तुम्ही जाड असा नाहीतर बारीक, तुमची त्वचा तुमचे वय सांगते. सुरकुतलेला चेहरा, लोम्बणारी कातडी तुमचे वय लपवू शकत नाही. मात्र साठी, सत्तरीनंतर या गोष्टी स्वीकारता येतील, पण ऐन पन्नाशीत या वृद्धत्त्वाच्या खुणा त्रासदायक वाटू लागतील. त्यासाठी वेळीच काही उपाय केले तर दीर्घकाळ तारुण्य अनुभवता येईल आणि चेहऱ्यावरून तुमचे वयदेखील लपवता येईल.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपले स्वतःकडे पाहणे, काळजी घेणे, उपाय करणे होत नाही. मात्र, अकाली वृद्धत्त्वाच्या खुणा दिसू लागल्या की वाढत्या वयाची जाणीव होते. निसर्ग आपले काम करत राहणारच, पण काही बाबतीत आपण काळजी घेतली, तर नैसर्गिक रित्या आपण चेहऱ्यावरील लकाकी, मुलायमपणा आणि तजेलदारपणा जपू शकतो. त्यामुळे आरशात बघून नाराज होणे थांबवा आणि दिलेले उपाय करा.
सुरकुतलेली त्वचा घट्ट करण्याचे उपाय :
चांगल्या ब्रँडचे अँटी एजिंग क्रीम वापरणे कधीही चांगले. ते परवडत नसेल तर चांगले मॉइश्चरायझर वापरा ज्यामुळे त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात. हलका मसाज करा. हनुवटीपासून डोळ्यांच्या बाजूला उलट दिशेने मसाज केल्यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते. हातापायावरील त्वचा देखील सुरुकुतली असेल तर तिळाच्या, खोबऱ्याच्या तेलाने रोज रात्री मसाज करा. त्वचेचा पोत सुधारेल.
आधुनिक शस्त्रक्रिया :
सिने नट-नट्यांचे उजळलेले तुकतुकीत चेहरे पाहिले की आपल्या मनात अकारण वयाची तुलना येते. पण त्यांचे मेकअप विरहित चेहेरेसुद्धा शस्त्रक्रिया करून घेतलेले असतात. त्यात त्वचा सुरकुती मुक्त असावी यावर विशेष भर दिला जातो. त्या शस्त्रक्रियांची थोडक्यात माहिती घेऊ.
नॉन-इनवेसिव्ह प्रोसिजर: अशा प्रक्रियांमध्ये त्वचेवर कोणताही घाव किंवा जखम होत नाही. कधीकधी चेहऱ्यावर सूज किंवा लालसरपणा येऊ शकतो. अशा प्रक्रियेचे परिणाम हळूहळू दिसू लागतात आणि नैसर्गिक वाटतात. कोणत्याही त्वचा प्रकारासाठी ही शस्त्रक्रिया चांगली मानली जाते.
अल्ट्रासाऊंड: अल्ट्रासाऊंडचा वापर त्वचेमध्ये खोलवर उष्ण किरणे पाठवण्यासाठी केला जातो. उष्णतेमुळे शरीरात जास्त प्रमाणात कोलेजन तयार होते. त्यामुळे त्वचा सैल न पडता दीर्घकाळ टवटवीत राहते.
रेडिओ फ्रिक्वेन्सी: या प्रक्रियेमध्ये त्वचेवर एक उपकरण ठेवले जाते. जे चेहऱ्याच्या शिरांच्या आतील थरापर्यंत उष्णता प्रसारित करते. त्यामुळेही चेहऱ्याला नैसर्गिक लकाकी येते.
लेझर उपचार: काही लेझर आहेत जे त्वचेला इजा न करता आतील थरापर्यंत लेझर किरणं पोहोचवतात. जे त्वचा घट्ट होण्यास मदत करतात. सामान्यतः ही प्रक्रिया पोट आणि हाताच्या वरच्या भागाची त्वचा घट्ट करण्यासाठी केली जाते.
अनेकांना नॉन सर्जिकल ट्रीटमेंटचा फायदा होतो, जसे की -
- जे लोक धूम्रपान करत नाहीत किंवा त्यांनी धूम्रपान सोडले आहे.
- जे लोक अल्कोहोल कमी पितात.
- जे लोक त्यांच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करतात.
- ज्यांचे वजन संतुलित असते आणि आहार व्यवस्थित असतो.
मात्र, गरोदरपणात यापैकी कोणतीही शस्त्रक्रिया करू नये असे तज्ज्ञ सांगतात.