Join us  

केस आणि त्वचेसाठीही अत्यंत गुणकारी शेवग्याचा पाला, ५ फायदे -शेवग्याच्या पाल्याची पाहा जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2022 10:25 AM

Benefits of Drumstick Moringa and its Leaves for Skin and Hair : शेवग्याचा फेस मास्क, हेअर मास्क आणि स्क्रब म्हणून उपयोग होतो.

ठळक मुद्देत्वचेची बंद झालेली रंध्रे यामुळे ओपन होतील आणि त्वचा चमकदार होण्यास याची चांगली मदत होईल. केवळ चेहराच नाही तर संपूर्ण शरीराला तुम्ही हे स्क्रब लावू शकता. 

शेवगा ही देवाने आपल्याला दिलेली अतिशय उत्तम अशी देणगी आहे. शेवग्याची फुले, पाने आणि शेवगा अशा सगळ्याच गोष्टी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. एखादे दुखणे कमी करण्यापासून ते स्नायूंची ताकद वाढवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी शेवगा अतिशय उपयुक्त मानला जातो. बीपी आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर समस्यांसाठी शेवग्याचे सूप किंवा शेवग्याची फुले आणि पानांची भाजी अतिशय उत्तम काम करते. इतकेच नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर असणारा शेवगा आपली त्वचा आणि केसांसाठीही अतिशय फायदेशीर असतो. शेवग्याचा फेस मास्क, हेअर मास्क आणि स्क्रब म्हणून उपयोग होतो. हे सगळे घरच्या घरी अगदी सहज बनवता येण्यासारखे असून त्याचा नियमित वापर केल्यास काही दिवसांत आपल्याला त्याचा फरक दिसून येईल (Benefits of Drumstick Moringa and its Leaves for Skin and Hair). 

फायदे

१. शेवग्याच्या बियांपासून निघालेले तेल व्हिटॅमिन ए, सी आणि ई यांनी युक्त असल्याने केस आणि त्वचा दोन्हींसाठी ते अतिशय उपयुक्त असते. 

२. शेवग्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचेला फ्री रॅडीकल्सपासून वाचवतात आणि त्वचा अधिक तरुण राहावी यासाठी मदत करतात. 

३. शेवग्यामध्ये फोलिक अॅसिड आणि अमिनो अॅसिड चांगल्या प्रमाणात असल्याने त्वचा आणि केस हायड्रेटेड राहावेत यासाठी शेवगा फायदेशीर ठरतो. 

४. निस्तेज त्वचा सतेज होण्यासाठी शेवगा फायदेशीर असतो. कारण यामध्ये संत्र्यापेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. 

५. शेवग्याच्या पानांना विशिष्ट गंध नसल्यानं चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी शेवग्याच्या पानांचा उपयोग त्वचेसाठी सुरक्षित आणि फायदेशीर समजला जातो. 

केसांसाठी मास्क कसा बनवाल?

शेवग्याच्या वाळलेल्या पानांची पावडर किंवा शेवग्याच्या ताज्या पानांची पेस्ट तयार करा. यामध्ये दही आणि आवळा पावडर घाला. हे मिश्रण केसांच्या मुळांशी हळूहळू मसाज करत लावा. अर्धा तास तसेच ठेवून मग केस धुवून टाका. यामुळे केसांची वाढ तर होईलच पण केसांतील आर्द्रता टिकून राहण्यासही याचा चांगला उपयोग होईल. 

शेवग्याचा स्क्रब 

शेवग्याच्या पानांची वापडर ओटसमध्ये मिक्स करा आणि यामध्ये गुलाबपाणी घाला. डोळ्याचा भाग सोडून बाकी चेहऱ्यावर हे स्क्रब लावा. निस्तेज आणि संवेदनशील त्वचेसाठी हा स्क्रब अतिशय उपयुक्त असतो. केवळ चेहराच नाही तर संपूर्ण शरीराला तुम्ही हे स्क्रब लावू शकता. 

शेवग्याचा फेस मास्क

फेस मास्कसाठी मुलतानी मातीमध्ये शेवग्याच्या पानांची पावडर एकत्र करा. ही पावडर चेहऱ्यावर लावून काही वेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. त्वचेची बंद झालेली रंध्रे यामुळे ओपन होतील आणि त्वचा चमकदार होण्यास याची चांगली मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी