शेवग्याचं झाड (moringa tree) म्हणजे आरोग्यासाठी वरदानच. आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका टाळण्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या पानांचा (moringa in diet) आहारात समावेश केला जातो. आरोग्यासाठी फायदेशीर असलेला शेवगा त्वचेवर चमक येण्यासाठी आणि केस दाट होण्यासाठीही (moringa for skin and hair care) फायदेशीर असतो. त्वचा आणि केसांसाठी शेवग्याची पानं म्हणजे वंडर ग्रीनच. नैसर्गिक सौंदर्य तज्ज्ञ सुनयना वालिया यांनी शेवग्याच्या पानांचा त्वचा आणि केसांसाठी कसा उपयोग करावा (how to use moringa leaves for skin and hair) याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
Image: Google
सुनयना सांगतात शेवगा म्हणजे आरोग्यासाठी मॅजिक ट्री. शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पानं ही सुपरफूड आहे. यामुळे शरीराची ऊर्जा वाढते, मूड चांगला होतो तसेच शेवग्याच्या पानांमुळे त्वचा आणि केस छान होतात. त्वचा आणि केसांसाठी शेवग्याच्या पानांसोबतच शेवग्याच्या बियांचाही उपयोग होतो. शेवग्याच्या बियांच्या तेलामध्ये अ, क आणि ई जीवनसत्वं असतात. त्वचेतला ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी शेवग्याच्या बियांच्या तेलाचा उपयोग होतो. शेवग्याच्या पानांना विशिष्ट गंध नसल्यानं चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी शेवग्याच्या पानांचा उपयोग त्वचेसाठी सुरक्षित आणि फायदेशीर समजला जातो. शेवग्यामध्ये क्वेरसेटिन आणि जेटिन अशी अनेक ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात जी त्वचेचं मुक्त मुलकांपासून (फ्री रॅडिकल्स) संरक्षण करतात. शेवग्यातील या गुणधर्मामुळेच चेहेऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात आणि त्वचेचा पोत सुधारतो.
शेवग्यामध्ये ओलिक आणि अमीनो ॲसिड विपूल प्रमाणात असतात. यामुळे त्वचा आणि केसातली आर्द्रता टिकते. निस्तेज त्वचेवर शेवग्यामुळे तेज येतं. शेवग्यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यानं चेहेऱ्यावरील काळे डाग, चेहेऱ्याचा काळपटपणा घालवण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरतो. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी शेवग्याचा उपयोग फायदेशीर आणि सुरक्षित ठरतो.
Image: Google
केस आणि त्वचेसाठी शेवग्याचा उपयोग
1. केसांसाठी शेवग्याच्या पानांची पावडर आणि आवळा पावडर एकत्रित करुन हेअर मास्क तयार करता येतो. नुसती शेवग्याच्या पानांची पावडर थोड्या दह्यामध्ये कालवून केसांना लावली तरी चालते किंवा त्यात हवी असल्यास आवळा पावडर घातली तरी चालते. शेवगा आणि दह्याच्या एकत्रित उपयोगानं केसांची मुळाची त्वचा स्वच्छ होते, तेथील विषारी घटक बाहेर पडतात. केसांचं पोषण करण्यासाठी , केसांची वाढ होण्यासाठी शेवग्याच्या पानांच्या पावडरचा हेअर मास्क फायदेशीर ठरतो. या हेअर मास्कमुळे डोक्यातला कोंडा, खाज यासारख्या समस्याही दूर होतात.
2. शेवग्यातील गुणधर्मांचा त्वचेला लाभ होण्यासाठी शेवग्याच्या बियांच्या तेलाचा त्वचेसाठी वापर करावा. शेवग्याच्या बियांच्या तेलानं त्वचा आणि केसांना मसाज केल्यास फायदा होतो. फाटलेल्या ओठांवर शेवग्याचं तेल लावल्यास ओठ मऊ होतात. इसब, सोरायसिस आणि डर्मेटाइटिस या त्वचाविकारातही शेवग्याच्या बियांचं तेल गुणकारी ठरतं.
Image: Google
3. चेहेऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी शेवग्याच्या पानांच्या पावडरचा उपयोग होतो. यासाठी 1 चमचा शेवग्याच्या पानांची पावडर, 1 चमचा ओट्मील पावडर आणि गुलाब पाणी घ्यावं. हे सर्व एकत्र करुन पाण्याच्या सहाय्यानं याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट डोळ्यांचा भाग सोडून संपूर्ण चेहेऱ्याला हलका मसाज करत लावावी. चेहेऱ्यावरचा लेप सुकला की बोटं पाण्यानं ओली करुन त्याने चेहेऱ्यावर हलका मसाज करत लेप काढावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
4. त्वचेला थंडावा आणि पोषण देण्यासाठी शेवग्याच्या पानांच्या पावडरचा उपयोग होतो. यासाठी थोडी शेवग्याच्या पानांची पावडर आणि थोडी मुल्तानी माती एकत्र करावी. त्यात कोरफड जेल किंवा ताज्या कोरफडीचा गर घालावा. हे सर्व एकजीव करुन लेप चेहेरा आणि मानेस लावावा. या लेपानं त्वचेवरील मोठी झालेली रंध्रं लहान होतात आणि त्वचेवर चमक येते.