Join us  

Beauty Tips : क्लींजर आणि मॉइश्चरायझर विकतच कशाला आणायला हवं? ताक आहे ना घरात, पहा ताकाचे खास उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 5:29 PM

ताक वापरा क्लीन्जर आणि माॅश्चरायझर म्हणून... निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी ताकाचे 3 उपाय 

ठळक मुद्देआरोग्यासाठी फायदेशीर असलेलं ताक केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त असतं. क्लीन्जर, माॅश्चरायझर आणि टॅन रिमूव्हर म्हणून ताक त्वचेसाठी वापरता येतं. 

ताकाला आयुर्वेदात आरोग्यासाठी अमृत म्हटलं जातं. पचनासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी रोज ताक पिण्याला महत्व आहे. आरोग्यासाठी महत्वाचं असलेलं ताक केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त असतं. केसांना ताक लावल्यानं जशी चमक येते तशीच चमक त्वचेलाही ताकाचा सौंदर्योपयोग केल्यास प्राप्त होते. ताकात लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण मुबलक असतं. त्याचप्रमाणे ताकात त्वचेला फायदेशीर जिवाणू असतात. हे जिवाणू त्वचेच्या खोलवर प्रवेश करुन त्वचेतील विषारी घटक बाहेर टाकतात . मृत पेशी नष्ट करण्यासाठी ताक फायदेशीर असतं. ताकाचा क्लीन्जर, माॅश्चरायझर आणि टॅन रिमूव्हर म्हणून उपयोग केल्यास उन्हामुळे खराब झालेली त्वचा, मुरुम पुटकुळ्या या सौंदर्य समस्या दूर होतात. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ताकाचा 3 प्रकार सौंदर्योपयोग करता येतो.

 

Image: Google

1. ताकाचं क्लीन्जर

ताकाचा उपयोग त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी होतो. चेहऱ्यावरील मृत पेशी, घातक जिवाणू, सौंदर्य समस्या प्रदूषित घटक दूर करण्यासाठी एक्सफोलिएटर म्हणून ताकाचा उपयोग होतो. एक्सफोलिएटर म्हणून ताकाचा उपयोग करताना एका वाटीत थोडं ताक, त्यात थोडं ऑलिव्ह आणि बदामाचं तेल मिसळावं. त्यात 1-2 चमचे गुलाब पाणी घालावं. हे सर्व चांगलं मिसळून घेऊन हे मिश्रण कापसाच्या बोळ्यानं चेहऱ्याला लावावं. 10-15 मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

2. ताकाचं माॅश्चरायझर

ताकामुळे त्वचेला आर्द्रता आणि पोषण मिळतं. त्वचेला पोषण मिळण्यासाठी ओटमील आणि ताकाचं मिश्रण करावं. या मिश्रणानं त्वचा स्वच्छ होते, त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात. ओटमील आणि ताकाचं मिश्रण नियमित लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच चेहऱ्याचा रंगही उजळतो.माॅश्चरायझर म्हणून ताकाचा उपयोग करताना ताक आणि ओटसचं घट्टसर मिश्रण करावं. हे मिश्रण चेहऱ्याला आणि मानेला लावावं. हे मिश्रण चेहऱ्याला आणि मानेला लावताना हलका मसाज करत लावावं. 4-5 मिनिटं मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर हा लेप वाळू द्यावा. लेप वाळल्यानंतर थंडं पाण्यानं चेहरा स्व्च्छ धुवावा.

Image: Google

3. ताकाचं टॅन रिमूव्हर

ताकामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ताक हे नॅचरल एक्सफोलिएटर म्हणून ओळखलं जातं. ताकामुळे चेहऱ्यावरील खराब आणि मृत त्वचा निघून जाते. नवीन त्वचा निर्माण होण्यास ताकातील घटक मदत करतात.  उन्हानं खराब झालेली त्वचा सुधरवण्यासाठी ताकाचा टॅन रिमूव्हरसारखा वापर करता येतो. यासाठी ताक, थोडं मध आणि थोडा कोरफडचा गर घ्यावा. मिस्करमधून किंवा ब्लेण्डरमधून तो एकजीव करुन घ्यावा.  या मिश्रणात थोडं गुलाब पाणी घालावं. हे मिश्रण चेहऱ्याला मसाज करत लावावं. मसाज झाल्यानंतर चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहरा रुमालानं रगडून न पुसता हळूवार टिपून घ्यावा. यामुळे त्वचेत निर्माण झालेली आर्द्रता सुरक्षित राहाते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी