वातावरणातील प्रदूषण आणि हवामान याचा एकत्रित परिणाम चेहेऱ्यावर होतो. त्याचा परिणाम म्हणजे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. मुरुम पुटकुळ्यांवर भरपूर उपाय करुनही काहीच फरक पडत नसेल तर कापूर अवश्य वापरुन पाहावा. आरतीसाठी वापरला जाणारा कापूर त्वचेची काळजी घेण्यासाठी उत्तम आहे. कापरात अॅण्टिसेप्टिक गुणधर्म असतात तसेच त्यातील अॅण्टिऑक्सिडण्ट गुणधर्मांमुळे कापराच्या उपयोगानं चेहेऱ्यावरच्या मुरुम पुटकुळ्यांना प्रतिबंध होतो. यासोबतच चेहेऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी आणि चेहेरा उजळण्यासाठीही कापूराचा उपयोग परिणामकारक ठरतो.
कापूराचा उपयोग त्वचेसाठी कसा कराल?- मुरुम पुटकुळ्यांसाठी कापूरचं तेल वापरता येतं. १ छोटा चमचा कापूर तेल आणि एक कप खोबऱ्याचं तेल घ्यावं. एका हवाबंद बरणीत हे एकत्र करुन ठेवावं. चेहेरा आधी क्लिन्जरनं धुवून घ्यावा. तो कोरडा करावा. मग एक छोटा चमचा तेलाचं मिश्रण घेऊन ते चेहेऱ्यावर जिथे मुरुम पुटकुळ्या आहेत तिथे हलक्या हातानं मसाज करत लावावं. रात्रभर ते तसंच राहू द्यावं. सकाळी कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा.
- हाताला किंवा पायाला कसला संसर्ग झाल्यस कापूर वापरल्यास फायदेशीर ठरतो, यासठी कापूर क्रीम, कापराचा बाम किंवा कापूर स्प्रे देखील मिळतो. याचा उपयोग जिथे त्रास आहे तिथेच करावा.
- त्वचेवर आग किंवा खाज येत असल्यास पाण्यात कापूर टाकून तो भाग धूवून घेतल्यास आराम मिळतो.
- अनेकांना चेहेऱ्यावर, हाता पायावर लाल पूरळ उठते. ती घालवण्यासाठी कापूर आणि थोडं पाणी घ्यावं. पाण्यात कापूर मिसळून त्याची दाटसर पेस्ट तयार करुन ती तिथे लावावी.
- टाचांना भेगा पडल्यास त्यावर उपाय म्हणूनही कापूर वापरता येतो. त्यासाठी कोमट पाण्यात कापूर घालावा. आणि त्यात पाय बूडवून पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास बसावं. यामुळे भेगा जाण्यास मदत होते शिवाय पायाची त्वचा मऊ होते.
कापूराचे फेस पॅकइतर गोष्टींमधे कापूर घालून त्याचे फेस पॅकही करता येतात.
खोबऱ्याचं तेल आणि कापूर हा फेस पॅक करताना एक कप खोबऱ्याचं तेल घ्यावं त्यात दोन चमचे कापूर वडी हातानं चुरुन टाकावी. मिश्रण चांगलं एकजीव करावं. मग एक छोटा चमचा हे मिश्रण घ्यावं आणि ते चेहेऱ्याला हळूहळू मसाज करत लावावं. खोबरेल तेलात लॉरिक अॅसिड असतं. त्याचा उपयोग त्वचेवरील हानिकारक जिवाणू दूर होण्यास होतो. आणि म्हणूनच चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांसाठी हा फेस पॅक परिणामकारक ठरतो. खोबऱ्याच्या तेलासोबत कापूर वापरल्यानं त्वचेची रंध्र स्वच्छ होतात. चेहेऱ्याची त्वचा उजळवण्यासाठीही या पॅकचा उपयोग होतो.
मूलतानी माती आणि कापूरहा फेस पॅक तयार करताना दोन चमचे मूलतानी माती आणि कापराची एक वडी घ्यावी. किंवा एक छोटा चमचा कापूर तेल घ्यावं आणि थोडं गुलाब पाणी घ्यावं. हा लेप चेहेऱ्यावर व्यवस्थित लावावा. पंधरा मिनिटांनी चेहेरा व्यवस्स्थित धुवावा. हा लेप चेहेऱ्यावरील काळे डाग घालवण्यास उपयुक्त ठरतो. चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्यांनी डाग पडले असतील तर तेही जातात.
बेसन पीठ आणि कापूरअर्धा चमचा कापराचं तेल घ्यावं. त्यात एक मोठा चमचा बेसन पीठ आणि दोन चमचे गूलाब पाणी टाकावं. मिश्रण चांगलं एकजीव करावं. हा लेप चेहेऱ्याला लावून तो पंधरा मिनिटं ठेवावा. मग चेहेरा पाण्यानं धुवावा. या लेपानं त्वचा एक्सफोलिएट होते, स्वच्छ होते. बेसन पीठ चेहेऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते. या लेपामुळे चेहेऱ्याची त्वचा छान प्रसन्न आणि ताजी तवानी होते. गुलाब पाण्यामुळे त्वचेचा पीएच स्तर सुधारतो. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या जातात आणि सूज असेल तर तीही जाते.
एरंडेल -बदाम तेल आणि कापूरहा लेप बनवताना अर्धा कप एरंडेल तेल, अर्धा कप बदामाचं तेल आणि एक चमचा कापूर तेल घ्यावं. हे सर्व चांगलं एकत्र करावं. रात्री झोपण्याआधी चेहेरा स्वच्छ करावा आणि हा लेप चेहेऱ्यावर लावावा. तो रात्रभर तसाच राहू द्यावा. सकाळी क्लीन्जर आणि कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा. एरंडेल तेलात रिकिनोइलिक अॅसिड असतं ते मुरुम पुटकुळ्या आणणाऱ्या जीवाणूंचा नाश करतं. शिवाय त्वचा मॉश्चराइज करतं. बदामाच्या तेलातील पोषक तत्त्वांंमुळे त्वचा निरोगी राहाते आणि कापूर तेलातील दाहविरोधी गुणांमुळे चेहेऱ्यावरची सूज, आग कमी होते.