पूर्वी सौभाग्याचं प्रतीक म्हणून कपाळावर कुंकू लावलं जायचं. आता सौंदर्यासंबंधी प्रत्येक वस्तूचा आणि घटकाचा उपयोग हा फॅशन म्हणून केला जातो. आणि याच फॅशनच्या रेट्यात कपाळावरच्या कुंकवाची जागा टिकलीने घेतली. आज वेगवेगळ्या रंगाच्या,आकाराच्या टिकल्या मिळतात. कार्यक्रम कोणता, मेकअप कसा हे ठरवून कोणत्या प्रकारची टिकली लावायची ते ठरवलं जातं. टिकली ही फॅशन ट्रेण्डप्रमाणे बदलली त्यामुळे आजच्या काळातही ती कालबाह्य झाली नाही. लूकमधे वैविध्य आणण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. पारंपरिक सौंदर्याची हौस पुरवणारी टिकली ही आधुनिक रुपाच्याही आड येत नाही. आणि म्हणूनच टिकली आजही आवडीने लावली जाते. पण सौंदर्य वाढवण्यासठी म्हणून लावली जाणारी टिकली ही अनेकींना जाच करते. अनेकींच्या त्राग्याचं कारण बनते. ते का?
तर टिकलीमुळे होणारी अॅलर्जी. टिकलीमुळे होणाऱ्या अॅलर्जीकडे फारसं गांभिर्यानं पाहिलं जात नाही. पण या अॅलर्जीकडे दुर्लक्ष केल्यास कपाळाच्या त्वचेचं नुकसान होतं.ही अॅलर्जी कपाळावर इतरत्रही पसरु शकते. त्यामुळे याबाबत आधीच सावधगिरी बाळगायला हवी.
टिकलीची अॅलर्जी ती कशी?टिकलीमुळे होणाऱ्या अॅलर्जीला डर्मेटाइटिस म्हटलं जातं. टिकली बनवताना चिकटाव्यासाठी पॅरा टर्शियरी ब्यूटिल फिनॉल नामक रासायनिक घटकाचा वापर केला जातो. हा घटक त्वचेसाठी विशेषत: संवेदनशील त्वचेसाठी अपायकारक असतो. सतत कपाळाला टिकली लावल्यानं कपाळाची त्वचा खराब होण्याचा धोका असतो. एरवी सौंदर्याबद्दल अती जागरुकता दाखवणाऱ्या स्त्रिया देखील टिकलीच्या या घातक परिणामाकडे दुर्लक्ष करतात. टिकलीमुळे कपाळावरील त्वचेला अॅलर्जी झाली तरी टिकली लावत राहातात आणि त्वचेचं आणखी नुकसान करुन घेतात. कपाळाला टिकली लावल्यानंतर जर तिथे आग होत असेल, ती जाग सूजत असेल , खाजत असेल तर ती टिकली वापरु नये हा सर्वसाधारण नियम आहे. पण तो पाळला जात नाही.
टिकलीला पर्याय काय?
- कपाळावर छोटा का होईना ठिपका हवाच असेल तर पुन्हा कुंकवाकडे वळावं. कुंकूही आता फॅशनेबल पध्दतीने वापरता येतं. तसेच कुंकवाच्या जागी गंधाचाही वापर करता येतो. निरनिराळ्या रंगात गंधाच्या बाटल्या मिळतात.त्याचाही फॅशनेबल उपयोग करता येतो . पूर्वी कुंकू केमिकल फ्री होतं. पण आता कुंकवातही रसायनं असतात. त्याचीही अॅलर्जी होवू शकते. ती टाळण्यासाठी केमिकल फ्री कुंकू वापरावं.
- टिकली वापरताना तिचा चिकटावा आधी बघितला जातो. जास्त चिकटाव्याची टिकली खूप टिकते म्हणून अनेकजणी चिकटावा जास्त असलेली टिकली वापरतात. आणि ती सतत कपाळाला लावून ठेवतात. रात्री झोपतांनाही टिकली काढून ठेवत नाही. ही सवय चुकीची आहे. एकतर जास्त चिकटावा असलेल्या टिकल्या वापरु नये. कारण टिकलीतल्या रासायनिक घटकाचा परिणाम होवून कपाळावर टिकलीची खूण पडते. जास्त चिकटाव्याच्या टिकलीची त्वचेस अॅलर्जी होते. टिकलीचा वापर मर्यादित काळासाठी करावा. तसेच रात्री झोपताना टिकली काढून झोपावं. आणि कपाळाला मॉश्चरायझर लावावं.
- कपाळाला टिकलीची अॅलर्जी झाल्यास खोबरेल तेल उत्तम काम करतं. टिकली लावण्याच्या जागी थोडं खोबरेल तेल लावल्यास त्वचेची खाज आणि आग थांबते. टिकलीमुळे कपाळावर जो पांढरा किंवा लाल डाग पडतो तो खोबऱ्याच्या तेलानं जातो. टिकली लावण्याची कपाळावर अॅलर्जी होत असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कपाळाला खोबऱ्याचं तेल वापरावं.