बहुतांशवेळा जास्त गरम खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर जीभ पोळली जाते. मात्र, अशा काही विशिष्ठ पदार्थांना गरमा - गरम खाण्यातच मज्जा असते. त्यात हिवाळा म्हटलं की वाफाळलेला चहा किंवा कॉफी पिण्यात मज्जा काही वेगळीच असते. जिभेला चटका जरी बसत असला तरी आपण ते पेय पितो. आवडीचे पदार्थ गरम खाण्याच्या नादात जिभेवर फोड उठू लागतात.
आपल्या समोर आवडता पदार्थ आला की, आपल्याला खाण्याचा मोह आवरत नाही. हातावर चटके बसत असले तरी देखील आपण फुंकून खातो. अशावेळी जिभेवर चटका बसण्याची शक्यता असते. जिभेवर चटका बसला की जीभ लाल होते यासह त्यावर फोड उठतो. त्यानंतर काही खाल्ले जात नाही. जीभ पोळली गेली की मग चांगलीच अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत जिभेवर कोणते उपाय कामी येईल याचा आपण शोध घेत असतो. दरम्यान, जिभेवरील जळजळ कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आपल्या कामी येतील.
जीभ भाजल्यावर घरगुती उपाय
आईस्क्रीम खाऊ शकता
गरम पदार्थ खाल्ल्यामुळे जीभ पोळली जाते. अशा परिस्थितीत आईस्क्रीमचे सेवन करता येईल. जीभ भाजल्यानंतर आईस्क्रीम खा. त्याचे छोटे छोटे बाईट्स खा. आईस्क्रिम तोंडात ठेवून लगेच खाऊ नका, वितळेपर्यंत जिभेवर ठेवा. यामुळे जळजळीपासून आराम मिळेल. जिभेवर फोडही उठणार नाही.
बर्फाच्या क्यूबची मदत घ्या
जिभेची जळजळ शांत करण्यासाठी आपण आइस क्यूबची मदत घेऊ शकता. यासाठी काही वेळ आईस क्यूब तोंडात ठेवा. याने जिभेला थंडावा मिळेल, यासह जळजळीपासून आराम मिळेल.
दही खाऊ शकता
जिभेची जळजळ दूर करण्यासाठी दही मदत करेल. यासाठी दही एका बाऊलमध्ये घ्या. हे दही चमच्याने खा. जिभेवर हे दही ठेवा आणि मग त्याचे सेवन करा. याने जिभेला थंडावा आणि आराम मिळेल.
थंड ज्यूस किंवा पाणी
जिभेच्या जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी थंड पेय प्या. यासाठी आपण थंड सरबत किंवा पाण्याचीही मदत घेऊ शकता. दरम्यान, जिभ भाजल्यानंतर अर्धा ग्लास थंडगार ज्यूस किंवा पाणी प्या. आणि एक घोट घेतल्यानंतर काही वेळ गिळू नका, तर तोंडात ठेवा. जेव्हा ज्यूसचे तापमान कमी होईल तेव्हा प्या. याने जळजळीपासून आराम मिळेल.
मध लावा
जीभेवरील जळजळ दूर करण्यासाठी आपण मध वापरू शकता. यासाठी चमच्याने मध घ्या व त्याचा लेप जिभेवर लावा. काही वेळानंतर, जेव्हा लेप हलके होईल तेव्हा मध खा आणि पुन्हा जिभेवर मध लावा. असे केल्याने जळजळीपासून आराम मिळेल.
पुदीना लावा
जळलेल्या जिभेला थंडावा आणि आराम देण्यासाठी पुदिन्याची मदत घ्या. आपण पुदिन्याची टूथपेस्टही जिभेवर लावू शकता. पेस्ट जिभेवर लावल्यानंतर थोड्यावेळ ठेवा नंतर गुळण्या करा. ही प्रक्रिया पुन्हा करा. याने जिभेला आराम मिळेल.