Join us

गरम पाण्यात तुरटी टाकून पाय धुतल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज कराल हा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:11 IST

Alum for Feet : गरम पाण्यात तुरटीचा एक तुकडा टाकून पाय धुतल्यास आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊ फायदे...

Alum for Feet : अनेकांना माहीत नसेल पण तुरटीचा वापर त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर ठेवण्यासाठी आणि त्वचा सुंदर करण्यासाठी केला जातो. तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे तुमच्या अनेक समस्या दूर करतात. बरेच लोक तुरटीचं पाणी पितात. तर काही लोक आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवतात. पण अनेकांना हे माहीत नसेल की, तुरटीच्या पाण्यानं नियमितपणे पाय धुतले तर अनेक फायदे मिळू शकतात. गरम पाण्यात तुरटीचा एक तुकडा टाकून पाय धुतल्यास आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊ फायदे...

पायांची दुर्गंधी जाईल

वेगवेगळ्या कारणानं येणाऱ्या पायांच्या दुर्गंधीमुळे अनेकदा चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. अशात तुरटीच्या पाण्यात थोडावेळ पाय ठेवून बसल्यास पायांची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. पायांमध्ये घाम आणि बॅक्टेरियामुळे दुर्गंधी येते. अशात जेव्हा तुम्ही तुरटीच्या पाण्यानं पाय धुता तेव्हा बॅक्टेरियाची समस्या दूर होते. त्यामुळे दुर्गंधी येत नाही.

शरीराचा थकवा होईल दूर

दिवसभर वेगवेगळी कामं करून शरीरात थकवा येतो. अशात तुरटीच्या गरम पाण्यात पाय ठेवून थोडावेळ बसाल तर तुम्हाला आराम मिळेल. थकवा दूर होईल आणि तुम्हाला चांगली झोपही लागेल. थकवा दूर झाला तर तुम्हाला फ्रेशही वाटेल.

वेदना होतील कमी

तुरटीमध्ये वेदना दूर करणारे गुण असतात. काही कारणानं जर तुमच्या शरीरात आणि पायांमध्ये वेदना होत असेल तर झोपण्याआधी तुरटी टाकलेल्या गरम पाण्यात पाय ठेवून बसा. शरीर आणि पायांचं दुखणं यानं कमी होईल. सोबत थकव्यामुळेही होणारी वेदना दूर होईल. 

पायांची सूज कमी होईल

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यानं, जखम झाल्यानं किंवा इतर काही कारणानं पायांवर सूज येते. अशात तुरटीचं पाणी प्रभावी उपाय ठरू शकतं. गरम पाण्यात थोडी तुरटी टाका. यात पाय ठेवू बसा. यानं पायांवरील सूज कमी करण्यास मदत मिळेल.

इन्फेक्शन होईल दूर

तुरटीमध्ये अनेक गुण असतात, जे पायांवरील इन्फेक्शन दूर करण्याचं काम करतात. पायांमध्ये होणारी खाज, रॅशेज तुरटीच्या पाण्यानं दूर होतात. तसेच टाचांना भेगा पडल्या असतील तर तुरटीच्या पाण्यानं डेड स्कीन साफ होते आणि भेगाही भरल्या जातात. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स