Join us  

कारल्याचा फेसपॅक! एकदा लावून बघा.. मुरूम आणि सुरकुत्या कमी करण्याचं ब्यूटी सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 6:53 PM

कडू कारलं खायचं अगदीच जिवावर येत ना? मग जाऊ द्या.. कारलं खाऊ नका. चेहऱ्याला लावा आणि सौंदर्य वाढवा..

ठळक मुद्देकारल्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी, लोह, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम हे घटक त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्सिफिकेशन घडवून आणतात.

कारलं खायचं म्हंटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. कित्येक लोक तर कारल्याची भाजी पानातही वाढून घेत नाहीत. कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच... असं कारल्याच्या बाबतीत  बोललं जातं, ते अजिबात खोटं नाही. पण हे कडू कारलंच आपल्या त्वचेसाठी जणू नवी संजीवनी घेऊन  येणारं असतं, हे देखील लक्षात घ्या. कारल्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी कारले अतिशय उपयुक्त ठरते. याशिवाय कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी तसेच कॅरोटीन, बीटाकॅरोटीन, लूटीन, लोह, झिंक आणि मॅग्नेशियम ही खनिजेही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेच्या विविध आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी बहुगुणी कारल्याचा उपयोग करणे अतिशय फायदेशीर ठरते. 

 

कारल्याचा त्वचेसाठी होणारा उपयोगकारल्यामध्ये असणारे पोषक घटक चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच त्वचेवरील मृतपेशी काढून टाकून त्वचेला नवी चकाकी देतात. कारल्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी, लोह, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम हे घटक त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्सिफिकेशन घडवून आणतात. तसेच कोणत्याही संसर्गापासून त्वचेचे रक्षण करतात. फोड येऊन गेल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे डाग पुढचे काही दिवस दिसून येतात. फोडांचे हे जुनाट डाग घालविण्यासाठी कारल्याचा उपयोग करणे अतिशय फायद्याचे ठरते. कोणतेही महागडे कॉस्मेटीक्स वापरण्याऐवजी जर घरच्याघरी हा उपाय नियमितपणे करून पाहिला, तर निश्चितच याचा खूप फायदा होतो. 

 

असे करा कारल्याचे फेसपॅक१. कारले आणि दहीकारल्याचा फेसपॅक बनविणे अतिशय सोपे आहे. यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये दोन टेबलस्पून दही घ्या. त्यामध्ये अर्धाच चमचा मध आणि दोन चमचे गुलाब पाणी टाका. यानंतर साधारण अर्धे कारले कापून घ्या आणि त्याच्यातल्या बिया काढून टाका. हे कारले मिक्सरमधून फिरवून त्याची चांगली पातळ पेस्ट करून घ्या. ही पेस्ट आता दही, मध आणि गुलाबपाणी असणाऱ्या बाऊलमध्ये टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. अशा पद्धतीने कारल्याचा फेसपॅक तयार झाला. 

हा फेसपॅक चेहऱ्याला लावण्यापुर्वी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि चेहऱ्यावरचे पाणी टिपून घ्या. यानंतर कारल्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि २५ ते ३० मिनिटे चेहऱ्यावरच सुकू द्या. यानंतर चेहरा धुवून टाका. चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचाच वापर करावा. चेहरा धुतल्यानंतर तुमचे नेहमीचे मॉईश्चरायझर लावून चेहऱ्याची मसाज करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी