Lokmat Sakhi >Beauty > सुंदर मी होणार! - पण म्हणजे नक्की काय होणार? काय म्हणजे सुंदर असणं?

सुंदर मी होणार! - पण म्हणजे नक्की काय होणार? काय म्हणजे सुंदर असणं?

टीनएजर होता होता ‘सौंदर्य’ नावाची चेटकीण कधी  मानेवर बसली आणि कधी तिनं आपल्या संपूर्ण आयुष्याचा तिने ताबा घेतला हे समजलंही नाही.. ती सुंदर दिसण्याची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 01:02 PM2021-04-16T13:02:30+5:302021-04-16T13:10:46+5:30

टीनएजर होता होता ‘सौंदर्य’ नावाची चेटकीण कधी  मानेवर बसली आणि कधी तिनं आपल्या संपूर्ण आयुष्याचा तिने ताबा घेतला हे समजलंही नाही.. ती सुंदर दिसण्याची गोष्ट.

being beautiful! -what is beautiful? what is beauty? | सुंदर मी होणार! - पण म्हणजे नक्की काय होणार? काय म्हणजे सुंदर असणं?

सुंदर मी होणार! - पण म्हणजे नक्की काय होणार? काय म्हणजे सुंदर असणं?

Highlightsचेहेऱ्यावरचा पिंपल डाग न पडता घालवणं याच्याइतकं महत्वाचं आयुष्यात काहीही उरलं नाही..

गौरी पटवर्धन

सर्वसाधारणपणे वय दहा -बारा असेपर्यंत मुली-मुलं सगळ्यांचीच  मानसिकता ही जेवढं खेळायला मिळेल तेवढं बरं अशी असते. खेळण्याचा वेळ इतर कशासाठीही वापरणं म्हणजे तो वाया घालवणं याबद्दल आपल्या मनात कुठलीही शंका नसते. म्हणजे फ्रॉकचा पट्टा सुटला तर तो पुन्हा बांधणं यात वेळ वाया जातो. वेणी सुटली किंवा केस सारखे डोळ्यावर यायला लागले तर मातीचे हात धुवून घरात जाऊन परत केस बांधून हेअरबँड शोधून तो लावून परत बाहेर येऊन खेळ सुरु करायचा. असला बावळटपणा आपण दहा वर्षांच्या आधी करतच नाही. केसात आणि चेहेऱ्यावर माती लागलेली असणं हेच नॉर्मल असतं. किंवा आत्ता ज्या सगळ्याजणी पंचविशीच्या पुढे आहेत त्यांच्या लहानपणी तरी हीच परिस्थिती होती.
रस्त्यात सापडलेले चमकणारे दगड, मैत्रिणीने दिलेले खारे शेंगदाणे आणि आईकडून मिळवलेली आमसुलं किंवा खारवलेली चिंच हा सगळा ऐवज फ्रॉकच्या एकाच खिशात ठेवणं, त्यामुळे आमसूल खातांना कचकच लागणं, खडे चिकट होणं, त्या सगळ्याचा एक भीषण रंगाचा डाग पडणं, त्यामुळे आईने धपाटे देणं आणि ते धपाटे पूर्णपणे विसरून दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्रॉकच्या खिशात गुळाचा खडा ठेवणं याच्याइतकं महत्वाचं काहीही नव्हतं.

 

मात्र एकीकडे आपण ही सगळी मजा करत असतांना आपल्या मोठ्या बहिणी, शेजारी राहणाऱ्या ताया, नवीन लग्न झालेल्या वहिन्या, माम्या, नुकतं लग्न ठरलेल्या किंवा ठरण्याच्या वयाच्या आत्या, मावश्या या सगळ्याजणी तासचे तास आरशासमोर उभं राहून जो वेळ घालवतात त्याच्याइतकं बावळटपणाचं काहीही नाही याबद्दल आपल्याला काहीच शंका नव्हती. कधी नव्हे ते या बाबतीत आई, आजी आणि आपण यात एकमतसुद्धा होतं.
आपल्याला कधीही भाव न देणाऱ्या ताईने केवळ मैत्रीण अव्हेलेबल नाही म्हणून आपल्याला ‘हा दुपट्टा जास्त मॅच होतोय का तो?’ असं विचारलं, की आपली गोची व्हायची. आपल्यालाही समजतं हे सिद्ध करण्यासाठी आपण त्यातला एक दुपट्टा सिलेक्ट करायचो, पण ते सगळं नेमकं कशाशी मॅच करायचं होतं याचा आपल्याला थांगपत्ता नसायचा.
पण सगळ्यांच्याच आयुष्यात येतात तशी ‘टीन एज’ ची वर्षं आपल्याही आयुष्यात आली, आणि आपण अलगद त्या तायांच्या पार्टीत अलगद जाऊन बसलो. इतके अलगद की आपल्याला ते काय, कधी आणि कसं झालं ते समजलंही नाही. पण हळूचकन खिशात आमसुलं ठेवणाऱ्या, माती लागलेल्या केसांच्या बटा मातीच्याच हातांनी सावरत खेळत राहणाऱ्या पोरी बावळट वाटायला लागल्या. आत्ताआत्तापर्यंत आई काढून देईल ते कपडे बिनबोभाट घालणाऱ्या आपल्याला आईचा फॅशन सेन्स मायनसमध्ये आहे हे नीट लक्षात यायला लागलं. चेहेऱ्यावरचा पिंपल डाग न पडता घालवणं याच्याइतकं महत्वाचं आयुष्यात काहीही उरलं नाही, आणि बघता बघता ‘सौंदर्य’ नावाची चेटकीण कधी आपल्या मानेवर बसली आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचा तिने ताबा घेतला ते आपल्याला समजलंच नाही.
आपण सुंदर व्हायचं ठरवतो हा तो काळ, पण सुंदर व्हायचं म्हणजे काय व्हायचं हे काही कळतच नाही.
 

Web Title: being beautiful! -what is beautiful? what is beauty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.