हल्ली बहुतांश जणी आपल्या स्किन केअर रूटीनबाबत जागरूक झाल्या आहेत. पण तरीही कधी कोणते ब्यूटी प्रोडक्ट वापरायचे, हे अनेकींच्या लक्षात येत नाही. अशीच गत आहे बाजारात उपलब्ध असणाऱ्या ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्सची. बाजारात खूप जास्त ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पण हे प्रोडक्ट्स वापरण्याचे योग्य वय कोणते याबाबत बऱ्याच जणींच्या मनात संभ्रम दिसून येतो.
ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स वापरण्याबाबत अनेकींच्या मनात गैरसमज आहेत. या प्रोडक्ट्सविषयी असणारा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे हे प्रोडक्ट्स वय वाढल्यावर, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि वाढत्या वयाची लक्षणे दिसू लागल्यावरच वापरावीत. असा विचार करून तुम्हीही चाळीशीनंतर किंवा त्यापेक्षाही नंतर ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स वापरण्याचा विचार करत असाल, तर सावधान. कारण याेग्य वयात जर हे प्रोडक्ट्स वापरल्या गेले तरच वय वाढल्यावर त्याचे चांगले परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतात.
का वापरावेत ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स?१. वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतर प्रत्येकाच्याच त्वचेमध्ये बदल दिसू लागतात. वाढत्या वयानुसार होणारे हार्मोनल चेंज यासाठी कारणीभुत ठरतात. वाढते वय तर रोखता येत नाही, पण वाढत्या वयासोबत दिसून येणारा एजिंग इफेक्ट रोखणे हे काही प्रमाणात आपल्या हातात आहे. यासाठीच तर ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्सची गरज असते.
२. सध्या प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदललेली आहे. या सगळ्या धांदलीत व्यवस्थित स्किन केअर रूटीन पाळणे, प्रत्येकीलाच शक्य नसते. म्हणूनच आपल्या त्वचेला योग्य पोषण मिळावे आणि त्वचा निरोगी रहावी, यासाठी ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स उपयुक्त ठरतात.
३. आज जवळपास सर्वच शहरांमध्ये प्रदुषणाची पातळी खूप जास्त वाढली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना स्वत:ची योग्य काळजी घेतली तरी उन, धुळ, धुर यांचा सामना आपल्या त्वचेला करावा लागतो. यामुळेही त्वचा लवकर डिहायड्रेट होते. लवकर थकून जाते आणि चेहरा लवकरच सुरकुतायला सुरूवात होते. ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स त्वचेतले हे बदल रोखू शकतात.
४. नुकत्याच झालेल्या काही सर्वेक्षणानुसार मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर यांच्याद्वारे निघणाऱ्या उजेडामुळे, रॅडिएशन्समुळेही त्वचेवर परिणाम होतो, असे सिद्ध झाले आहे. ज्यांना जास्त वेळ मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर यांच्यावर काम करावे लागते, त्यांची डोळ्यांजवळची त्वचा लवकर सुरकुतायला सुरूवात होते. त्यामुळे वेळीच ॲण्टीएजिंग प्रोडक्ट्स वापरणे कधीही चांगले.
ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स वापरण्याचे योग्य वय कोणते?साधारण २० व्या वर्षीपर्यंत आपल्या त्वचेला कोणतीच विशेष काळजी घेण्याची गरज नसते. त्यानंतर मात्र त्वचेचा पोत थोडाथोडा बदलू लागतो. २५ ते २८ या वयोगटात साधारणपणे प्रत्येकाच्याच त्वचेची एजिंग प्रोसेस सुरू होते. यावयात प्रोसेस सुरू होते आणि पस्तीशीनंतर ती चेहऱ्यावर दिसू लागते. त्यामुळे २५ ते २८ हे वय ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्सचा वापर सुरू करण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे, असे सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.
ॲण्टी एजिंग प्रोडक्ट्स वापरण्याचे फायदेत्वचेला हायड्रेटेड ठेवून तिची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्याचे काम या प्रोडक्ट्सद्वारे केले जाते. त्वचेची जी काळजी आपल्याला घेणे शक्य नसते, ती काळजी ॲण्टी एजिंग क्रिम्स घेतात आणि त्वचेला पोषण देतात.