आपला चेहरा नितळ आणि अभिनेत्रींसारखा असावा यासाठी आपण सतत काही ना काही उपाय करत असतो. कधी घरच्या घरी काही गोष्टी करुन तर कधी पार्लरमध्ये जाऊन आपण आपले सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करतो. केसांच्या बाबतीतही तेच. केस लांबसडक, मुलायम असावेत यासाठी आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे तेल, हेअरपॅक किंवा आणखी काही करुन त्याचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आणखी एका उपायाने आपण त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवू शकतो (Beauty Tips),ते म्हणजे जवसाचं तेल. जवस आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे आपल्याला माहित आहे. अनेकदा हाडांच्या मजबूतीसाठी, हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी तसेच आरोग्याच्या विविध तक्रारींवरील रामबाण उपाय म्हणजे जवस. अनेकदा आहारतज्ज्ञ जवसाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आपल्याला देतात. त्याबरोबरच सौंदर्यासाठीही जवस फायदेशीर ठरतात. जे फिश ऑईलचा वापर करत नाहीत त्यांच्यासाठी जवसाचे तेल हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
जवसाच्या तेलाचे फायदे
१. जवसामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडस असतात. यातील अँटीइन्फ्लमेटरी गुण सूज कमी करण्यासाठी आणि बुद्धी चांगली राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. २. रक्तदाब कमी करण्यासाठी या तेलाचा अतिशय चांगला फायदा होतो. ३. वजन कमी करण्यासाठी हे तेल वापरणे फायदेशीर असते तसेच अँटी ऑक्सिडंट असल्याने शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा विकास कमी करण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. ४. या तेलामुळे तयार झालेल्या स्नायूंमुळे कॅलरीज जाळण्यासाठी शरीराला त्याचा उपयोग होतो. ५. हे तेल आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचा विशिष्ट प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. यामध्ये तेल किंवा जेल सप्लीमेंट कॅप्सूलचा वापर करता येईल.
केसांसाठी जवसाच्या तेलाचे फायदे
१. या तेलात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे केसांच्या मूळांना पोषण मिळण्यास मदत होते. २. केसगळती कमी व्हावी तसेच नवीन केस चांगले यावेत यासाठीही जवसाचे तेल उपयुक्त ठरते. ३. यामध्ये असणारा लेबनान हा घटक अँटीऑक्सिडंटप्रमाणे काम करत असल्याने केस मजबूत आणि चांगले यावेत यासाठी या तेलाचा उपयोग होतो. ४. ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे केसांतील कोंडा कमी होणे, केसगळती कमी होणे असे फायदे होतात. त्यामुळे केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी जवसाचे तेल आवर्जून वापरायला हवे.
त्वचेसाठी जवसाच्या तेलाचे फायदे
१. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी जवसाचे तेल उपयुक्त ठरते. २. या तेलात असलेल्या अँटी इन्फ्लमेटरी गुणांमुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते.३. आपली त्वचा कोरडी असेल तर ती तडतडते. पण जवसाचे तेल लावल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि कोरडेपणामुळे होणारी तडतड कमी होते. ४. त्वचा मुलायम राहावी यासाठी जवसाचे तेल चेहऱ्याला लावण्याचा अतिशय चांगला फायदा होतो. चेहऱ्याची जळजळ, कोरडेपणा कमी होण्यासाठी आणि पोत सुधारण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.