मागच्या एक ते दिड वर्षापासून अनेक जणींचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. शिवाय कोरोनाच्या भितीमुळे कुठे बाहेर जाणेही खूपच कमी झाले आहे. त्यामुळे मग साहजिकच घरीच रहायचे असल्याने केसांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. सकाळी एकदा केस विंचरले, की सरळ एका हाताने केसांना पिळ द्यायचा आणि गोल गोल करत वर अंबाडा बांधून टाकायचा, असे अनेक जणींचे सुरू असते. घरी राहणाऱ्या बहुतांश तरूणी आणि महिला अशीच हेअर स्टाईल करण्याला प्राधान्य देतात. केसांचा सतत असा उंच आणि घट्ट अंबाडा घालून ठेवला तर त्याचे काही फायदेही आहेत आणि तेवढेच तोटेही.
सतत अंबाडा घालून ठेवण्याचे धोके
१. सतत उंच आणि घट्ट अंबाडा घालून ठेवल्यामुळे तुमचे कपाळाच्या वरची जी हेअरलाईन आहे ती विरळ होऊ शकते. केस सतत टाईट बांधल्यामुळे हेअर लाईनच्या केसांवर ताण येतो आणि ते तुटू लागतात.
२. उंच अंबाडा सतत घालून ठेवल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. अनेकदा आपल्या केसांच्या अंबाड्यामुळे आपले डाेके दुखते आहे, हे देखील आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे सतत एकदम उंचावर अंबाडा बांधण्यापेक्षा कधी कधी थोडा खाली म्हणजेच डोक्याच्या मागच्या भागावर बांधावा.
३. केसांनाही कधी कधी मोकळे राहू द्या. जेव्हा तुम्ही अंबाड्याभोवती बांधलेला रबरबॅण्ड काढता, तेव्हा त्या रबरबॅण्डमध्ये अनेक केस अडकून पडलेले दिसतात. त्यामुळे केस सतत वर बांधून ठेवल्याने ते गळण्याचे प्रमाण कमी होते, असे वाटत असेल, तर तो तुमचा गैरसमज आहे.
उंच बन बांधण्याचे फायदे
१. कधी कधी गडबडीत असल्यावर मानेवर, पाठीवर असणाऱ्या केसांचीही अडचण वाटू लागते. अशा वेळी पटकन अंबाडा बांधून टाकल्यावर कामे सुचतात, असा बऱ्याच जणींचा अनुभव आहे.
२. अंबाडा बांधल्याने तुमच्या चेहऱ्याचे फिचर्स आणखी आखीव रेखीव आणि स्पष्ट दिसतात. त्यामुळे कधीतरी उंच अंबाडा घालायला हरकत नाही.
३. जॉलाईन अगदी स्पष्ट दिसणे हा देखील अंबाडा घालण्याचा फायदा आहे.