तयार होतो. असेच काहीसे आपल्या त्वचेचे आहे. रोज आपण अनेक स्किन केअर प्रोडक्ट्स, ब्यूटी प्रोडक्ट्स आपल्या त्वचेवर लावत असतो. या सगळ्या त्याच त्याच चक्रातून बाहेर येण्याची गरज आपल्या त्वचेलाही असते. म्हणूनच एखादा दिवस आपल्याही त्वचेला द्या. स्किन फास्टिंगमुळे त्वचेला डिटॉक्स व्हायला वेळ मिळतो आणि तिचे सौंदर्य आणखीनच बहरू लागते, असा अनुभव आपल्या त्वचेला नियमितपणे स्किन फास्टिंग देणाऱ्या काही जणींनी सांगितला आहे. हिलींग ॲक्टिव्हिटी म्हणूनही स्किन फास्टिंगकडे पाहिले जाते.
कसं करायचं स्किन फास्टिंग ?
स्किन फास्टिंगसाठी शक्यतो असा दिवस निवडावा, ज्यादिवशी तुम्ही दिवसभर घरीच असणार आहात. स्किन फास्टिंग करताना आपण दिवसभर आपल्या चेहऱ्यावर कोणतेही कॉस्मेटिक्स लावायचे नाही. चेहरा धुतानाही कोणतेही क्लिन्झर किंवा फेसवॉश न लावता चेहरा नुसत्या पाण्याने धुवावा. काही जणी सनस्क्रिन लोशन किंवा मॉईश्चरायझर लावतात. पण प्युअर स्किन फास्टिंग करायचं असेल, तर असे काहीही त्वचेला लावू नका. यामुळे आपल्या त्वचेला तिचे own fighting mechanism विकसित करायला वेळ मिळतो.
किती दिवसांनी करायचं स्किन फास्टिंग ?
स्किन फास्टिंग कसं करायचं हे जाणून घेतल्यानंतर ते किती दिवसांनी करायचं, हा प्रश्नही निश्चितच मनात येतो. दोन तीन महिन्यांतून एकदा स्किनला डिटॉक्स होण्याची गरज असते. म्हणूनच दोन- तीन महिन्यातून एकदा स्किन फास्टिंग केलं पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात.