Join us  

चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात? ही फक्त सौंदर्य समस्या नाही, आहारात ४ जीवनसत्वं कमी पडत असल्याची लक्षणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 1:09 PM

चेहेऱ्यावर सतत येणाऱ्या मुरुम पुटकुळ्या (acne problem) ही समस्या केवळ बाह्य उपचारांनी दूर होत नाही. यामागची कारणं ही आहाराशी ( diet for beauty) संबंधित असतात. योग्य आहार न घेतल्यास शरीरात काही जीवनसत्वांची कमतरता (vitamin deficiency) निर्माण होते. ही कमतरता चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या (vitamin deficiency cause to acne) निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.

ठळक मुद्देशरीरात अ जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम त्वचेवर होतो. शरीरात पुरेशा प्रमाणात ब3 हे जीवनसत्व असल्यास त्वचेवर चमक येते.ई जीवनसत्वामुळे त्वचेखाली कोलॅजनची निर्मिती होण्यास चालना मिळते.

चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या (acne problem)  येणं या सौंदर्य समस्येचा सामजा अनेकांना करावा लागतो.  पौंगडावस्थेत किंवा किशोरावस्थेत शरीरात बदलणाऱ्या हार्मोनचा परिणाम म्हणजे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. पण ही समस्या कायमस्वरुपी टिकून राहात नाही. एका विशिष्ट काळानंतर चेहेऱ्यावरच्या मुरुम पुटकुळ्या निघून जातात. पण किशोरावस्थेनंतरही तरुणपणात, त्यानंतर प्रौढावस्थेत चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येत असतील तर त्याला शरीरात बदलणार हार्मोन्स हे कारण नसतं. सतत चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असतील तर त्याचा परिणाम त्वचा खराब होण्यावर तर होतोच पण सोबतच व्यक्तिमत्वावर, आत्मविश्वासावरही परिणाम होतो.  चेहेऱ्यावर सतत येणाऱ्या मुरुम  पुटकुळ्या ही समस्या केवळ बाह्य उपचारांनी दूर होत नाही. यामागची कारणं ही आहाराशी (diet for beauty)  संबंधित असतात. योग्य आहार न घेतल्यास शरीरात काही जीवनसत्वांची (vitamin deficiency)  कमतरता निर्माण होते. ही कमतरता चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच मुरुम पुटकुळ्या येण्यास कोणत्या जीवनसत्वांची कमतरता कारणीभूत (vitamin deficiency cause to acne)  ठरते हे समजून घेऊन त्यापध्दतीनं आहारात बदल करणं आवश्यक बाब आहे.

 Image: Google

मुरुम पुटकुळ्या आणि जीवनसत्वांची कमतरता

1. शरीरात अ जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम त्वचेवर होतो. अ जीवनसत्वं हे एक ॲण्टिऑक्सिडण्ट आहे.  त्वचेस आणि आरोग्यास घातक अशा मुक्त मुलकांचा (फ्री रॅडिकल्स) सामना करण्यासाठी  अ जीवनसत्व महत्वाची भूमिका निभावतं. अ जीवनसत्वामुळे शरीरावरील सूज कमी होते. अ जीवनसत्वाची शरीरातील कमतरता दूर करण्यासाठी आहारात दूध, गाजर, टमाटा, पिवळ्या आणि लाल भाज्या, पालक, रताळी, दही, सोयाबीन आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आवश्यक आहे. 

2. ब 3 या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात, डाग पडतात. बी 3 हे जीवनसत्व सूज आणि दाहविरोधी म्हणून काम करतं. त्यामुळे मुरुम पुटकुळ्या कमी होण्यासाठी शरीरातील ब3 या जीवनसत्वाची कमतरता दूर करणं आवश्यक आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात ब3 हे जीवनसत्व असल्यास त्वचेवर चमक येते, मुरुम पुटकुळ्या येत नाही. तसेच ब3 या जीवनसत्वामुळे त्वचेवा तेलही जास्त प्रमाणात निर्माण होत नाही. तेलकट त्वचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा धोका ब3 या जीवनस्त्वामुळे टळतो. शरीरात ब3 जीवनसत्वाची कमतरता निर्माण होवू नये यासाठी आहारात मश्रुम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, मटार, ब्रोकोली, राजमा या पदार्थांचा समावेश करावा. 

Image: Google

3. ड जीवनसत्व हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वाचं असतं. ड जीवनसत्वामुळे चेहेऱ्यावरील सूज कमी होते. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या कमी होतात. हाडं मजबूत करण्यासाठी आणि त्वचा निरोगी राहाण्यासाठी ड जीवनसत्व महत्वाचं असतं. शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता निर्माण होवू नये म्हणून आहारात दही, दलिया, सोयाबीन आणि सोयाबीनचे पदार्थ यांचा समावेश करावा. 

4. ई जीवनसत्वात सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. अ जीवनसत्वाप्रमाणे ई जीवनसत्वही ॲण्टिऑक्सिडण्टसारखं काम करतं. ई जीवनसत्वामुळे त्वचेखाली कोलॅजनची निर्मिती होण्यास चालना मिळते. हे जीवनसत्व शरीरात पुरेसं असल्यास चेहेऱ्यावर चमक येते. ई जीवनसत्वाची शरीरातील कमतरता भरुन काढण्यासाठी आहारात वनस्पती तेल, फळं, सर्व प्रकारच्या भाज्या, सुका मेवा, बदाम, भूईमुगाच्या शेंगा, सूर्यफुलाच्या बिया, ब्रोकोली, पालक यांचा अवश्य समावेश करावा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआहार योजना