त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं याप्रश्नाचं उत्तर देताना त्वचाविकार तज्ज्ञ, सौंदर्यतज्ज्ञ सनस्क्रीन वापरावं असं आवर्जून सांगतात. सूर्याच्या अति नील किरणांचा थेट परिणाम त्वचेवर होतो. त्वचा खराब होते तसेच त्वचाविषयक अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे सनस्क्रीन वापरणं हा त्वचेच्या देखभालीतला महत्त्वाचा भाग आहे.
त्वचा जपण्यासाठी आपण कॉस्मेटिक्स स्वरुपात मिळणार्या सनस्क्रीनचा उपयोग करतो. पण आपल्या नैसर्गिक गोष्टीत सनस्क्रीनचे गुणधर्म आहेत जे आपल्याला माहितच नाही.शिवाय घरच्याघरीही आपण सनस्क्रीन तयार करु शकतो. सौंदर्यतज्ज्ञ सांगतात की तिळाचं तेल, खोबर्याचं तेल, टी ट्री ऑइल, बदाम आणि ऑलिव्ह ऑइल या तेलांमधे सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्याची क्षमता असते. याचा वापर आपण केल्यास वेगळ्या सनस्क्रीनची गरज भासत नाही. शिवाय घरच्याघरी आपण सनस्क्रीन लोशन तयार करुशकतो.
आपले नैसर्गिक सनस्क्रीन
छायाचित्र- गुगल
तिळाचं तेल
तिळाचं तेल त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतं. आंघोळ झाल्यानंतर दोन तीन थेंब तीळाचं तेल चेहेर्यास लावावं आणि काही थेंब तेल हाताला आणि मानेला लावावं. तिळाचं तेल उन्हात जाण्याआधी लावल्यास आपली त्वचा प्रखर सूर्यकिरणातही सुरक्षित राहाते. तिळाच्या तेलात असलेलं ई जीवनसत्त्व हे त्वचेचं सूर्याच्या अति नील किरणांपासून संरक्षण करतं. शिवाय तिळाच्या तेलामुळे आपली त्वचा हवेतील प्रदूषित घटकांपासूनही सुरक्षित राहाते.
खोबर्याचं तेल
खोबर्याच्या तेलाचा उपयोगही सनस्क्रीनसारखा करता येतो. खोबर्याच्या तेलामुळे त्वचा सुरक्षित तर राहातेच शिवाय त्वचेचं पोषणही होतं. त्वचेचं मॉश्चरायझिंग या तेलामुळे होतं. खोबर्याचं तेल त्वचेस लावल्यास त्वचा मऊ होते. त्वचेचा दाह होत असेल तर ही समस्याही खोबर्याच्या तेलानं बरी होते.
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल सनस्कीनसारखं त्वचेवर काम करतं. उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन जसं आपण लावतो तसं टी ट्री ऑइल लावावं. टी ट्री ऑइलमधे अँण्टिसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील खाज, फोड, घातक जिवाणू यावर उपाय करण्यास मदत होते.
छायाचित्र- गुगल
बदाम तेल आणि ऑलिव्ह ऑइल
बदामाचं तेल आणि ऑलिव्ह तेल आपल्या त्वचेचं सूर्याच्या अति नील किरणांपासून संरक्षण करतं. हे दोन्ही तेल आपण सनस्क्रीनसारखं त्वचेवर लावू शकतो.
घरच्या घरी सनस्क्रीन लोशन
बदाम आणि ऑलिव्ह तेलातील गुणधर्माचा त्वचेस फायदा होण्यासाठी एका काचेच्या वाटीत बदाम आणि ऑलिव्ह ऑइल सम प्रमाणात घ्यावं. तेवढंच नारळाचं पाणी त्यात घालावं. यात थोडं मधमाशीच्या पोळ्याचं मेण घालावं. हे बाऊल थोडं गरम केलेल्या पाण्यात ठेवावं. या मिश्रणात थोडं झिंक ऑक्साइड घालावं. या सर्व गोष्टी नीट मिसळून घ्याव्यात. उन्हात जाण्याआधी हे घरी तयार केलेलं लोशन सनस्क्रीन म्हणून लावल्यास त्याचा त्वचेचं संरक्षण होण्यास उपयोग होतो.