९० च्या दशकात फॅशन आणि ब्युटी या क्षेत्रात वेगाने बदल झाले. या काळात बॉलिवूडमधील हिरोईन्सनी जी फॅशन कॅरी केली ती सामान्य लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ़ॉलो केली गेली. ‘कुछ कुछ होता है’ मधील काजोलसारखी दोन शेडमधील साडी तर त्या दरम्यान जवळपास प्रत्येक स्त्रीने खरेदी केली. हेच नाही तर अभिनेत्रींचे ब्यूटी ट्रेंडही या काळात तरुणी फॉलो करु लागल्या. ऐश्वर्या रॉय, माधुरी दिक्षित, मनिषा कोईराला, राणी मुखर्जी, करीना-करीष्मा कपूर, काजोल यांसारख्या अभिनेत्रींनी तरुणींच्या मनावर राज्य केले. आज आपण असेच काही ब्युटी ट्रेंडस पाहणार आहोत जे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चित्रपटांमुळे खूप प्रसिद्ध झाले. यातील बहुतांश ट्रेंडस आपल्या घरातील मोठी बहिण किंवा आई ट्राय करत असल्याचे आपण जवळून पाहिले. पाहूया हे ट्रेंडस कोणते आणि ते का प्रसिद्ध झाले (Beauty Trends from the Nineties in Fashion Again)...
१. डार्क आणि कोरलेल्या आयब्रोज
या काळात आयब्रो डार्क आणि कोरलेल्या असण्याची फॅशन होती. अभिनेत्रींप्रमाणे आपल्याही आयब्रोज जाड आणि काळ्याभोर दिसाव्यात असं अनेकींना वाटायचं. यासाठी पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज केल्यानंतरही आयब्रोवरुन पेन्सिल फिरवण्याची फॅशन इन झाली.
२. ग्लॉसी लिप्स
ओठांना लिपस्टीक लावायची असते हे या काळातही सर्वश्रुत होते. मात्र या काळानंतर लिप ग्लॉस लावण्याची फॅशन आली. ओठ छान चमकावेत यासाठी विविध प्रकारचे लिप ग्लॉस वापरले जाऊ लागले.
३. ब्राऊन लिपस्टीक
लिपस्टीक म्हणजे लाल किंवा गुलाबी रंगाची असं गणित असणाऱ्या या काळात एकाएकी ब्राऊन रंगाची लिपस्टीक फॅशन इन व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर आजपर्यंत अनेक जणी अतिशय आवडीने ही शेड वापरतात.
४. लिप लायनर
९० च्या दशकात मुली आपले ओठ सुबक दिसावेत म्हणून लिप लायनर वापरायला लागल्या. अशाप्रकारे ओठांना हायलाईट केल्याने ओठ छान भरीव दिसतील असं आपल्याला क्वचितच वाटलं होतं. हो सिक्रेट समजल्यानंतर आपल्यापैकी अनेक जणी ओठांना लायनर वापरायला लागल्या.
५. ब्लू आयशॅडो
आयशॅ़डो म्हटलं म्हणजे आपल्याला गुलाबी, सिल्व्हर किंवा गोल्डन असे रंग समोर येतात. पण १९९० मध्ये निळ्या रंगाचे आयशॅडो लावण्याचा ट्रेंड आला आणि हा ट्रेंड आजही कायम आहे. आजही अनेक तरुणी निळं काजळ, आयशॅडो किंवा आय लायनर लावलेल्या दिसतात आणि विशेष म्हणजे हे फारच सुंदर दिसतं हे वेगळं सांगायला नको.