थंडी सुरु झाली की त्वचा आणि केस रुक्ष व्हायला लागतात. अनेकदा रुक्षतेमुळे केस गळणे, डोक्यात कोंडा होणे आणि केसांना फाटे फुटणे अशा तक्रारी उद्भवतात. याबरोबरच केसांवर सातत्याने करण्यात येणाऱ्या विविध ट्रीटमेंटसमुळेही केसांना फाटे फुटण्याची समस्या उद्भवत असल्याचे दिसते. सतत स्ट्रेटनिंग करणे, केस कलर करणे यांसारख्या गोष्टींमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर होतो. केस नाजूक असल्याने त्यावर या केमिकलचा परिणाम होतो आणि केसांच्या समस्या निर्माण होतात. वाढते प्रदूषण आणि धूळ ही केसांच्या समस्या वाढण्याची मुख्य कारणे आहेत. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर हे केस निर्जीव आणि कोरडे होण्याचे आणखी एक कारण आहे.
तसेच केसांचे पुरेसे पोषण न झाल्याने केस दुभंगतात, अन्नातून पोषक घटक न मिळणे हे याचे मुख्य कारण असते. हळूहळू ही समस्या वाढत जाते, मग केस कापणे किंवा ट्रीम करणे हा एकच उपाय शिल्लक असतो. पण अशाप्रकारे केसांना फाटे फुटूच नयेत म्हणून आधूपासूनच घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास ते फायदेशीर ठरु शकतात. पाहूयात केसांचे सौंदर्य कायम राहावे यासाठी काही सोपे आणि घरच्या घरी करता येतील असे उपाय....
१. गरम तेलाने मालिश आणि ओला टॉवेल
केसांना कोमट तेलाने चांगले मालिश करा. आपण अनेकदा फक्त केसांच्या मुळांना तेल लावतो, वरचे केस तसेच कोरडे राहतात. पण असे न करता केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत तेल लावणे आवश्यक असते. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस फार रुक्ष होत नाहीत. तेल लावल्यानंतर टॉवेल कोमट पाण्यात भिजवून पिळून घ्यावा आणि तो केसांना बांधून ठेवावा. थोडा वेळ तसेच ठेवून केस शाम्पूने धुवावेत. यामुळे केसातील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. तसेच मालिश केल्याने त्या भागातील रक्तप्रवाह वाढतो आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास त्याची मदत होते.
२. केळ्याचे हेअर मास्क
केळे मिक्सरमधून वाटून घ्या, त्यामध्ये दूध आणि मध घाला. थोडं एरंडेल तेल घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करुन केसांना सगळ्या बाजुने व्यवस्थित लावून ठेवा. आठवड्यातून एकदा हे हेअर मास्क केसांना नक्की लावा. अर्धा तास ठेवून केस कोमट पाण्याने धुवा. या मास्कचा थोडा चिकटपणा केसांना राहीला तर राहूद्या, दुसऱ्या दिवशी शाम्पू करा. त्यामुळे केसातील मॉइश्चर टिकून राहील आणि केस मुलायम होण्यास मदत होईल.
३. पपईचे हेअर मास्क
पपईमध्ये प्रोटीन्स आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे केसांच्या समस्यांसाठी पपई अतिशय उपयुक्त ठरते. पपईच्या फोडी करुन त्यांचा मिक्सरमधून गर करुन घ्यावा. त्यामध्ये अर्धा कप दही आणि थोडा मध घालून हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. हे मिश्रण केसांना लावून अर्धा ते पाऊण तासाने केस शाम्पूने धुवावेत. पपई, दही आणि मध यांमुळे केसांना चमकदारपणा येण्यास मदत होते. तसेच या हेअर मास्कमुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
४. अंड्याचा मास्क
अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अंडे फोडून त्यामध्ये एक चमचा दही आणि २ चमचे लिंबाचा रस एकत्र करुन हे मिश्रण फेटून घ्यावे. हा मास्क केसांना सगळीकडून व्यवस्थित लावावा. पाऊण ते एक तासाने कोमट पाण्याने केस धुवावेत. आठवड्यातून एकदा हा प्रयोग नक्की करावा. यामुळे केस मुलायम होतात आणि केसांना फाटे फुटण्यापासून त्यांचा बचाव होतो. असे करायचे नसेल तर अंड्यात ऑलिव्ह ऑईल घालून ते मिश्रण केसांना लावले तरी चालते.
५. कोरफड गर
कोरफडीमध्ये अनेक पोषक तत्व असतात हे आपल्याला माहित आहेच. कोरफड जेलमध्ये दोन चमचे एरंडेल तेल आणि २ चमचे लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण एकजीव करुन ते केसांना एकसारखे लावावे. त्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस मऊ, मुलायम होण्यास मदत होते. केसांना फाटे फुटत असतील तर ती समस्या दूर होण्यासही या उपायाचा चांगला उपयोग होतो.