आपण कायम तरुण दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. त्यामुळे जसं वय वाढतं तसं स्त्रिया आपल्या दिसण्याबाबत जास्त जागरुक होत जातात असे म्हणतात. पण ठराविक वयानंतर चेहरा वयस्कर दिसायला लागतो आणि आपल्यातला तो कोवळेपणा कुठेतरी हरवून बसतो. वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी आपण कधी पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रीटमेंटस करतो तर कधी बाजारात मिळणारी महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही (Best Skincare Tips How To look young) .
अनेकदा ऐन पस्तिशीतच चेहऱ्यावरच्या सुरकुत्या इतक्या वाढतात की आपल्याला काय करावे ते कळत नाही. आपले वय वाढते त्याप्रमाणे त्यात बदल होत जातात आणि नकळतपणे हे बदल आपल्या बाह्यरुपाने आपल्याला दिसायला लागतात. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी नेमकं काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यासाठीच काही उपयुक्त असे उपाय आज आपण पाहणार आहोत. हे उपाय केल्यास आपल्याला आतून फ्रेश वाटेल आणि चेहऱ्यावर तारुण्यही झळकेल. काय आहेत हे उपाय पाहूया...
१. पाणी पिणे
पाणी हे आपल्या एकूणच आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पाण्याने शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. इतकेच नाही तर त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यासाठी पाण्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे त्वचा कायम ग्लोईंग राहावी असे वाटत असेल तर दिवसातून किमान ८ ते १२ ग्लास पाणी आवर्जून प्यायला हवे.
२. व्यायाम
शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर पडण्यासाठी व्यायाम हे उत्तम माध्यम आहे. व्यायामामुळे येणाऱ्या घामाने शरीरातील नको असलेले घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून किमान अर्धआ तास चालणे, सायकलिंग, योगा, जिम, अॅरोबिक्स असा शक्य असेल तो कोणता ना कोणता व्यायाम अवश्य करा.
३. सनस्क्रीन लोशन
सकाळी ११ ते दुपारी ४ या दरम्यान अतिनील किरणे तीव्र असतात. यामुळे त्वचेवर खाज येणे, पुरळ येणे किंवा त्वचा कोरडी पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यासाठीच घराबाहेर पडताना न विसरता सनस्क्रीन लोशन लावायला हवे. आपण वापरत असलेल्या सनस्क्रीनचा एसपीएफ किमान ३० असायला हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
४. आहाराकडे लक्ष द्यायला हवे
विविध प्रकारच्या बिन्स, गाजर, बीट यांसारखी कंदमुळे, पालेभाज्या, बेरीज यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. अँटीऑक्सिडंट असलेली फळे आणि इतर पदार्थ तसेच व्हिटॅमिन ई आणि सी असलेले पदार्थही आहारात जास्त प्रमाणात घ्यायला हवेत. यामुळे त्वचेच्या समस्या काही प्रमाणात कमी होतात आणि आपण तरुण दिसायला मदत होते.