-निर्मला शेट्टी
अडीनिडीची भाजी म्हणून धावून येणारा बटाटा प्रत्येकाच्याच घरात असतो. पण अनेक प्रकारच्या आजारांवर हाच बटाटा उत्तम औषध म्हणूनही काम करतो हे आपल्याला माहीत आहे का? बटाटय़ामध्ये अ, ब, का? या जीवनसत्त्वाबरोबरच फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फायबर, प्रथिनं यांसारखे गुण ठासून भरलेले आहेत. त्यामुळे बटाटा औषध म्हणूनही उत्तम काम करतो. हे सगळं ठीक आहे पण सुंदर दिसण्याचा आणि बटाटय़ाचा काय संबंध, असा प्रश्न पडला असेलच. तर बटाटा एकदा वापरून पाहायलाच हवा. त्वचेवरचे डाग असू देत नाहीतर डोळ्याखालची काळी वर्तुळं, यासाठी कच्चा बटाटा फार कामाचा आहे.
कच्चा बटाटा सोलून तो किसून त्याचा रस चेहऱ्याला लावला की त्वचा उजळते. वांगाचे डाग, चेहऱ्यावरचे मुरूम-पुटकुळ्यांचे डाग, डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवायची असतील तर कापसाचा बोळा बटाटय़ाच्या रसात बुडवून डागांच्या ठिकाणी लावल्यास फायदेशीर ठरतं.
त्वचेवरील बटाटय़ाच्या उपयोगामुळे पेशी जिवंत होतात. त्यामुळे त्वचा ताजी आणि टवटवीत होते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांसाठीही बटाटय़ाचा उपयोग होतो.
त्वचेसंबंधीच्या प्रत्येक तक्रारीवर नुसता बटाटा वापरून उपयोगाचा नाही. ती समस्या कोणती आहे हे बघून कशाबरोबर वापरावा हे ठरवावं लागतं. आणि म्हणूनच त्वचाविकारांवर बटाटय़ाचा उपयोग करताना तो काकडी, ओटस, कोरफड यासोबत वापरावा.
१. बटाटा, काकडी आणि बदाम
चेहऱ्यावरचे डाग घालवायचे असतील तर बटाटा, काकडी आणि बदाम हे एकत्र करून वापरायला हवं.
यासाठी एक बटाटा, अध्र्या लिंबाचा रस, अर्धी काकडी, अर्धा कप बदामाची पावडर आणि पाव कप गुलाबपाणी घ्यावं. हा पॅक बनवताना बटाटय़ाची सालं काढावी. तो किसून घ्यावा. त्यात काकडीचा रस आणि बदामाची पावडर घालावी. या मिश्रणाची बारीक पेस्ट करावी. त्यात लिंबाचा रस घालावा. आणि ही पेस्ट चेहऱ्यावर ज्या ठिकाणी जास्त डाग आहेत तिथे लावावी. पंधरा मिनिटं सुकू द्यावी. आणि नंतर गुलाबपाण्यानं चेहरा धुवून घ्यावा.
२. कोरफड आणि बटाटा
बटाटय़ात असलेल्या शुद्धतेच्या गुणधर्मामुळे सूर्यप्रकाशामुळे काळ्या झालेल्या त्वचेवर बटाटा उत्तम काम करतो. यासाठी बटाटय़ाबरोबर कोरफड वापरावी.
यासाठी पाव कप कोरफड आणि एक कप बटाटय़ाचे काप घ्यावेत. हे दोन्हीही मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्याचा रस काढावा. हा रस सूर्यप्रकाशामुळे काळसर झालेल्या भागावर लावावा. हा उपचार डाग जाईर्पयत रोज करावा. हा पॅक रोज लागणार आहे म्हणून करून ठेवता येत नाही. रोज ताजा ताजाच करावा लागतो.
३. ओटस आणि बटाटा
एक चमचा ओटमील पावडर, एक चमचा बदामाची पावडर आणि दोन ते तीन चमचे बटाटय़ाचा रस घ्यावा. हे सर्व नीट एकत्र करावं. पाच मिनिटांनी बटाटय़ाच्या रसानं चेहरा धुवावा. आणि नंतर चेह-यावर गार पाण्याचे सपकारे द्यावेत.
( लेखिका सौंदर्यतज्ज्ञ आहेत.)
nirmala.shetty@gmail.com