उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर उन्हात फिरलो तर उन्हाने नाहीतर घामाने आपला चेहरा पार काळवंडून जातो. हा काळवंडलेला चेहरा कितीही धुतला तरी स्वच्छ दिसत नाही. मग विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरुन आपण चेहऱ्यावरचा काळपटपणा किंवा पुरळ, फोड, सुरकुत्या झाकण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटस घेतो आणि चेहरा उजळ करण्यासाठी प्रयत्न करतो. यामध्ये फेस क्लीन अप, फेशियल यांसारख्या विविध ट्रीटमेंटसचा समावेश असतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. एकीकडे आपले पैसेही जातात आणि चेहऱ्यावर केमिकल्सचा मारा केल्याने त्वचा आणखी खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून आपण चेहऱ्यावर ट्रिटमेंट केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. कॉफी वापरुन चेहऱ्याचे क्लिन अप कसे करायचे ते पाहूया (Coffee Clean up at Home Beauty Tips)...
क्लिंझर
कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये १ चमचा दूध घालायचे. कापसाने किंवा कापडाने हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचे. यामुळे चेहरा अतिशय स्वच्छ होण्यास मदत होते. दोन्ही घटक नैसर्गिक असल्याने चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यता नसते.
स्टीमिंग
हा पर्याय ऑप्शनल आहे. मात्र क्लिंजिंगनंतर वाफ घेतली तर त्वचेची रंध्रे ओपन होण्यास मदत होते आणि चेहरा मूळापासून स्वच्छ होतो. ५ मिनीटे गरम पाण्याची वाफ घ्यावी. किंवा टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो चेहऱ्यावर ठेवावा.
स्क्रबिंग
कॉफीमध्ये अर्धा चमचा तांदळाचे पीठ घालावे. यामध्ये आवडत असेल तर २-३ थेंब लिंबाचा रस आणि थोडं दूध घालावं. यामुळे एकप्रकारचे स्क्रब तयार होते. हा स्क्रब चेहऱ्यावर योग्य पद्धतीने सगळीकडे लावावा. यामुळे मृत त्वचा, ब्लॅकहेडस आणि व्हाईट हेडस निघून जाण्यास मदत होते.
फेस पॅक
चेहऱ्यावरचे कण किंवा इतर घाण स्क्रबिंगमुळे निघून जाते आणि त्यानंतर चेहऱ्याला फेस पॅक लावायचा असतो. हा पॅकही आपण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून करु शकतो. थोडी कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि दही घालायचं. हे सगळे एकजीव करुन हा पॅक चेहऱ्यावर लावायचा. यामुळे चेहरा चांगला उजळ होण्यास मदत होते.