आपण कसं दिसतो याबाबत मुली , महिला खूप जागरुक असतात. फॅशनच्या जगातले लेटेस्ट ट्रेण्ड फॉलो करुन आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात. मेकअपबाबत आग्रही रहातात. छान दिसण्यासाठी हे सर्व आवर्जून करणार्या एक महत्त्वाची गोष्ट करण्यास मात्र विसरतात. त्वचेची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्वचा हा शरीराचा सर्वात संवेदनशील आणि सौंदर्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक. त्वचेवर छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम होतो. आपण काय खातो, कधी खातो, कधी झोपतो, किती झोपतो, चेहेर्याला काय लावतो, काय लावत नाही, वातावरण , तणाव, अयोग्य जीवनशैली, कॉस्मेटिक्स, औषधं या सर्वांचा परिणाम होतो. त्यामुळेच त्वचेची काळजी घेणं ही सर्वात आवश्यक बाब आहे. पण त्याकडे अनेकजणींचं जाणता अजाणता दुर्लक्ष होतं. काही अशा चुका होतात ज्यामुळे त्वचा खराब होते आणि आपल्या चिंतेचं कारण बनते. सर्व ठीक चाललेलं आहे मग चेहेरा खराब का दिसतोय? याचं उत्तर सापडत नाही. खरंतर हे उत्तर असतं आपण करत असलेल्या काही चुकांमधे. या चुका सुधारल्यास त्वचा नक्कीच चांगली रहाते.
काय होतात चुका?
1. कुठेही जाताना किंवा अगदी घरात असतानाही आवर्जून मेकअप करणार्या मेकअप काढून टाकण्याच्या बाबतीत फार आळशीपणा करतात. मेकअप हा आपल्याला छान दिसायला मदत करतो. पण तो जर काढलाच नाही तर मात्र त्वचा खराब होण्याचं मुख्य कारण बनतं. मेकअप न काढता झोपणं ही चुकीची आणि धोकादायक सवय आहे. मेकअपमुळे चेहेर्याच्या त्वचेवरची रंध्र बंद होतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी चेहेर्यावरचा मेकअप काढून टाकावा.
2. चेहेरा स्वच्छ व्हावा यासाठी तीव्र स्वरुपाच्या साबणाचा वापर केला जातो. पण साबण चेहेर्याच्या त्वचेसाठी सर्वात हानिकारक असतो. साबणामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलही निघून जातं आणि त्वचा शुष्क होते. ही चूक दुरुस्त करण्यासाठी चेहेरा रेटिनॉलयुक्त क्लीन्जरनं धुवावा. या क्लीन्जरमुळे त्वचा कोरडी होत नाही.
3 दिवसभर त्वचेची झालेली हानी भरुन काढण्याचं काम रात्री होतं. त्यासाठी पोषक घटक आवश्यक असतात. पण केवळ क्लीन्जरनं चेहेरा स्वच्छ करुन त्यावर काहीच लावलं नाही तर त्वचेला पोषक घटक मिळत नाही. रात्री मॉइश्चरायझरसोबतच सीरम किंवा नाइट क्रीम लावणंही गरजेचं आहे. कारण मॉइश्चरायझर केवळ त्वचेस ओलावा देतो. पण नाइट क्रीममधे सॅलिसिलिक अँसिड आणि रेटिनॉल असतं. हे घटक त्वचा दुरुस्त करण्याचं काम करतात. त्यामुळे रात्री चेहेरा स्वच्छ करुन नाइट क्रीम किंवा सीरम लावावं.
4 ‘फ्रंटियर इन डर्मेटोलॉजी’त प्रसिध्द झालेल्या रिपोर्टनुसार जर झोप पुरेशी झाली नाही तर दिवसेंदिवस चेहेर्यावर एजिंगच्या खुणा दिसतात. कारण त्वचेचं आरोग्य जपणारे ग्रोथ हार्मोन्स हे गाढ झोपेतच सक्रिय होतात. पण जर सात तासांपेक्षा कमी झोपलं तर आपली झोप गाढ झोपेपर्यंत जातच नाही. आणि ग्रोथ हार्मोन्स सक्रिय होत नाही. म्हणूनच आपली झोप ही केवळ झोप असू नये तर ती ‘ब्यूटी स्लीप’असायला हवी.
5 पुरेसं पाणी पिणं ही किती सहज गोष्ट आहे. यात अवघड काहीच नाही. पण पाणी पिण्याच्या बाबतीत होणारा कंटाळा त्वचेचं नुकसान करतं. पाणी पुरेसं पिलं नाही तर शरीरात ओलावा निर्माण होत नाही. त्यामुळे त्वचेला वरुन कितीही मॉइश्चरायझर लावून ओलावा देण्याचा प्रयत्न केला तरी त्वचेला आतूनच पाणी मिळत नसल्यानं त्वचा कोरडीच राहाते. शरीरातील विषारी घटक पुरेसं पाणी प्यायलं तरच शरीराबाहेर पडतात. पुरेशा पाण्याअभावी ते शरीरात साठतात आणि त्वचेचं नुकसान करतात.
त्वचा उत्तम राखण्यासाठी
त्वचा चांगली होण्यासाठी वरील पाच चुका सुधारुन एक चांगली सवय स्वत:ला लावणं हे प्रत्येकीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी रात्री झोपण्याआधी फक्त दहा मिनिटं काढा. ‘नाइट टाइम स्किन केअर’ ही जेव्हा आपली सवय होईल तेव्हा त्वचा मनासारखी तजेलदार होईल.
नाइट टाइअ स्किन केअरसाठी आधी चेहेरा क्लीन्जरनं स्वच्छ करायला हवा. त्यानंतर चेहेर्याला टोनर लावावं. टोनरमुळे त्वचेवरील रंध्रांची स्वच्छता होते आणि ते बंद होतात. आणि त्यानंतर चेहेर्याला मॉश्चरायझर लावावं. आणि मग नाइट क्रीम लावावं. ही सवय लावण्यात जर आळशीपणा केला तर आपली त्वचा स्वत:हून दुरुस्त होत नाही आणि ती दिवसेंदिवस खराब होते. त्वचा जर नैसर्गिकरित्याच खराब झाली तर मग तिला मेकअपखाली किती झाकणार?