त्वचेवरचे काळे डाग, दुखणारे फोड, मुरूम घालविण्यासाठी बेकिंग सोडा वापरायचा, हा नवा ट्रेण्ड वाचून तुम्हाला जरा अजब वाटू शकतं. पण बेकिंग सोडा ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाला फुगवतो ना, तसेच तो तुमचे सौंदर्यही वाढवतो, हे आता अनेक जणींनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं आहे. सोड्याची ही करामत नक्कीच अनुभवण्यासारखी आहे बरं का.. यामुळे त्वचेवरचे काळे डाग, मुरूम, दुखरे फोड गायब तर होतातच, पण त्वचाही तजेलदार होते. बेकिंग सोड्याला बोली भाषेत खाण्याचा सोडा असं म्हटलं जातं तर इंग्रजीमध्ये sodium bicarbonate म्हणतात.
हे उपाय करून पहा
१. कॉफी, लिंबू आणि बेकिंग सोडा
हा एक मस्त आणि बनवायला अतिशय सोपा असा फेसपॅक आहे. यासाठी एक टेबलस्पून कॉफी घ्या. यामध्ये कॉफीच्या एक चतुर्थांश बेकिंग सोडा टाका आणि थोडेसे लिंबू पिळा. याची पेस्ट आता चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेवरची डेड स्कीन निघून जाईल आणि चेहरा अतिशय मुलायम होईल.
२. पिंपल्स होतील गायब
पुढच्या एक दोन दिवसांत काही तरी कार्यक्रम आहे आणि नेमका चेहऱ्यावर एखादा टपोरा, लालबुंद फोड आला आहे ? अशा वेळी अजिबात टेंशन घेऊ नका. कारण बेकिंग सोड्यामुळे ही समस्या झटपट दूर होईल. यासाठी बेकींग सोडा आणि पाणी यांची घट्ट पेस्ट तयार करा. जेथे फोड झाला आहे, तेथे ही पेस्ट लावा. ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. दिवसातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करा. दुसऱ्याच दिवशी फोड कमी झालेला दिसेल.
३. चेहऱ्याला टॅनिंग झालंय...
खूप वेळ उन्हात रहावे लागल्याने जर चेहरा काळवंडला असेल, तर हा उपाय करून पहा. बेकिंग सोडा आणि गुलाबजल यांची पेस्ट करा आणि ती चेहऱ्यावर लावा. ५ ते ७ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचेच्या रंध्रांमधील धुळ, टॅनिंग निघून जाते आणि त्वचा फ्रेश दिसते. गुलाब जलामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
४. ओठ काळे पडले आहेत....
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय प्रभावी ठरतो. बेकिंग सोडा आणि मध एकत्र करा आणि हे मिश्रण हळूवार हाताने ओठांवर लावा. दोन ते तीन मिनिटांनी ओठ धुवून टाका. आठवड्यातून दोन- तीन वेळेस हा प्रयोग करायला हरकत नाही. मध आणि बेकिंग सोडा हे मिश्रण ओठांप्रमाणेच चेहऱ्याला लावणेही फायदेशीर ठरते.
५. पायांसाठीही उत्तम
तळपाय घाण झाले असतील, तर ते स्वच्छ करण्यासाठीही बेकिंग सोडा वापरता येतो. यासाठी गरम पाणी करा. या पाण्यात एक टी स्पून बेकिंग सोडा टाका. या पाण्यात अर्धा तास पाय भिजू द्या. यानंतर पायाला कोणतेही स्क्रब लावून चोळा. यामुळे पायांवरची डेड स्किन, घाण निघून जाईल आणि ते स्वच्छ दिसू लागतील.