सणावारांना आपण छान दिसावे, सगळ्यांमध्ये उठून दिसावे असे प्रत्येकीला वाटते. त्यासाठी आपण काही दिवस आधीपासूनच तयारीला लागतो. पार्लरच्या ट्रिटमेंटस, महागडी ब्यूटी प्रॉडक्ट्स आणि आणखी काही ना काही उपाय करुन आपण चेहरा नितळ आणि सतेज दिसावा यासाठी प्रयत्न करतो. पण इतके पैसे आणि वेळ घालवूनही आपल्याला म्हणावा तसा इफेक्ट मिळतोच असे नाही. फेशियल केल्यामुळे चेहरा उजळण्यास मदत होते आणि चेहऱ्याचा रक्तप्रवाहही सुरळीत होतो. मात्र घरच्या घरी काही सोपा उपाय केल्यास आपल्याला पार्लरसारखा ग्लो मिळू शकतो. त्यासाठी आपल्या घरात फक्त बटाटा असायला हवा. साधारणपणे आपल्याकडे बटाटा असतोच. बटाट्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, बी-६, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे आरोग्यासाठी उपयुक्त असणारे अनेक घटक असतात. इतकेच नाही तर बटाट्यात फॉस्फरस, फोलेट यांसारखे घटकही असतात. याच बटाट्याचा त्वचेसाठी कसा वापर करायचा ते पाहूया (Beauty Tips Facial Glow with Potato Home Remedies Ganpati Festival)...
१. दही आणि बटाटा
दही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि त्वचेतील जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. बटाटा मिक्सरमध्ये ग्राइंड करुन तो आणि थोडी हळद दह्यात घालावी. हे मिश्रण हाताने किंवा ब्रशने चेहऱ्यावर लावा. १५ मिनीटांनी चेहरा धुवून टाका, यामुळे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होईल.
२. कोरफड आणि बटाटा
बटाटा उकडून तो बारीक करा, त्यामध्ये कोरफडीचा गर घाला. ही पेस्ट चेहऱ्याला लावून १५ ते २० मिनीटांनी चेहरा धुवून टाका. या दोन्ही गोष्टींमुळे चेहरा क्लीन तर होतोच पण त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासही मदत होते.
३. तांदळाचं पीठ आणि बटाटा
एका वाटीत तांदूळ घेऊन त्याचे बारीक पीठ करा. हे पीठ थोडेसे जाडसर असलेले केव्हाही चांगले. यामध्ये उकडलेला बटाटा किंवा बटाट्याचा रस एकत्र करा. यामध्ये हवं तर थोडं दहीही घालू शकता. स्क्रबर म्हणून या पेस्टचा तुम्ही वापर करु शकता. चेहऱ्यावरची डेड स्कीन काढण्यासाठी तसेच स्कीन टायटनिंगसाठी याचा चांगला उपयोग होतो.
४. बटाट्याची सालं
तुमच्याकडे फेसपॅक किंवा असं काही करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर बटाट्याची सालं हा उत्तम उपाय ठरु शकतो. बटाट्याची सालं काढली की ती आपण फेकून देतो. असे न करता ही सालं चेहऱ्यावर ५ मिनीटांसाठी घासा आणि त्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यास मदत तर होईलच पण त्वचेचे क्लिंजिंग होण्यासही मदत होईल.