टोमॅटोची भाजी, टोमॅटोची कोशिंबीर हे पदार्थ अनेकांच्या आवडीचे. व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स यांचे मुबलक प्रमाण टोमॅटोमध्ये आढळून येते. टोमॅटो हा क्लिजिंग एजंट म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे टोमॅटो हा एक सर्वोत्तम ॲण्टी एजिंग रोखणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो. टोमॅटो त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे. टोमॅटोचा रस जेव्हा आपण एखाद्या पदार्थात मिसळतो, तेव्हा त्याची गुणवत्ता आणखी वाढते आणि हा फेसपॅक आपल्या त्वचेला उजळवण्यासाठी, तजेलदार बनविण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतो.
असा बनवा टोमॅटोचा फेसपॅक
१. टोमॅटो आणि काकडी
दोन टेबलस्पून काकडीचा रस, १ टेबलस्पून मध आणि २ टेबलस्पून टोमॅटोचा रस एकत्र करावा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर १५ ते २० मिनिटांसाठी लावावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा. त्वचेचे टॅनिंग कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
२. टोमॅटो आणि लिंबू
एक लहान आकाराचा टोमॅटो किसून घ्या. त्यामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि एक टेबलस्पून मध टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे आणि काही काळाने हा लेप सुकला की, चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.
३. टोमॅटो आणि ऑलिव्ह तेल
दोन टेबलस्पून टोमॅटोचा रस आणि १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्याला आणि मानेला लावून काही मिनिटांसाठी चांगली मसाज करा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी हा लेप चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याचने चेहरा धुवा. त्वचेवरचे डाग तर दूर होतीलच पण चेहरा चमकदार होईल.
४. टोमॅटो आणि दही
१ चमचा दही, १ चमचा लिंबाचा रस आणि २ चमचे टोमॅटोचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. त्वचेची रूक्षता आणि कोरडेपणा दूर होऊन त्वचा टवटवीत दिसू लागेल.
५. टोमॅटो आणि कोरफड
चार चमचे टोमॅटोचा रस आणि दोन चमचे कोरफडीचा गर एकत्र मिसळा. त्याने चेहऱ्याला १५ ते २० मिनिटे मसाज करा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. त्वचा काळवंडली असेल किंवा उन्हामुळे रापली असेल, तर हा उपाय खूपच गुणकारी ठरतो.