खोबरेल तेल हे खोबऱ्यापासून काढलेले असल्याने त्यामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात हे आपल्याला माहितच आहे. या तेलामध्ये इतके पोषण असते की काही ठिकाणी तर हे तेल स्वयंपाकासाठीही वापरतात. केसांची वाढ होण्यासाठी, कोरडेपणा कमी होण्यासाठी आणि इतर अनेक समस्यांसाठी आपल्यापैकी अनेक जण केसांना वर्षानुवर्षे आवर्जून खोबरेल तेलच लावतात. केसांच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी आवश्यक असणारे हे तेल आपल्या त्वचेसाठीही तितकेच उपयुक्त असते हे लक्षात ठेवायला हवे. चेहऱ्याला कधी सुरकुत्या पडतात तर कधी त्वचा खूप कोरडी होते, कधी खूप फोड येतात तर कधी डाग पडतात (Coconut Oil for Skin Care). अशा सर्व प्रकारच्या समस्यांसाठी नियमितपणे चेहऱ्याला खोबरेल तेल लावण्याचा फायदा होतो. पाहूयात चेहऱ्याला खोबरेल तेल लावण्याचे फायदे...
१. चेहऱ्याचा ग्लो वाढण्य़ासाठी
खोबरेल तेलामध्ये फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन इ आणि अँटीबॅक्टेरीयल गुण असतात. हे तेल सीरम म्हणूनही अतिशय उत्तम काम करते. त्यामुळे नियमितपणे चेहऱ्याला खोबरेल तेलाने मसाज केल्यास चेहऱ्याला ग्लो वाढण्यास मदत होते. व्हिटॅमिन इ चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने त्वचेचा तजेला वाढण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. रात्री झोपताना काही थेंब हातावर घेऊन ते चेहऱ्यावर लावल्यास चेहरा ग्लो करण्यास मदत होते.
२. सुरकुत्या दूर होण्यास मदत
वया वाढते तसे आपली त्वचा सैल पडायला सुरुवात होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. काही जणांना कमी वयातही चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण जास्त असते. अशावेळी चेहऱ्याला नियमित खोबरेल तेल लावल्यास सुरकुत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. खोबरेल तेलात अँटी एजिंग गुणधर्म असल्याने त्याचा चांगला फायदा होतो.
३. आर्द्रता टिकून राहण्यास मदत
कधी वातावरणातील बदलामुळे तर कधी प्रदूषणामुळे, पाण्याची कमतरता किंवा योग्य पोषण न झाल्याने चेहऱ्याची त्वचा कोरडी होते. अशावेळी आपण चेहऱ्याला रासायनिक घटक असलेले पदार्थ लावतो. मात्र त्यामुळे कोरडेपणा तात्पुरता जातो. पण खोबरेल तेल नियमितपणे लावल्यास त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.
४. डाग कमी होण्यास उपयुक्त
फोड आल्याने किंवा वेगवेगळ्या कारणांनी आपल्या चेहऱ्यावर डाग पडतात. एकदा हे डाग पडले की ते लवकर जात नाहीत. मात्र खोबरेल तेलात असलेल्या घटकांमुळे या डागांपासून आपली सुटका होऊ शकते. यासाठी रात्री झोपताना १० मिनीटे चेहऱ्याला खोबरेल तेलाने मसाज करायला हवा.