थंडी पडून आता बरेच दिवस झाले येत्या काळात तर हा जोर वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. थंडीमुळे हवेत आणि शरीरातही शुष्कता आल्याने त्वचा आणि केस कोरडे पडण्यास सुरुवात होते. अशावेळी आपण केसांचे आणि त्वचेचे मॉईश्चर टिकून राहावे म्हणून आपण चेहऱ्याला मॉईश्चरायजर किंवा तेलाने मसाज करतो. अनेकदा त्याचाही म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. अशावेळी आहारातून शरीराला योग्य पद्धतीने पोषण मिळाले तर त्वचा मुलायम राहण्यास मदत होते (Benefits of Fruits to Deal With Dry Skin In Winter).
त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासाठी, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी आहारात काही गोष्टींचा अवश्य समावेश करायला हवा. थंडीच्या दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात फळं उपलब्ध असल्याने आहारात आणि चेहऱ्याला लावण्यासाठी काही फळांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. त्यामुळे त्वचा तर चांगली राहतेच पण आरोग्यासाठीही त्याचे फायदे होतात. पाहूयात कोणती फळं आवर्जून खायला हवीत ...
१. संत्री
या काळात बाजारात संत्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. संत्र्यामध्ये असणारे सी व्हिटॅमिन आणि पाण्याचे प्रमाण यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. खाण्याबरोबरच संत्र्याचा फेसपॅकही चेहऱ्यासाठी फायदेशीर असतो.
२. केळी
केळं हे कोणत्याही सिझनमध्ये आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारे फळ आहे. थंडीच्या दिवसांत होणारी बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी केळ्याचा चांगला उपयोग होतो. आहारात घेण्याबरोबरच केळ्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास त्वचेतील मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते.
३. पपई
पपईमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि इतरही अनेक घटक असतात. तसेच थंडीच्या दिवसांत पपई उष्ण असल्याने पपई आवर्जून खायला हवी. तसेच पपईचा गर चेहऱ्याला लावल्यास त्याचा चेहरा उजळण्यासाठी आणि सुरकुत्या कमी होण्यासाठीही अतिशय चांगला उपयोग होतो.
४. डाळींब
डाळींब पचनाच्या विविध तक्रारींवसाठी अतिशय उत्तम उपाय आहे. पोट साफ असेल तर चेहरा ग्लोईंग दिसण्यास मदत होते. दररोज डाळींबाचे दाणे खाल्ल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होते. तसेच डाळींबाच्या रसाचा फेस मास्क म्हणूनही आपण उपयोग करु शकतो.