Join us  

Beauty Tips: वॅक्सिंगचा त्रास नको, चेहेर्‍यावरचे केस काढायचे तर करा हे 3 सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 6:50 PM

चेहेर्‍यावरचे केस वॅक्सिंगनं काढणं हे खूप वेदनादायक. पण म्हणून ते केस तसेच ठेवताही येत नाही. चेहेर्‍यावरचे हे केस घरगुती उपायांनी सहज काढता येतात. हे उपाय अगदीच सोपे आणि नैसर्गिक घटकांचा वापर करुन करता येण्यासारखे आहे. ते उपाय कोणते?

ठळक मुद्दे लिंबू-साखर-मध या तीन घटकांचा वापर करुन चेहेर्‍यावरचे केस काढता येतात.दलिया आणि केळ हे कॉम्बिनेशन केस काढण्यासोबतच चेहेरा स्वच्छही करतं.

चेहेर्‍यावर बारीक केस असतात. कोणाला ते अगदीच कमी असतात तर अनेकांना ते खूप असतात. या केसांमुळे सौंदर्यात अडथळा येतो. अनेकजणी पार्लरमधे जाऊन चेहेर्‍याचं वॅक्सिंग करतात. पण या पध्दतीनं केस जरी निघून जात असले तरी चेहेर्‍याची आग होणे, रॅश येणे, फोड येणे, पुरळ येणे अशा प्रकारचे त्रास होतात. तर काहींच्या चेहेर्‍यावरील केस पटकन वाढतात त्यामुळे सारखं सारखं पार्लरमधे जाऊन वॅक्सिंग करणंही परवडत नाही. चेहेर्‍यावरचे हे केस घरगुती उपायांनी सहज काढता येतात. हे उपाय अगदीच सोपे आणि नैसर्गिक घटकांचा वापर करुन करता येण्यासारखे आहे.

छायाचित्र- गुगल

चेहेर्‍यावरचे केस काढण्याचे घरगुती उपाय

1. लिंबू आणि मध

दोन चमचे साखर आणि लिंबाचा रस घ्यावा. त्यात एक चमचा मध घालावं. या तिन्ही गोष्टी एका वाटीत चांगल्या एकत्र कराव्यात. एका भांड्यात पाणी कडक गरम करावं. त्यात या मिश्रणाची वाटी ठेवावी. मिश्रण गरम झालं की वाटी काढून घ्यावी. मिर्शण गार होवू द्यावं. मग चेहेर्‍यावर पावडर ऐवजी कॉर्नस्टार्च लावावं. आणि हे मिश्रण लावावं. वॅक्सिंग स्ट्रिपने किंवा सुती कापड घेऊन ते पेस्टवर दाबावं आणि केसांच्या वाढीच्या विरुध्द दिशेनं खेचावं. या उपायानं चेहेर्‍यावरचे केस निघून जातात आणि वेदनाही होत नाही.

छायाचित्र- गुगल

2. दलिया आणि केळ

एक पिकलेलं केळ घेऊन ते मिक्सरमधे वाटून घ्यावं. वाटलेल्या केळात दोन मोठे चमचे दलिया घालावा. ते चांगलं एकजीव करावं. मग हे मिश्रण चेहेर्‍यावर लावावं. पंधरा मिनिटं हलक्या हातानं चेहेर्‍याचा मसाज करावा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहेरा धुवावा. दलियाचा उपयोग स्क्रबरसारखा होतो. त्यामुळे चेहेरा स्वच्छ होतो. यात असलेल्या अँण्टिऑक्सिडण्टसमुळे त्वचेचा लालसरपणा कमी होतो.

3. बटाटा आणि हरभर्‍याची डाळ

रात्रभर दोन चमचे हरभर्‍याची डाळ भिजत घालावी. सकाळी ती वाटावी. नंतर एका वाटीत अर्ध्या बटाट्याचा रस, एक चमचा मध आणि लिंबाचा रस घालावा. त्यात वाटलेली डाळ घालावी. हे सर्व नीट एकजीव करावं. मग हे मिश्रण चेहेर्‍यावर लावावं आणि पंधरा वीस मिनिटं हलक्या हातानं चेहेर्‍याचा मसाज कररावा. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.