चाॅकलेट म्हटलं, की तोंडाला पाणी सुटणारच. स्वत:ला खूष करण्यासोबतच इतरांना आनंदी करणारा मार्ग म्हणजे चाॅकलेट देणे. नवीन नातं तयार करण्यासाठी, नाती घट्ट करण्यासाठी, नात्यात आनंद निर्माण करण्यासाठी, आनंदाचे, यशाचे छोटे मोठे क्षण साजरे करण्यासाठी चाॅकलेट हा प्रभावी मार्ग आहे. चाॅकलेट 5 रुपयांचं असू देत किंवा 500 रुपयांची महागडी कॅडबरी असू देत चाॅकलेटने मूड बनतोच हे वास्तव आहे. मूड, मानसिक आरोग्य, फिटनेस यासाठी चाॅकलेट फायदेशीर ठरतं तसंच चाॅकलेट हे त्वचेसाठीही उपयुक्त ठरते. आपल्या जिभेप्रमाणे त्वचेलाही चाॅकलेट देऊन त्वचेचे लाड केल्यास त्वचेचा पोत सुधारुन चेहऱ्याचं सौंदर्य फुलतं. फोर्टिस हाॅस्पिटलमधील प्रसिध्द त्वचाविकार तज्ज्ञ डाॅ. निधी रोहतगी चाॅकलेटमुळे त्वचेला होणारे लाभ आणि त्वचेसाठी चाॅकलेटचा उपाय करण्याचे मार्ग सांगतात.
Image: Google
डाॅ. निधी त्वचेसाठी चाॅकलेटचा उपाय करण्यासाठी डार्क चाॅकलेटचा वापर करण्याचा सल्ला देतात. डार्क चाॅकलेटमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. त्वचेसाठी ॲण्टिऑक्सिडण्टस महत्त्वाचे असतात. चाॅकलेटमधे जितक्या जास्त प्रमाणात कोकोआचं प्रमाण असतं तितकं ते चाॅकलेट परिणामकारक असतं. डार्क चाॅकलेटमध्ये कोकोआ पावडरचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्वचेसाठी डार्क चाॅकलेट वापरणं फायदेशीर ठरतं. कोकोआ पावडरमध्ये फ्लेवोनाॅइडस असतं. फ्लेवोनाॅइडसमुए त्वचेतील कोलॅजनची निर्मिती वाढते. यामुळे त्वचा खराब होत नाही. तसेच कोलॅजन वाढलं की त्वचेखाली नवीन पेशींची वाढ व्हायला लागते. डाॅ. निधी म्हणतात की चाॅकलेटने चेहऱ्याचा मसाज केल्यास चेहरा चमकतो. त्वचा मऊ मुलायम होते. त्वचेसाठी चाॅकलेट हे फायदेशीर कसं असतं हे समजून घेण्यासोबतच त्वचेसाठी चाॅकलेटचा उपयोग कसा करावा हे माहीत करुन घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
Image: Google
चाॅकलेट मास्क
ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन चाॅकलेट इफेक्ट ब्यूटी ट्रीटमेण्टस घेतल्यास त्याचा फायदा होतो. पार्लरमधील महागडा चाॅकलेट ब्यूटी इफेक्ट घरच्यघरीही मिळवता येतो. 1. चाॅकलेट मास्क त्वचेच्या प्रकाराप्रमाणे वापरल्यास त्याचा फायदा होतो असं डाॅ. निधी म्हणतात. तेलकट त्वचा असल्यास डार्क चाॅकलेट आणि मुलतानी माती वापरावी. त्यात थोडा लिंबाचा रस घालावा. हे मास्क चेहऱ्यास लवल्यास त्याचा फायदा तेलकट त्वचेवरील मुरुम पुटकुळ्या बऱ्या होण्यासाठी होतो. या मास्कमधील मुलतानी मातीमुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं आणि लिंबामुळे त्वचा मऊ होते.
Image: Google
2. तेलकट त्वचेपेक्षाही जास्त समस्या त्वचा कोरडी असल्यास निर्माण होतात. कोरड्या त्वचेत ओलावा टिकून ठेवणं हेच मोठं आव्हान असतं. यासाठी डार्क चाॅकलेटमध्ये थोडं दूध घालून लेप तयार करावा. चाॅकलेट आणि दुधाच्या या मिश्रणात थोडं मध किंवा ऑलिव्ह ऑइल घालावं. दुधात लॅक्टिक ॲसिड असतं. यामुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते. मध किंवा ऑलिव्ह तेलामुळे त्वचेत आर्द्रता निर्माण होते.
Image: Google
घरच्याघरी चाॅकलेट फेशिअल
चाॅकलेटचा उपयोग करुन घरच्याघरी सौंदर्योपचार करणं शक्य आहे. तसेच पार्लरमधील चाॅकलेट इफेक्ट ब्यूटी ट्रीटमेण्टसारखाच फायदा घरच्याघरी चाॅकलेट फेशिअल करुन मिळतो. घरच्याघरी चाॅकलेट फेशिअल करण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणत्याही प्रकारचं फेशिअल केल्यास चाॅकलेटचा फायदा त्वचेला होतो हेच खरं.
1. चाॅकलेट आणि शिया बटर
डार्क चाॅकलेट घ्यावं. ते एका भांड्यात गरम करुन विरघळून घ्यावं. त्यात थोडं शिया बटर आणि दूध घालावं. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. मिश्रण थंडं होवू द्यावं. मग हा लेप चेहऱ्यास लावावा. तो 5 मिनिटं ठेवावा. नंतर कापसाच्या बोळ्यांनी चेहरा पुसावा आणि थंडं पाण्यानं चेहरा धुवावा. चेहरा धुतल्यानंतर तो रुमालानं टिपावा आणि त्वचेस माॅश्चरायझर लावावं.
2. चाॅकलेट आणि दही
एका भांड्यात डार्क चाॅकलेट वितळून घ्यावं. त्यात दही घालावं. चाॅकलेट आणि दही मऊसूत पेस्ट होईल तोपर्यंत एकत्र फेटावं. हे मिश्रण चेहरा आणि मानेस लावावं. लेप चेहऱ्याला लावल्यानंतर 45 मिनिटं ठेवावा. चेहरा नंतर थंडं पाण्यानं धुवावा.
Image: Google
3. चाॅकलेट-स्ट्राॅबेरी- मध
एका भांड्यात डार्क चाॅकलेट वितळून घ्यावं. वितळलेल्या चाॅकलेटमध्ये स्ट्राॅबेरी वाटून घालावी. त्यात थोडं मध घालावं. हे मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं. हा लेप चेहरा आणि मानेस लावावं. 45 मिनिटांनी चेहरा थंडं पाण्यानं धुवावा. या प्रकारच्या चाॅकलेट फेशिअलमुळे त्वचा चमकदार होते.
Image: Google
4. चाॅकलेट आणि मध
चाॅकलेट वितळून घ्यावं. त्यात मध घालावं. हे चांगलं एकजीव करुन हा लेप चेहेऱ्यास लावावा. 45 मिनिटांनी चेहरा दूध किंवा थंडं पाणी याचा वापर करत स्वच्छ धुवावा.
Image: Google
5. चाॅकलेट-खोबऱ्याचं तेल- ब्राऊन शुगर
हे फेशियल म्हणजे चाॅकलेट स्क्रब आहे. यासाठी एका भांड्यात कोकोआ पावडर घ्यावी. त्यात थोडं खोबऱ्याचं तेल घालावं. आधी कोको पावडर आणि खोबऱ्याचं तेल चांगलं फेटून घ्यावं. ते फेटलं गेलं की त्यात ब्राऊन शुगर घालावी. नंतर पुन्हा हे मिश्रण फेटून घ्यावं. हा लेप चेहऱ्याला हलका मसाज करत लावावा. लावल्यानंतर तो 5-7 मिनिटं ठेवावा आणि नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
6. चाॅकलेट आणि ओट्स
एका भांड्यात डार्क चाॅकलेट वितळून घ्यावं. त्यात ओट्स पावडर आणि शिया बटर घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करुन घ्यावं. मिश्रण थंडं झाल्यावर हा लेप चेहरा आणि मानेस लावावं. या प्रकारच्या चाॅकलेट फेशिअलमुळे त्वचा स्वच्छ होते, चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते.
7. चाॅकलेट- मध- लिंबू
या चाॅकलेट फेशिअलमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात. चेहऱ्यावर डाग दिसत नाहीत. हे चाॅकलेट फेशियल तयार करताना एका भांड्यात कोकोआ पावडर घ्यावी. त्यात 3 छोटे चमचे मध आणि थोडा लिंबाचा रस घालावा. ते चांगलं एकजीव करुन चेहऱ्यास लावावं.
चाॅकलेट मास्क आणि चाॅकलेट फेशियलमध्ये दाह आणि सूज विरोधी घटक असतात. यामुळे चेहरा ओलसर राहातो. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात. चाॅकलेट मास्क आणि चाॅकलेट फेशिअलमुळे चेहऱ्याच्या त्वचेला संरक्षण मिळतं.