तुकतुकीत, स्वच्छ, नितळ त्वचा काही प्रत्येकालाच मिळत नाही. पण आपल्या त्वचेची योग्य काळजी घेतली आणि थोडे फार सौंदर्योपचार वेळाेवेळी करत गेलो, तर नक्कीच त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. हा अनुभव घ्यायचा असेल तर आठवड्यातून एकदा तुमच्या त्वचेला कॉफी स्क्रब करून पहा. डल, निस्तेज झालेल्या त्वचेला टवटवीतपणा देण्याचे काम कॉफी स्क्रब नक्कीच करते.
योग्य प्रमाणात कॉफी घेतली तर तिचे आरोग्यावर निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतात. तसाच फरक कॉफी स्क्रबमुळे आपल्या चेहऱ्यावरही दिसून येतो. कॉफीमध्ये असणारे कॅफेन उत्साह आणि तरतरीतपणा देणारे असते. याचाच उपयोग आपल्या त्वचेलाही होतो. म्हणूनच सौंदर्य शास्त्रातही आता कॉफीला नवी ओळख मिळाली असून कॉफी स्क्रब, कॉफी फेशिअल अशा ब्युटी ट्रिटमेंट्स आता पार्लरमध्ये करून मिळतात. या सगळ्या ब्युटी ट्रिटमेंट्स पार्लरमध्ये जाऊन करून घेतल्या तर निश्चितच खूप जास्त पैसे मोजावे लागतात आणि तेवढा वेळही द्यावा लागतो. म्हणूनच कमी पैशात आणि कमी वेळेत त्वचेला चमकदार बनवायचे असेल, तर घरच्याघरी कॉफी स्क्रब तयार करा.
कसे बनवायचे कॉफी स्क्रब
१. कॉफी आणि बदाम तेल
एक टेबल स्पून कॉफी पावडर घ्या. यामध्ये एक चमचा बदाम तेल टाकून त्याची पेस्ट तयार करा. चेहरा ओला करून ही पेस्ट हळूवार हाताने चेहऱ्यावर लावा आणि थोडी मालिश करा. यानंतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ही पेस्ट एअर टाईट म्हणजेच हवाबंद डबीत ठेवून दिली तरी चालते. फक्त जर अशा पद्धतीने जास्तीचे स्क्रब बनवून ठेवणार असाल तर जेवढी कॉफी घेतली त्याच्या निम्मी पिठीसाखरही त्यात टाकावी.
२. कॉफी, दही आणि मध
एका वाटीत कॉफीची पावडर घ्या. यामध्ये थोडे दही टाका. त्वचा जर कोरडी असेल तर साय किंवा दूध टाकावे. यानंतर यात थोडासा मध टाकावा. हे मिश्रण व्यवस्थित कालवून चेहऱ्यावर गोलाकार दिशेने मसाज करत लावावे. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.
३. कॉफी लिंबाचा रस आणि बेकींग सोडा
कॉफी आणि बेकींग सोडा हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. यामध्ये जेव्हा लिंबाचा रस टाकला जातो, तेव्हा ते मिश्रण अधिक परफेक्ट होते. अशा पद्धतीने स्क्रब तयार करण्यासाठी एक टेबल स्पून कॉफी घ्या. यामध्ये एक चतुर्थांश बेकींग सोडा टाका आणि लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.