Lokmat Sakhi >Beauty > कळीदार कपूरी पान.. विड्याचे पान खुलवेल चेहऱ्याचे सौंदर्य, 5 प्रकारे लावा 'पान पॅक'- त्वचा नितळ

कळीदार कपूरी पान.. विड्याचे पान खुलवेल चेहऱ्याचे सौंदर्य, 5 प्रकारे लावा 'पान पॅक'- त्वचा नितळ

विड्याच्या पानानं चेहऱ्यावर खुलते सौंदर्याची कळी; 5 प्रकारे चेहऱ्याला लावता येतं विड्याचं पान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 04:37 PM2022-04-12T16:37:53+5:302022-04-12T16:48:01+5:30

विड्याच्या पानानं चेहऱ्यावर खुलते सौंदर्याची कळी; 5 प्रकारे चेहऱ्याला लावता येतं विड्याचं पान

Betel leaves use as home remedy for beauty problems.. 5 ways of getting benefits of betel leaves for beauty. | कळीदार कपूरी पान.. विड्याचे पान खुलवेल चेहऱ्याचे सौंदर्य, 5 प्रकारे लावा 'पान पॅक'- त्वचा नितळ

कळीदार कपूरी पान.. विड्याचे पान खुलवेल चेहऱ्याचे सौंदर्य, 5 प्रकारे लावा 'पान पॅक'- त्वचा नितळ

Highlightsविड्याच्या पानाच्या लेपानं त्वचेत ओलसरपणा निर्माण होवून त्वचा मऊ मुलायम होते. त्वचेवरील तेलकटपणा घालवण्यासाठी नागेलीच्या पानांचा लेप लावावा.नागेलीच्या पानातील जीवनसत्वांमुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात. 

चेहरा नितळ ठेवण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी केवळ सौंदर्य उत्पादनं वापरणं पुरेसं नसतं. चेहऱ्याचे , त्वचेचे लाड केल्यास चेहऱ्यावरची सौंदर्याची कळी खुलते. वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती लेप त्वचा सुंदर आणि नितळ ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. या लेपांमध्ये विड्याच्या पानांचा अर्थात नागेलीच्या पानांचा अवश्य समावेश करायला हवा. नैसर्गिक पध्दतीनं सौंदर्य वाढवण्यासाठी नागेलीच्या पानांचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. 

विविध जीवनसत्वयुक्त नागेलीच्या पानानं त्वचेला कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीचा धोका टळतो. नागेलीच्या पानानं त्वचेवरच्या रंध्रांची खोलवर स्वच्छता होवून त्वचा मऊ-मुलायम आणि उजळ होते. नागेलीच्या पानात दाहविरोधी, जिवाणू विरोधी गुणधर्म असल्याने मुरुम पुटकुळ्यांवर नागेलीचं उत्तम इलाज ठरतो.  नागेलीच्या पानांचा उपयोग करुन चेहऱ्यावरील काळे डाग घालवता येतात. 

नागेलीची पानं विकत तर मिळतातच पण नागेलीच्या पानांचा वेलही घरातल्या बागेत सहज वाढतो. त्वचेशी निगडित निम्म्यापेक्षा अधिक सौंदर्य समस्या नागेलीच्या पानांद्वारे दूर होतात. सुंदर त्वचा हे स्वप्नं नसून शक्य होणारं वास्तव आहे हे नागेलीच्या पानांचा सौंदर्योपचारात समावेश केल्यास सहज लक्षात येतं. सौंदर्योपचारात नागेलीच्या पानांचा 5 प्रकारे उपयोग करता येतो. 

Image: Google

1. विड्याच्या पानातील आर्द्र गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा मिळण्यासाठी त्यांचा चांगला फायदा होतो. यासाठी नागेलीची पानं आणि मुलतानी मातीचा लेप तयार करावा. या लेपासाठी नागेलीची 3-4 ताजी पानं, 1 छोटा चमचा बेसन पीठ, थोडी मुलतानी माती घ्यावी. या तिन्ही गोष्टी एकत्र करुन मिक्सरमध्ये वाटून मऊ पेस्ट तयार करावी. चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. त्यानंतर विड्याच्या पानांचा हा लेप चेहऱ्यास लावून 15-20 मिनिटं ठेवावा. चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा.या लेपामुळे त्वचेला ओलसरपणा मिळतो. 

2.  त्वचेवरील अतिरिक्त तेलनिर्मिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 3 मोठे चमचे नागेलीच्या पानांचा रस, 2 चमचे मध आणि अर्धा चमचा मीठ घ्यावं. तिन्ही गोष्टी नीट एकत्र करुन हा लेप चेहऱ्यास लावावा. 15-20 मिनिटानंतर चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपामुळे त्वचेस ओलसरपणा मिळतो. नागेलीतील गुणधर्मांमुळे त्वचेवरची रंध्रं स्वच्छ होवून मोकळी होतात. 

Image: Google

3. त्वचा उजळ होण्यासाठी 5-6 पानं मिक्सरमध्ये वाटून किंवा खलबत्यात कुटून त्याची मऊ पेस्ट करुन घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. 10-15 मिनिटांनी चेहरा थंडं पाण्यानं धुवावा. या लेपामुळे त्वचेचा रंग खुलतो, उजळतो. नागेलीच्या पानातील जीवनसत्वांमुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाऊन त्वचा उजळते.

Image: Google

4. नागेलीच्या पानात दाह विरोधी आणि जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी म्हणूनच नागेलीच्या पानांच्या लेपाचा उपयोग होतो.  हळद घालून तयार केलेल्या लेपामुळे त्वचेचा पीएच स्तर सुधारतो. त्वचेचा दाह कमी होतो. नागेलीच्या लेपानं काही दिवसातच चेहऱ्यावरच्या मुरुम पुटकुळ्या निघून जातात.  मुरुम पुटकुळ्यांसाठी नागेलीच्या पानांचा लेप तयार करण्यासाठी 5-6 नागेलीची ताजी पानं घ्यावीत. ती मिक्सरमधून वाटून त्यांची मऊ पेस्ट करावी. त्यात चिमूटभर हळद घालून ती पेस्टमध्ये एकजीव करुन घ्यावी. हा लेप चेहऱ्याला लावून 15 मिनिटं ठेवावा. नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून रुमालानं टिपून घ्यावा. 

Image: Google

5. चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी आणखी एका पध्दतीनं उपाय करता येतो. या उपायासाठी नागेलीची पानं स्वच्छ धुवून घ्यावीत. भांड्यात पाणी घेऊन  पानं पाण्यात उकळून घ्यावीत. उकळलेलं पाणी थंडं होवू द्यावं. थंड झालेल्या नागेलीच्या पानाच्या पाण्यानं चेहरा स्वच्छ धुतल्यास मुरुम पुटकुळ्या निघून जातात. 

Web Title: Betel leaves use as home remedy for beauty problems.. 5 ways of getting benefits of betel leaves for beauty.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.