प्रसिध्द अमेरिकन गायिका केटी पेरीचा अमेरिकन आयडॉल या कार्यक्रमाच्या स्टेजवरचा लूक समाज माध्यमांवर खूपच व्हायरल होत आहे. हा लूक व्हायरल होण्यामागचं कारण तिने टिंकर बेल या डिस्ने कॅरेक्टरसारखा पोषाख आणि मेकअप केला होता हे नव्हतं. तर त्याचं कारण होतं तिच्या भुवया. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेला तिचा फोटो बघितला तर कोणाला तिच्या भुवया दिसतही नाहीये. आणि तरीही तिचा लूक व्हायरल होण्यामागचं कारण भुवया कसं काय? तिच्या सहजपणे न दिसणाऱ्या भुवया हेच तिच्या लूकचं विशेष आहे. तिनं आपल्या भुवया ब्लिच केल्यामुळे त्या असूनही दिसत नाहीये. तिचा हा लूक बघून नेटिझन्सनं त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणाला तिचा हा लूक खूप आवडला तर कोणी भुवया सोडून बाकी तू खूप छान दिसत आहे असंही म्हणालं. तर अनेकांनी हे काय? विचित्र आणि भयंकर दिसत असल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या आहेत.मूद्दा केटी पेरीला तिच्या लूकवर काय प्रतिक्रिया मिळाल्या हा नसून ब्लिच आयब्रो हा आहे. ब्लिच आयब्रोज हा ट्रेण्ड अनेकींना नवीन वाटत असेल पण तिकडे पाश्चिमात्य देशात, हॉलिवूडमधे हा ट्रेण्ड जवळ जवळ २०१७ मधेच आला होता. हॉलिवूडमधील लेडी गागा , किम कर्दाशिअन यांनी ब्लिच आयब्रोज या ट्रेण्डला ओळख मिळवून दिली. लंडन, मिलान फॅशन वीकमधे ब्लिच आयब्रोज हा ब्यूटी ट्रेण्ड म्हणून गाजला आणि आता पुन्हा केटी पेरीच्या व्हायरल लूकमुळे ब्लिच आयब्रो हा ट्रेण्ड चर्चेत आला आहे.
काय आहे हा ब्लिच आयब्रोज ट्रेण्ड?- आतापर्यंत भुवया छान ठसठशीत, उठावदार, गडद दिसण्यासाठी प्रयत्न व्हायचे. पण ब्लिच आयब्रो ट्रेण्डमधे भुवया फिकट रंगाच्या, सहज लक्षात न येणाऱ्या केल्या जातात. आयब्रो ब्लिचिंग ही संकल्पना फारशी ऐकीवात आणि पाहण्यात नसली तरी ती खूप काळापासून अस्तित्त्वात आहे. चेहेऱ्यावरील केस जे काढून न टाकता त्यांना फिकट करण्यासाठी चेहेऱ्यावर ब्लीचिंग केलं जातं त्याचप्रमाणे गडद भुवया फिकट करण्यासाठी भुवया ब्लीच केल्या जातात. ब्यूटी पार्लरमधे जाऊन किंवा घरी आयब्रो ब्लिच किट आणून घरच्याघरीही आयब्रो ब्लिच करता येतात.- आयब्रो ब्लिचमधे असलेल्या हायड्रोजने पेरॉक्साइडमुळे भुवया फिकट छटेच्या होतात. ब्लीचिंगमुळे भुवयांमधील रंगद्रव्यांची साखळी तुटते आणि भुवया ब्लिच होतात. मध्यम काळ्या/ तपकिरी रंगाच्या भुवया असणारे भुवया ब्लिच करु शकतात असं सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात. जर भुवयांचा रंग गडद असेल तर ब्लिच करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण ब्लिचिंगमुळे भुवयांचा रंग विचित्र दिसेल इतका बदलू शकतो. घरच्याघरी आयब्रो ब्लिच करताना किटवर दिलेली माहिती नीट वाचून त्याप्रमाणे कृती करणं आवश्यक असतं. आपल्याला आपल्या भुवया किती शेड फिकट करायच्या आहे त्यानुसार भुवयांवर ब्लिच ठेवायचं असतं. खूप वेळ भुवयांवर ब्लिच लावून ठेवलं तर नो आयब्रो लूक येण्याचा धोका असतो. साधारणत: आयब्रो ब्लिच करताना एक दोन शेड फिकट होईल इतका वेळ ब्लिच ठेवणं योग्य मानलं जातं.
- एकदा ब्लिचिंग केल्यावर चार ते सहा आठवडे त्याचा परिणाम भुवयांवर टिकून राहातो. पण त्यानंतर मात्र ब्लिचचा प्रभाव कमी होतो. तसेच भुवया वाढल्या की वाढलेले केस मूळ रंगाचे आणि छटांचे दिसतात. त्यामुळे मधून मधून आयलायनर ब्रशच्या सहाय्यानं आयब्रो ब्लिच टचअप करणं आवश्यक असतं.
-आयब्रो ब्लिच केल्यामुळे आपल्या लूकमधे मोठा बदल झालेला दिसून येतो. वयाच्या चाळीशीनंतर आयब्रो ब्लिचचा उपयोग प्रामुख्यानं होतो. कारण भुवयांमधे पांढरे केस येण्याची शक्यता असते. हे पांढरे केस लपवण्यात आयब्रो ब्लिचची मदत होते. आपल्या वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी आयब्रो ब्लिचचा उपयोग होतो.
-आयब्रो ब्लिचचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुळातच आयब्रो ब्लिचमधे असलेल्या पेरॉक्साइड, अमोनिआ या घटकांमुळे त्वचा आणि केसांवर वाईट परिणाम होऊ शकतात. तसेच आयब्रो ब्लिचमुळे भुवयांवरही वाईट परिणाम होण्याचा संभव असतो. आयब्रो ब्लिचमुळे भुवयांभोवतीच्या त्वचेवर रिअॅक्शन येण्याचा संभव असतो. शिवाय या ब्लिचचा भुवयांवर दिसणारा परिणाम हा तात्पुरता असतो. मधून मधून टचअप काळजी घ्यावीच लागते. याबाबतीत कंटाळा केला तर भुवयांच्या वाढलेल्या केसांचा मूळ रंग आणि ब्लीच भुवया यामधील विरोधाभास विचित्र दिसतो. शिवाय ब्लिच जर जास्त वेळ ठेवलं गेल तर 'नो आयब्रो' चा विचित्र लूक येण्याचा संभवही असतोच!