Join us  

सौंदर्य उपचारांसाठी अतिशय उपयुक्त ठरतो चारकोल? ८ टिप्स, चारकोल वापरण्याचे मिळतील भरपूर फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 1:52 PM

Activated Charcoal Benefits : ॲक्टिव्हेटेड चारकोल हा एक बहुगुणी पर्याय आहे, त्यातून अनेक फायदे मिळतात.

आपण खूप सुंदर दिसावं ही इच्छा प्रत्येक स्त्रीच्या मनात असते. प्रत्येक स्त्री ही सुंदर असतेच परंतु चारचौघीत आपण उठून दिसावं यासाठी त्या खूप प्रयत्नशील असतात. काहीजणी सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स करतात, तर काही क्रिम्स व आर्टिफिशल मेडिसिनचा वापर करतात. अनेकदा या महागड्या ट्रिटमेंट्स व क्रिम्सचा स्किनवर काहीच परिणाम होत नाही. फरक पडलाच तर तो कायमस्वरूपी टिकेल याची खात्री नसते.  घरगुती उपायांचा वापर करणे हा एक पर्याय आपल्यासमोर असतो. घरगुती उपायांमध्ये आपण घरात सहज उपलब्ध होतील अश्या पदार्थांचा वापर करतो. जसे की, बेसन पीठ, आंबेहळद, मुलतानी माती इ. या सगळ्या पर्यायांसोबतच आता अ‍ॅक्टिवेटेड चारकोलचा वापर सर्रास सगळ्या सौंदर्यप्रसाधनात केला जातो. अ‍ॅक्टिवेटेड चारकोल म्हणजे नेमकं काय ? त्याचा उपयोग नक्की कसा करतात?(Activated Charcoal Benefits).

अ‍ॅक्टिवेटेड चारकोल म्हणजे नेमकं काय ?

अ‍ॅक्टिवेटेड चारकोल म्हणजे कोळसा नसून तो लाकूड आणि नारळाच्या फायबरपासून बनविला जातो. अ‍ॅक्टिवेटेड चारकोल उच्च तापमानाला गरम करून तयार केला जातो. यामुळे चारकोलच्या आत लहान छिद्रे तयार होतात. या छिद्रांमुळे, अ‍ॅक्टिवेटेड चारकोलची शोषण क्षमता वाढते. या क्षमतेमुळे तो विषारी घटक शोषून घेण्यात सक्रिय असतो. अ‍ॅक्टिवेटेड चारकोलला अ‍ॅक्टिवेटेड कार्बन सुद्धा म्हणतात. ही काळ्या रंगाची गंधहीन व चवहीन बारीक पावडर आहे.

कशा प्रकारे वापरता येईल ?

१. ग्लोइंग स्किनसाठी - अ‍ॅक्टिवेटेड चारकोल मध्ये अँटी - बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे स्किनवरील मुरूम आणि पोर्स स्वच्छ करण्याचे काम करते. अ‍ॅक्टिवेटेड चारकोलची बारीक पूड करून घ्यावी त्यात दोन चमचे जोजोबा ऑईल घालावे. हे मिश्रण चेहेऱ्यावर लावून स्क्रब केल्याने तुमची स्किन छान एक्सफोलिएट होईल.     

२. चमकदार दातांसाठी - तुमच्या दातांवर काळे - पिवळे डाग असतील तर ते नाहीसे करण्यासाठी अ‍ॅक्टिवेटेड चारकोल फायदेशीर ठरते. तुमच्या दातांची चमक परत आणण्यासाठी, अ‍ॅक्टिवेटेड चारकोलची पूड पाण्यात मिसळून त्या पाण्याच्या गुळण्या करू शकता. अ‍ॅक्टिवेटेड चारकोल युक्त टूथपेस्ट बाजारात सहज मिळतात त्याचादेखील वापर तुम्ही करू शकता. 

३. डिओड्रंट म्हणून वापर - शरीरातील घामाचा वास किंवा इतर दुर्गंधी दूर करण्यासाठी अ‍ॅक्टिवेटेड चारकोलचा डिओड्रंट म्हणून वापर करू शकतो. एक बाऊलमध्ये कॉर्न स्टार्च, अ‍ॅक्टिवेटेड चारकोल पावडर, बेकिंग सोडा, नारळाचे तेल (सर्व जिन्नस १ चमचा) यांचे मिश्रण करून घ्या. या मिश्रणाचा डिओड्रंट सारखा वापर करावा. हे मिश्रण फ्रिजमध्ये एक आठवडा राहू शकते. 

४. सनस्क्रीन - बदलत्या ऋतूनुसार आपण स्किनची काळजी घेत असतो. उन्हाळ्यात आपली स्किन ड्राय व डल होते. अश्यावेळी अ‍ॅक्टिवेटेड चारकोल स्किनला हेल्दी बनविण्यासोबतच घातक सूर्य किरणांपासून आपला बचाव करते. उन्हाळ्यात अ‍ॅक्टिवेटेड चारकोलयुक्त सनस्क्रीनचा वापर करा. 

५. पाणी शुद्ध करण्यासाठी - जर तुमच्याकडे पाणी शुद्ध करणारा फिल्टर किंवा प्युरिफायर नसेल तर अ‍ॅक्टिवेटेड चारकोलच्या साहाय्याने तुम्ही घरच्या घरी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करू शकता. अ‍ॅक्टिवेटेड चारकोल पाण्यातील अशुद्धता व टॉक्सिन शोषून घेऊन त्याची चव सुधारण्यात मदत करते. अ‍ॅक्टिवेटेड चारकोलचा तुरटीप्रमाणे वापर करावा. 

६. जखमेवर औषध म्हणून - एखादा किडा किंवा कीटक चावल्यास त्या भागाची जळजळ होते. एक चमचा नारळाच्या तेलात अ‍ॅक्टिवेटेड चारकोलची पूड मिसळून हे मिश्रण लावल्यास आराम मिळतो. 

७. स्किन डिटॉक्स - अ‍ॅक्टिवेटेड चारकोल तुमच्या स्किनमधील अतिरिक्त तेल शोषून घेते. त्यामुळे तुमची स्किन डिटॉक्स होऊन गुळगुळीत, नितळ स्किन तुम्हाला मिळते. एक्टिवेटेड चारकोल स्किनच्या पृष्ठभागावरील विषारी पदार्थ काढतो आणि चेहरा उजळ करतो. 

८. केसांसाठी फायदेशीर - अ‍ॅक्टिवेटेड चारकोल स्किनबरोबरच केसांसाठीदेखील तितकाच उपयुक्त आहे. केसांतील कोंडा व स्कॅल्प संबंधित समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

टॅग्स :ब्यूटी टिप्स