केसांच्या अनेक समस्यांवर एक उपाय बाहेर शोधायला गेलं तर मिळणं फारच अवघड. तर केसांच्या प्रत्येक समस्येवर वेगवेगळा उपाय करत बसणं हे फारच वेळखाऊ आणि खर्चिक काम. केसांच्या समस्यांवरचा उपाय बाहेर शोधण्यापेक्षा घरात शोधला तर सहज, सोपा, कमी खर्चिक आणि पटकन होणारा उपाय सापडू शकतो. तसेच केसांच्या अनेक समस्यांवर घरगुती एक उपाय प्रभावी काम करु शकतो. हा उपाय म्हणजे ताकाने केस धुणे , केसांना ताकाचा हेअर पॅक लावणे.
Image: Google
केसांना ताक लावल्यास, केस ताकाने धुतल्यास केसांना आवश्यक पोषणही मिळतं. केसांचां आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि केस सुंदर करण्यासाठी ताकाचा चांगला फायदा होतो. ताकातून पोषण मिळून केस मजबूत होतात. ताकाच्या नियमित उपायानं केस गळण्याची समस्या दूर होते. ताकामधे लॅक्टिक ॲसिड, प्रथिनं, अ जीवनसत्त्वं यांचं भरपूर प्रमाण असतं. ताकातील हे सर्व पोषक घटक केसांसाठी आवश्यक असतात. ताकाच्या नियमित वापरानं केस निरोगी तर होतातच सोबतच केस मऊ आणि चमकदारही होतात.
Image: Google
केसांना ताक लावल्यास काय होतं?
1. वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला की त्याचा परिणाम शरीराच्या त्वचेवरही होतो. या वातावरणात केसांशी निगडित एक सर्वसामान्य समस्या आढळते, ती म्हणजे केसात कोंडा होतो. याचं कारण टाळूची त्वचा अर्थातच केसांच्या मुळाशी असलेली त्वचाही कोरडी होते. केसांच्या मुळाशी असलेली त्वचा कोरडी झाल्यास कोंडा होतो. खाज येते. केस कमजोर होतात. बाहेर मिळणारे ॲण्टिडॅन्ड्रफ शाम्पू वापरले तर केस आणखी कोरडे होवून कमजोर होतात. केस गळतात. ताकाचा उपाय करुन केसांमधील कोंड्याची समस्या सहज घालवता येते. केस धुण्याआधी केसांना ताक लावावं किंवा केस ताकाने धुवावे. या कोणत्याही पध्दतीने ताक वापरल्यास केसातील कोंडा कमी होतो आणि डोक्यात येणारी खाजही निघून जाते.
Image: Google
2. कमी वयातही योग्य पोषणाअभावी आणि इतर समस्यांमुळे केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. पांढऱ्या केसांमुळे केसांचं सौंदर्य लोप पावतं. पण केस पांढरे होण्याची समस्या ताकाने बरी करता येते. यासाठी 7-8 कढीपत्त्याची पानं घ्यावीत. ती आधी मिक्सरमधून किंवा खलबत्त्यात कुटून वाटावी. वाटलेला कढीपत्ता वाटीभर ताकात मिसळावा. कढीपत्ता घातलेल्या ताकाने केसांच्या मुळाशी हलक्या हातानं मसाज करावा. हे मिश्रण केसांच्या मुळांसोबतच संपूर्ण केसांना लावावं. केसांना ताक लावल्यानंतर अर्धा तास केस तसेच ठेवावे. अर्ध्या तासानं केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. हा उपाय नियमित केल्यास पांढरे केस काळे होतात.
Image: Google
3. केसांच्या मुळांना पोषण मिळालं नाही, ते कमजोर झाले की केस गळण्याचं प्रमाण वाढतं. केस मजबूत करण्यासाठी केसांना प्रथिनं मिळणं आवश्यक आहे. केस मजबूत होण्यासाठी बाहेर महागड्या ट्रीटमेण्ट घेण्यापेक्षा केसांना ताक लावणं हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ताकामधे केसांना आवश्यक असलेली प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच ताक लावल्याने केसांना पोषण मिळतं. केस मजबूत होतात. केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. ताकाच्या उपायानं केसांना पोषण मिळून केस लांब आणि दाटही होतात.
Image: Google
4. केस निस्तज आणि रुक्ष असतील तर सुंदर कसे दिसतील? केसांची परिस्थिती अशी असल्यास केस काळेभोर आणि चमकदार दिसणं अगदीच अवघड. पण ताकामुळे केसांची निस्तेजता आणि कोरडेपणा दूर होतो. केस धुताना नियमितपणे ताक वापरल्यास केसांच पोत सुधारतो आणि केस काळेभोर आणि मऊसूत होतात.
Image: Google
ताकाचा पॅक
केस निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी ताकाचा पॅक फायदेशीर ठरतो. वाटीभर ताक घ्यावं. यात 7-8 कढीपत्त्याची पानं वाटावीत. एक पिकलेलं केळ घेऊन ते आधी कुस्करावं. कुस्करलेलं केळ ताकात मिसळावं. हे सर्व एकजीव करुन केसांच्या मुळाशी हा ताकाचा पॅक लावावा. हा पॅक लावल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासानं केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. केस धुताना शाम्पू लावायचा असल्यास सौम्य शाम्पूचा वापर करावा. आठवड्यातून किमान एक वेळेस केसांना ताकाचा पॅक लावल्यास केस चमकदार होतात. ताकाच्या हेअर पॅकमुळे केसांचं पोषण होतं. केस मजबूत होण्यास ताकाचा पॅक फायदेशीर ठरतो.